चित्रपट-वेब मालिका पाहण्यासाठी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला सर्वाधिक पसंती दिली जाते. मात्र गेल्या काही दिवसात नेटफ्लिक्सच्या ग्राहक संख्येत झपाट्याने घट होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कंपनीच्या चिंतेत वाढ झाली आहे. ग्राहकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे पाठ का फिरवली याची कारणं कंपनी शोधत आहे. २०१६ पासून नेटफ्लिक्स भारतात सेवा देत आहे. भारतातील ओटीटीमधील तीव्र स्पर्धा पाहता नेटफ्लिक्सने आपले दर कमी केले. मात्र असं करून ग्राहक वळत नसल्याने चिंता वाढली आहे. नेटफ्लिक्सची डिस्ने+ हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी एंटरटेनमेंटचे ZEE5 आणि सोनी पिक्चर्स नेटवर्कचे SonyLIV यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा आहे.
ग्राहक कमी का झाले?
गेल्या तीन महिन्यात नेटफ्लिक्सचे २ लाख ग्राहकांनी नेटफ्लिक्सकडे पाठ वळवली आहे. गेल्या दशकात नेटफ्लिक्सला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, महागाई, इतर ओटीटी नेटवर्कशी असलेली स्पर्धा आणि करोना संकट यामागे कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत नेटफ्लिक्स सदस्यांची संख्या २२१.६ दशलक्षांवर आली आहे. नेटफ्लिक्सचे म्हणणे आहे की, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे त्याचे सदस्य कमी झाले आहेत. नेटफ्लिक्सने रशियामध्ये आपली सेवा बंद केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, २०२० मध्ये वर्क फ्रॉम होम दरम्यान, कंपनीचा विकास दर चांगला होता. परंतु ग्राहक त्यांचे खाते एकमेकांशी शेअर करतात, ज्यामुळे कंपनीचे नुकसान होत आहे. जवळपास २२२ दशलक्ष घरात नेटफ्लिक्स वापरलं जात आहे. परंतु नेटफ्लिक्स खात्यांची संख्या केवळ १०० दशलक्ष आहे. लोक स्वस्त इंटरनेट डेटा आणि स्मार्ट टीव्हीवर नेटफ्लिक्स वापरत आहेत. परंतु टेलिव्हिजन स्ट्रीमिंग सेवा पैसे देत नाही.
काय आहेत दर?
| फक्त मोबाईल | बेसिक प्लान | स्टँडर्ड प्लान | प्रिमिअम प्लान |
मासिक प्लान (जुन्या किंमती) | १४९ | १९९ | ४९९ | ६४९ |
रिझॉल्यूशन | ४८० पी | ४८० पी | १०८० पी | 4K+एडीआर |
डिव्हाइस | फोन, टॅबलेट | फोन, टॅबलेट, कम्प्यूटर, टीव्ही | फोन, टॅबलेट, कम्प्यूटर, टीव्ही | फोन, टॅबलेट, कम्प्यूटर, टीव्ही |
एकाच वेळी किती डिव्हाइसवर पाहू शकता | १ | १ | २ | ४ |
नेटफ्लिक्सची ग्राहक संख्या कशी आहे?
नेटफ्लिक्ससाठी आशिया ही सर्वात लहान बाजारपेठांपैकी एक आहे. नेटफ्लिक्सच्या सबस्क्रायबरच्या बाबतीत सर्वात मोठी बाजारपेठ उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि नंतर युरोप आहे. नेटफ्लिक्सचे आशियामध्ये एकूण ३.२६ कोटी सबस्क्रायबर आहेत, जे त्याच्या एकूण सबस्क्रायबर संख्येच्या १४ टक्के आहे. नेटफ्लिक्स आता आपली वाढ आणि ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी आशियासह इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही तिमाहीत नेटफ्लिक्सचे बहुतांश सबस्क्रायबर आशियामधून आले आहेत आणि जपान आणि दक्षिण कोरियामध्ये कंपनीच्या यशाचे श्रेय याला दिले जाते. नेटफ्लिक्सला जपान आणि दक्षिण कोरियामध्ये सारखेच यश मिळाले असले तरी भारतात मात्र अद्याप तेच यश मिळालेले नाही. नेटफ्लिक्ससाठी भारतीय बाजारपेठ अजूनही एक गूढ आहे आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचीही नेटफ्लिक्ससाठी कठोर स्पर्धा आहे.
नेटफ्लिक्स पुढे काय करणार?
ग्राहकांचा ओढा वाढवा यासाठी जाहिरातींसह कमी किमतीत प्लान तयार करण्याची योजना आहे. सह सीईओ रीड यांनी सांगितलं की, “ग्राहकांना स्वस्त पर्याय उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.” यामुळे पुन्हा एकदा ग्राहकांचा कल वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.