अमोल परांजपे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुप्रसिद्ध ‘सिरियल किलर’ चार्ल्स शोभराज याची नेपाळच्या तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश तेथील सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले. अनेक स्त्रियांची हत्या करणारा हा माथेफिरू मुक्त होणार आहे. अर्धा भारतीय असलेल्या चार्ल्सवर अनेक चित्रपट, मालिका बनल्या आहेत.

नेपाळ सर्वोच्च न्यायालयाने सुटका करण्याचे कारण काय?

शोभराज याची पुढील १५ दिवसांत सुटका करावी आणि त्याला त्याच्या मायदेशी, फ्रान्समध्ये धाडून द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले. ७८ वर्षांच्या शोभराजला आरोग्याच्या कारणामुळे सोडण्यात येत आहे. त्याचे हृदय अधू झाले असून दातांच्या समस्यांनीही तो ग्रस्त आहे. त्याबाबत फ्रान्सच्या वकिलातीने नेपाळशी संपर्क साधून विनंती केली होती.

शोभराजला ‘बिकिनी किलर’ हे नाव कशामुळे पडले?

शोभराजने विविध देशांमध्ये अनेक महिलांची हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच्या बळींमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असून यातील काही महिला या बिकिनी परिधान केलेल्या होत्या. त्यामुळेच शोभराजला ‘बिकिनी किलर’ हे नाव पडले. याखेरीज तपासयंत्रणांच्या हातून निसटण्याचे त्याचे कौशल्य बघून ‘सर्पंट’ (सरपटणारा प्राणी) असेही टोपणनावही त्याला मिळाले.

शोभराजचा जन्म आणि बालपणाचा इतिहास काय?

शोभराजचा जन्म हा व्हिएतनाममधील ‘सीगाँ’ या शहरात झाला. त्यावेळी हे शहर फ्रेन्चांच्या ताब्यात होते. त्याचे वडील हे भारतीय व्यापारी होते तर आई व्हिएतनामी. त्याच्या आईवडिलांचा विवाह झाला नव्हता आणि वडिलांनी चार्ल्स याला कधीही आपला मुलगा म्हणून स्वीकारले नाही. कालांतराने तो आपल्या आईसोबत फ्रान्सला गेला. तिथे त्याच्या आईने एका फ्रेन्च सैनिकाशी विवाह केला. मात्र आपल्या जन्मदात्या वडिलांनी नाकारल्यामुळे दुखावला गेलेला चार्ल्स आईच्या नव्या कुटुंबाशी कधीही समरस झाला नाही, याचा उल्लेख त्याच्याबाबत छापून आलेली पुस्तके, लेख यात सापडतो. १३-१४ वर्षांचा असल्यापासून तो गुन्हेगारीकडे वळला आणि त्याने अनेकदा तुरुंगाच्या वाऱ्या केल्याचेही सांगितले जाते.

शोभराज ‘सिरियल किलर’ कसा झाला?

आपल्या तरुण वयात चार्ल्स जगभर फिरला. तो जिथे गेला तिथे त्याने प्रामुख्याने ‘हिप्पी’ (आशियाई देशांमध्ये येणारे पाश्चिमात्य) पर्यटकांना लक्ष्य केले. अनेकदा त्याने अन्नपदार्थ किंवा पेय्यांमधून विषप्रयोग करून या हत्या केल्या. अनेक महिला साथीदारांंच्या मदतीने तो ही कृत्य करत असे. त्याच्यावर किमान २० हत्या केल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यामागचे कारण मात्र कधीही बाहेर आलेले नाही. अनेक वेळा तो ज्यांची हत्या केली आहे त्यांचे पारपत्र आणि कागदपत्रे वापरून पळून जात असल्याचे सांगितले जाते.

शोभराजला भारतामध्ये कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली होती?

