दत्ता जाधव
केंद्र सरकारने बेंगळूरु ‘रोझ’ म्हणजे कर्नाटकी गुलाबी कांद्यावरील निर्यात शुल्क माफ केले आहे. या निर्णयासह त्याचे संदर्भही पाहायला हवे..
केंद्र सरकारचा नेमका निर्णय काय?
केंद्र सरकारने बेंगळूरु ‘रोझ’ म्हणजे कर्नाटकी गुलाबी कांद्यावरील निर्यात शुल्कात ‘४० टक्के सवलत’ दिल्यामुळे गुलाबी कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्यासाठी कर्नाटक सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. कांद्याच्या वाढत्या किमती आणि पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारातील कांद्याची उपलब्धता कायम राखून भाववाढ रोखण्यासाठी, केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले होते. त्याविरोधात नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून मोठा विरोध केल्यानंतरही केंद्राने ४० टक्के निर्यात कर मागे घेतला नव्हता. मात्र, गुलाबी कांद्यावरील निर्यात कर केंद्र सरकारने मागे घेतला.
हेही वाचा >>>‘हमास’च्या इस्रायलवरील हल्ल्यामागचे कारण काय? आखातात मोठ्या युद्धाचा भडका उडणार?
कर्नाटकी गुलाबी कांद्यालाच सूट का?
कर्नाटकी गुलाबी कांदा किंवा ‘बेंगळूरु रोझ’ कांद्याची लागवड प्रामुख्याने बेंगळूरु, चिक्कबल्लापूर, तुमकूर, हसन, दावणगिरी, धारवाड आणि बागलकोट भागात होते. या जिल्ह्यांतील एकूण् सुमारे पाच हजार एकर क्षेत्रातून सुमारे ६० ते ७० हजार टनांपर्यंतचे उत्पादन मिळते. या कांद्याची देशाच्या अन्य भागांत लागवड होत नाही, तसेच देशांतर्गत वापरही फारसा होत नाही. हा कांदा निर्यातीसाठीच उत्पादित केला जातो. प्रामुख्याने मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बहारीन, अरब राष्ट्रे, बांगलादेश, श्रीलंका आणि हाँगकाँगला मोठय़ा प्रमाणावर निर्यात केली जाते.
या कांद्याला भौगोलिक मानांकन का मिळाले?
बेंगळूरु रोझ या वाणाच्या कांद्याला २०१५ मध्ये भौगोलिक मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स) मिळाले आहे. हा कांदा गडद गुलाबी रंगाचा आहे. लोणचे, सांबार बनवण्यासाठी या कांद्याचा वापर होतो. या कांद्याची चव इतर कांद्याच्या तुलनेत जास्त तिखट आहे. भारतात हा कांदा जास्त खाल्ला जात नाही. कांद्याची टिकवण क्षमता कमी असते. कांद्याचा तळ सपाट असतो. एकसारखा गोल आकार (साधारणत: २.५ ते ३.५ सेंटिमीटर) हे या कांद्याचे खास वैशिष्टय़ आहे, त्यामुळे भौगौलिक मानांकन मिळाले आहे.
हेही वाचा >>>इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे?
‘बेंगळूरु रोझ’चे उत्पादन अन्य राज्यांत का होत नाही?
‘बेंगळूरु रोझ’ कांद्याचे उत्पादन कर्नाटकातील विशिष्ट परिसरातच होते, याचे कारण या भागातील हवामान आणि माती. येथील माती रेती मिश्रित, लाल रंगाची आहे. मातीचा सामू (क्षारता) ६ ते ७ आहे. कांद्याच्या लागवडीच्या काळात पिकाला थंड हवामान मिळते. हवेतील आद्र्रता आणि भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत असल्यामुळे कांदा पिकांची चांगली वाढ होते. या भागात वर्षांतील नऊ महिने कांद्याची लागवड होते. कांद्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न ७०,००० टनांच्या घरात आहे. उत्पादित होणाऱ्या एकूण कांद्यापैकी सुमारे ६० टक्क्यांपर्यंत कांदा निर्यात केला जातो. अन्य कांदा घरगुती वापरासह बियाणे म्हणून वापरला जातो. देशातील एकूण कांदा उत्पादनात ‘बेंगळूरु रोझ’ कांद्याचा वाटा सुमारे चार टक्के आहे.
अन्य राज्यांत कांदा उत्पादनाची स्थिती काय?
यंदा देशात ३१० लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. मागील वर्षी ३१६ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक ही कांदा उत्पादनातील आघाडीवरील राज्ये. मागील वर्षीच्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४२.७३ टक्के, मध्य प्रदेशाचा १५.२३ टक्के, कर्नाटकचा ८.९३ टक्के आणि गुजरातचा वाटा ८.२१ टक्के इतका होता. मागील वर्षी अवकाळी, गारपीट, उष्णतेच्या झळांमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले होते. यंदा राज्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीत सुमारे २९ हजार हेक्टरने घट झाली आहे. चांगले आणि दर्जेदार कांदा उत्पादन घेणाऱ्या नाशिक विभागातच लागवड घटली आहे. त्यामुळे देशाच्या कांदा उत्पादनात जवळपास ४० ते ४५ टक्के वाटा असणाऱ्या महाराष्ट्रात खरीप हंगामातील कांदा उत्पादनात मोठी तूट येण्याचा अंदाज आहे. देशाच्या अन्य भागातही उशिराने सक्रिय झालेल्या मोसमी पावसामुळे खरिपातील कांदा लागवडीत घटीचा कल आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने कांद्याची दरवाढ होऊ नये म्हणून निर्यातीवर ४० टक्के कर लागू केला आहे.
dattatray. jadhav@expressindi.com