पाकिस्तानी कंपनीने बनवलेला ‘रूह अफजा’ आपल्या भारतातील वेबसाईटवरून काढून टाकावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने अॅमेझॉनला दिले आहे. ‘हमदर्द नॅशनल फाऊंडेशन’ने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला. भारतातील ई-कॉमर्स वेबसाईटवर विकला जाणारा ‘रूह अफजा’ हा पाकिस्तानातील कंपनीत बनवण्यात आला असून त्यावर कंपनीची कोणतीही माहिती नाही, असे या याचिकेत सांगण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ‘रूह अफजा’ हे भारतीय नागरिक पेय म्हणून वापरत आहेत. इतके महत्त्वाचे प्रॉडक्ट कंपनीच्या माहिती शिवाय अॅमेझॉन कसे विकू शकतो? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. मात्र, हे ‘रूह अफजा’ नेमकं काय आहे? आणि त्याची सुरूवात नेमकी कशी झाली? जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : पाकिस्तानची एफ-१६ विमाने अद्ययावत करण्याची अमेरिकेला गरज काय? भारताची नाराजी का?
‘रूह अफजा’ नेमकं काय आहे?
‘रूह अफजा’ हे युनानी पद्धतीने बनवलेले एक पेय असून त्यात थंड गुणधर्म असलेले पदार्थ आहेत. उत्तर भारतात उन्ह्याळ्यात या पेयाचा वापर केला जातो. २०व्या शतकाच्या सुरूवातीला त्याचा शोध लावण्यात आला होता. ‘रूह अफजा’ हे गुलाबी रंगाचं पेय असून फळ, गुलाब आणि आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करत ते बनवले जाते. ‘रूह अफजा’ हे थंड पाण्यात किंवा दुधात टाकूनही घेतात. तसेच फालुद्यातही याचा वापर केला जातो.
हेही वाचा – विश्लेषण : रेबीज किती धोकादायक? केरळमधील मुलीचा मृत्यू टाळता आला असता?
‘रूह अफजा’चा शोध कधी आणि कोणी लावला?
‘रूह अफजा’चा एक हफिज अब्दुल मजीद यांना लागवला. ते पेशाने एक डॉक्टर होते. १९०६ च्या दरम्यान, उत्तर भारतात उन्हाळ्यात होणारा उष्माघात, थकवा आणि इतर आजारांवर उपाय म्हणून त्यांनी संशोधन सुरू केले होते. वर्षभराच्या संशोधनानंतर त्यांनी ‘रूह अफजा’ तयार केले. मात्र, हफिज अब्दुल मजीद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी रबीया बेगम यांनी ‘हमदर्द’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत त्यांनी युनानी आणि इतर आयुर्वेदिक औषधांवर संशोधन सुरू केले. मात्र, फाळणीनंतर रबीय बेगम यांचा मोठा मुलगा अब्दुल हमीद भारतात, तर छोटा मुलगा मोहम्मद सईद पाकिस्तानात राहायला गेला. त्यामुळे हमदर्द नॅशनल फाऊंडेशन आणि हमदर्द प्रयोगशाळा (वक्फ), असे दोन भाग झाले. दरम्यान, १९७१ मध्ये बांग्लादेशच्या निर्मितीनंतर तिथे वेगळी हमदर्द ट्रस्ट स्थापन करण्यात आली. आज तिन्ही संस्था वेगवेगळ्या काम करतात.
हेही वाचा – विश्लेषण : चिवट महागाई आपली पाठ कधी सोडणार?
ग्राहकांची होत आहे दिशाभूल?
दरम्यान, ई-कॉमर्स साईटवर असलेल्या ‘रूह अफजा’वर कंपनीसंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने ग्राहकांना ते भारतीय आहे की पाकिस्तानी हे ओळखण्यात अडचणी येत आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अॅमेझॉन जरी म्हणत असले की ते ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये माध्यम आहे, तरी विक्रेत्यांची माहिती साईटवर उपबल्ध करून देणं ही अॅमेझॉनची जबाबदारी आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने अॅमेझॉनला दिले आहे.