इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या ३४ व्या सामन्यात, जेंटलमेन गेम म्हणवल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये जे व्हायला नको होते ते सर्व पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्स संघाच्याबाबतीत मैदानावरील अंपायरने घेतलेला एका वादग्रस्त निर्णय हे घडण्यास कारणीभूत ठरला. एका नो बॉलमुळे सामना थांबवला आणि त्यानंतर जे नाटक झाले ते या खेळाच्याविरुद्ध होते. नो बॉल तपासण्यासाठी मैदावरील अंपायरने थर्ड अंपायरकडे जाण्याचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दिल्ली कॅपिटल्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध जिंकण्यासाठी शेवटच्या सहा चेंडूत ३६ धावा करायच्या होत्या. वेस्ट इंडिजचा फलंदाज रोव्हमन पॉवेल क्रीजवर होता आणि समोर गोलंदाजीही वेस्ट इंडिजचाच होता. गोलंदाजीची जबाबदारी ओबेड मॅकॉयकडे होती. त्याने शेवटच्या षटकात २६ धावा दिल्या. अशा स्थितीत सामना जिंकू शकू, अशी काहीशी आशा दिल्लीला होती. रोव्हमन पॉवेलनेही पहिल्या तीन चेंडूत तीन षटकार मारून सामना रोमांचक वळणावर नेला.

मात्र, तिसऱ्याच चेंडूवर वाद निर्माण झाला. पॉवेलने मॅकॉयच्या वेस्ट हाईट फुल टॉस बॉलवर षटकार मारला. परंतु पॉवेलने स्क्वेअर लेग अंपायरला विचारले की हा वेस्ट हाईट बॉल नो बॉल का नाही. कारण चेंडू कंबरेच्या थोडा वर आला होता. लेग अंपायरने लगेच कोणताही निर्णय घेतला नाही. दुसरीकडे, जेव्हा दिल्ली कॅपिटल्सने मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर चेंडू पाहिला तेव्हा सर्वांनी नो बॉल नो बॉलच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. मात्र लेग अंपायर निखिल पटवर्धन यांनी नो बॉल दिला नाही.

मैदानावरील पंचांनी नो बॉल दिला नाही. त्यानंतर तर थर्ड अंपायरकडून तपासणी करून घ्या, असे सर्वांनी सांगितले. दिल्ली कॅपिटल्सचे सर्व खेळाडू, कर्णधार ऋषभ पंत, सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन, फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी नो-बॉल तपासण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रवीण आम्रेही कर्णधाराच्या सांगण्यावरून मैदानात उतरले होते. कर्णधार पंतला आपल्या फलंदाजांना मैदानातून परत बोलावायचे होते. असे असूनही मैदानातील पंचानी आपल्या निर्णय बदलला नाही. मात्र नियमांनुसार असेच व्हायला हवे होते.

नियम काय सांगतो?

एवढ्या नाट्यानंतर थर्ड अंपायने या प्रकरणी निकाल द्यायला हवा होता का? मैदानावरील अंपायरने नो बॉलच्या निर्णयासाठी थर्ड अंपायरकडे जायला हवे होते का? तर याचे उत्तर पूर्णपणे नाही असे आहे. जर स्क्वेअर लेग अंपायरला वेस्ट हाईट नो बॉलबद्दल थोडीशी शंका असेल तर त्याला त्वरित निर्णय घ्यावा लागतो. मात्र, त्या चेंडूवर विकेट पडली असेल, तर थर्ड अंपायर ते तपासू शकतात. त्यामुळे थर्ड अंपायर इतर कोणत्याही चेंडूवर आपला निर्णय देऊ शकत नाही. मैदानावरील अंपायरही थर्ड अंपायरला याबाबत विचारू शकत नाही.

जर अंपायरने निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला असता, तर भविष्यात आणखी अनेक वाद निर्माण झाले असते आणि असेच सामने थांबले असते. कोणी वाइड बॉलवर थर्ड अंपायरचा निर्णय मागेल, कोणी इतर कारणांसाठी थर्ड अंपायरचे मत घेईल. अशा प्रकरणात, मैदानावरील अंपायरचा निर्णय केवळ प्रचलित असतो. या सामन्यातही तेच दिसून आले आणि मैदानावरील पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

Story img Loader