१९७६ सालच्या जुलैमध्ये शोभराज आणि त्याच्या तीन महिला साथीदारांनी फ्रान्सहून पर्यटनासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना ‘सहल मार्गदर्शक’ (टुरिस्ट गाईड) असल्याचे भासवून गळाला लावले. त्यांच्या विश्वास संपादन केल्यावर विषारी गोळ्या देऊन त्याने या विद्यार्थ्यांची हत्या केली. मात्र त्यातील काही विद्यार्थी बेशुद्ध पडण्यापूर्वी पोलिसांना दूरध्वनी करण्यात यशस्वी ठरले आणि शोभराजचे बिंग फुटले. त्यानंतर त्याच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोप सिद्ध झाल्यावर शोभराजला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली.

भारतीय तुरुंगातील शोभराजचे वर्तन कसे होते?

शोभराज हा तिहार कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला अनेक महिला भेटायला येत असल्याची आठवण तत्कालीन तुरुंग उपअधीक्षक जे. पी. नैथानी यांनी सांगितली आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक होते. तो बोलण्यातून कुणालाही सहज वश करून घेत असे, असे सांगितले जाते. अनेक महिलांनी त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तसे अर्जही तुरुंग अधिकाऱ्यांकडे आले होते. शिक्षा संपत आली असताना त्याने सुरक्षेवर असलेल्या पोलिसांना आपल्या वाढदिवसाच्या केकमधून गुंगीचे औषध दिले आणि पळ काढला.

शिक्षा संपणार असताना पळून जाण्याचे कारण काय?

शोभराज पळून गेला खरा, मात्र त्याला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले. शोभराजचा पाठपुरावा करणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या मते त्याने मुद्दाम पळून जाण्याचे आणि पुन्हा पकडले जाण्याचे नाटक केले. कारण शिक्षा संपल्यानंतर थायलंडला त्याचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता होती. तिथे पाच हत्यांचा आरोप होता आणि थायलंडमधील कायद्यानुसार त्याला फाशी होणार हे जवळजवळ निश्चित होते. तुरुंग फोडीचा खटला पुन्हा चालल्यामुळे १९९७ साली त्याची तुरुंगातून सुटका झाली त्यावेळी प्रत्यार्पणासाठी असलेली २० वर्षांची मुदत संपली होती.

नेपाळमध्ये पुन्हा अटक होण्याचे कारण काय?

भारतातून सुटल्यानंतर तो आपल्या मायदेशी, फ्रान्सला निघून गेला. २००३ साली नेपाळमध्ये गेला असताना त्याला अटक झाली. १९७५ साली नेपाळमध्ये क्रोनी जो ब्राँझिक या अमेरिकन महिलेच्या हत्येचा त्याच्यावर आरोप होता. याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. कालांतराने क्रोनीचा अमेरिकन मित्र लॉरेंट कॅरी याच्या हत्येचा गुन्हाही सिद्ध झाला. नेपाळमध्ये असतानाच त्याने निहिता बिस्वास या स्थानिक महिलेशी विवाहदेखील केला.

अतिरेकी आणि गुप्तचर संघटनांशीही संबंध होता?

तिहार कारागृहात असताना शोभराजची जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याच्याशी मैत्री झाली. त्यानंतर त्याने २०१४ साली तालिबानला शस्त्रास्रे मिळवून देण्यासाठी मदत केल्याचे सांगितले जाते. तसेच अमेरिकेची गुप्तहेर संघटना, सीआयएसाठीही शोभराजने काही काळ काम केल्याचे बोलले जात असले तरी या बाबी अद्याप सिद्ध होऊ शकलेल्या नाहीत. अनेक कथा, कादंबऱ्या, चित्रपट, मालिकांचा विषय असलेला शोभराज आता पुन्हा एकदा मुक्त होऊन मायदेशी, फ्रान्समध्ये जाणार आहे. आता म्हातारा झाला असला आणि आजारी असला तरी त्याच्या कारवाया बघता यंत्रणांना त्याच्यावर नजर ठेवावीच लागेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why charles sobhraj release and what is his relation with india print exp sgy