BharatPe चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे. फिनटेक स्टार्टअपने कथित आर्थिक अनियमिततेमुळे त्यांची पत्नी आणि कंपनीच्या नियंत्रण प्रमुख माधुरी जैन ग्रोव्हर यांच्या सेवा समाप्त केल्याच्या काही दिवसांनंतर हा निर्णय झाला आहे.
याबद्दल BharatPe ने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ग्रोव्हर यांच्या वर्तणुकीबद्दलचा आणि त्यांच्या निर्णयांबद्दलचा अहवाल मागवण्याचा निर्णय झाला होता. त्यावर पुढच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार होती. त्या आधीच ग्रोव्हर यांनी राजीनामा दिला आहे.
सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (SIAC) द्वारे नाकारण्यात आलेले, कंपनीचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स ऑडिट करण्याच्या भारतपेच्या निर्णयाला आव्हान देत, ग्रोव्हर यांच्या आपत्कालीन लवादाच्या याचिकेनंतर हे घडलं आहे. आपल्या राजीनाम्यात ग्रोव्हर यांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. संचालक मंडळाने स्वतःच्या स्वार्थासाठी आपली हकालपट्टी केल्याचं ग्रोव्हर यांनी म्हटलं आहे. कंपनीमधले अलीकडे झालेले काही निर्णय, काही बदल हे संचालक मंडळातल्या लोकांच्या अहंकारापोटी घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. “आज माझी बदनामी केली जात आहे आणि अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जात आहे,” असं ग्रोव्हर यांनी राजीनाम्यात लिहिलं आहे.
आपल्या राजीनाम्या ग्रोव्हर यांनी म्हटलं आहे की ते कंपनीचे सर्वात मोठे वैयक्तिक शेअरहोल्डर म्हणून कायम राहतील. ग्रोव्हर यांच्याकडे BharatPe मधील ९.५ टक्के स्टेक आहे आणि कंपनीच्या शेवटच्या निधी उभारणीनुसार, त्यांचा स्टेक १८००-१९०० कोटी रुपयांचा होता.
याचा BharatPe वर काय परिणाम होणार?
BharatPe मंडळाने ग्रोव्हर यांची नोकरी संपुष्टात आणण्यासाठी आणि या भागभांडवलातील ठराविक रकमेची विक्री करण्यासाठी भागधारकांच्या करारामध्ये काही कलमे लागू करण्याची योजना आखली. एमडी पदावरून पायउतार होत असतानाही ग्रोव्हर यांनी कंपनीतील आपली इक्विटी कायम ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
BharatPe आणि अशनीर यांच्यात काय बिनसलं?
जानेवारीच्या सुरुवातीस, ग्रोव्हर यांची कोटक बँकेच्या कर्मचार्याविरुद्ध अपशब्द वापरत असल्याची ऑडिओ क्लिप समोर आली. ही क्लिप खोटी असल्याचा दावा त्यांनी केला असताना, बँकेने त्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. दोन आठवड्यांनंतर, ग्रोव्हर मार्च अखेरपर्यंत स्वैच्छिक रजेवर गेले. ग्रोव्हर आणि सेक्वॉइया (BharatPe चे सर्वात मोठे शेअरहोल्डर) यांच्यातील ई-मेल थ्रेड, दोन पक्षांमधील मतभेदांवर प्रकाश टाकल्यानंतर हे घडलं.दरम्यान, ग्रोव्हरची पत्नी माधुरीलाही सुट्टीवर पाठवण्यात आले आहे.
नंतर जानेवारीमध्ये, भारतपेने ग्रोव्हरच्या अंतर्गत कंपनीची कार्यपद्धती पाहण्यासाठी स्वतंत्र ऑडिटर्सची नियुक्ती केली. अल्वारेझ आणि मार्सल या फर्मच्या प्राथमिक अहवालात फेब्रुवारीमध्ये माधुरीवर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. २३ फेब्रुवारी रोजी भारतपेने माधुरीला निधीच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली काढून टाकले.