विनायक डिगे
मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये लागणारे साहित्य, उपकरणे यांचे दर निश्चित करण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडे असते. त्याने निश्चित केलेल्या दरानुसार प्रत्येक विभागाला साहित्य व उपकरणे यांचा कंत्राटदाराकडून पुरवठा करण्यात येतो. औषधे आणि आरोग्य विभागातील साहित्य खरेदीवरून मध्यवर्ती खाते सातत्याने वादात सापडले आहे. या वादाचा आढावा.
रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा का?
मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य केंद्रे यामध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामागे मध्यवर्ती खरेदी खात्यातील अनागोंदी कारणीभूत असल्याचे आरोप आहे. रुग्णांना दररोज लागणारी औषधे, शस्त्रक्रियेसाठीचे साहित्य, उपकरणे यांची यादी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून मध्यवर्ती खरेदी खात्याकडे प्रत्येक आर्थिक वर्षांत दिली जाते. सर्व रुग्णालयांकडून आलेली मागणी एकत्रित करून मध्यवर्ती खरेदी खात्याकडून निविदा प्रक्रिया राबवून दर निश्चित करण्यात येतात. त्यानुसार औषधांची खरेदी केली जाते. मात्र ही प्रक्रिया राबविण्यातच मध्यवर्ती खरेदी खात्याकडून चालढकल करण्यात येत असल्याने त्याचा फटका रुग्णालयातील औषध तुटवडय़ावर होत असल्याचे समोर आले आहे.
आरोप काय आहेत?
मध्यवर्ती खरेदी खात्यावर गैरव्यवहाराचे आरोप वारंवार होत आहेत. अनेक विभागांना आवश्यक वस्तू, उत्पादने, साहित्य व उपकरणे वेळेवर मिळत नाहीत. ती वर्णनानुसार नसल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. या खात्याकडे रुग्णालयांकडून येणाऱ्या यादीनुसार औषधांचे दर निश्चित करण्याच्या प्रक्रियेला विलंब करण्यात येतो. नव्या कंत्राटाची प्रक्रिया वेळेवर राबविण्यात येत नाही. राबवली तर क्षुल्लक कारणांवरून रद्द करण्यात येते. ठरावीक कंपनीला कंत्राट मिळावे, यासाठी ते दोन ते तीन वर्षे रखडवण्यात आल्याचे दिसून येत आहे. या खात्याने नुकतेच मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना औषधपुरवठा करणाऱ्या वितरकांची देयके थेट औषध उत्पादक कंपनीच्या खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे वितरकांना आर्थिक फटका बसू लागला. वितरकांची देयके वेळेत न देणे, निविदा प्रक्रिया वेळेत न राबविणे असे अनेक आरोप या खात्यातील अधिकाऱ्यांवर होत आहेत.
प्रक्रिया रखडल्याने काय होते?
या खात्याकडून प्रक्रियेस विलंब झाला तर प्राथमिक गरज भागविण्यासाठी रुग्णालयांना स्थानिक बाजारातून निविदा प्रक्रिया राबवून १५ टक्के औषध खरेदी करण्यास मान्यता आहे. मात्र मध्यवर्ती खरेदी खात्याकडून मागील काही वर्षांपासून वेळेत औषधपुरवठा होत नसल्याने रुग्णालय प्रशासनाला खासगी वितरकांकडून चढय़ा दराने औषध खरेदी करावी लागते. परिणामी पालिकेचे साधारणपणे १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
साहित्य खरेदीत वाद का झाला?
मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांत क्ष किरण चाचणी (एक्स रे), सीटी स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी यांसारख्या अद्ययावत यंत्रणा आणण्याची मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार विभागप्रमुख, रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मध्यवर्ती खरेदी खात्याकडे अद्ययावत उपकरणे व साहित्य खरेदी करण्यासाठी मागणी पाठविली आहे. महापालिकेच्या केईएम, नायर, शीव व कूपर या रुग्णालयांकडून तीन वर्षांपूर्वी अद्ययावत एक्स रे यंत्रणेची मागणी करण्यात आली होती. मात्र गेली तीन वर्षे या यंत्रांच्या खरेदीचे दर कंपनी मध्यवर्ती खरेदी कक्षाने निश्चित केलेली नाही. एक्स रे यंत्रणा खरेदीच्या निविदा प्रक्रियेत अटींची पूर्तता न करणाऱ्या कंपनीलाच कंत्राट देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रक्रियेत सहभागी तिन्ही कंपन्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले. ज्या कंपनीसाठी अधिकाऱ्यांचा खटाटोप सुरू आहे, त्यांनी पालिकेच्या एका रुग्णालयातील एक्स रे मशीनवर प्रात्यक्षिक दाखविण्याचे मान्य केले. मात्र प्रत्यक्षात टाळाटाळ केली. परिणामी मध्यवर्ती खरेदी खात्याने खरेदीची प्रक्रिया दीड वर्षांपेक्षा अधिक काळ रखडवली आहे.
नवी यंत्रणा का हवी?
अद्ययावत एक्स रे यंत्रणेत संपूर्ण पाय किंवा संपूर्ण मणक्याचा एक्स रे काढण्याची सुविधा आहे. त्यामुळे अस्थिव्यंग विभागाच्या डॉक्टरांना रुग्णाच्या पायात किंवा मणक्यात नेमके कुठे व्यंग आहे हे समजण्यास मदत होणार आहे. सध्या असलेल्या डिजिटल एक्स रे मशीनच्या साहाय्याने पायाचा पूर्ण एक्स रे काढायचा झाल्यास रुग्णाला झोपवून एक्स रे काढावा लागतो. रुग्ण झोपल्यामुळे त्याचा पाय पूर्णपणे सरळ होतो. त्यामुळे हाडाची अचूक लांबी कळत नाही. परिणमी उपचार करणे अवघड होते. तसेच पायात प्लेट, स्क्रू टाकायचा असल्यास अनेकदा एक्स रे काढावे लागतात. काही वेळा रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत जाऊन एक्स रे काढण्यास सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र अद्ययावत यंत्रणेमुळे रुग्ण उभा असताना त्याचा एक्स रे काढता येणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना अचूक निदान करणे सोपे होईल.