मागच्या वर्षी कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते, सरकारने कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केले. या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला, आता याच आंदोलनाचे पडसाद उमटू लागले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या एका गायकाच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
पंजाबी गायक कंवल ग्रेवाल यांच्या घरावर सोमवारी यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर आयकर विभागाचे अधिकारी आणि सीआरपीएफच्या जवानांनी छापे टाकले. लुधियानाच्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने असे सांगितले की ग्रेवाल यांच्याविरोधात कथित करचुकवेगिरीच्या अनेक तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कंवल ग्रेवाल यांच्याबरोबरीने रणजीत बावा यांच्या घरावरदेखील धाडी टाकण्यात आल्या आहेत. द ट्रिब्यूनच्या म्हणण्यानुसार, “मोहालीच्या ताज टॉवर्स आणि भटिंडा येथील ग्रेवाल यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. पंजाबी संगीत उद्योगात वाढत्या गुन्हेगारीमुळे छापे टाकण्यात आले आहेत असे राष्ट्रीय तपास संस्था (NIA)ने सांगितले आहे.”
कोण आहेत कंवल ग्रेवाल?
कंवल ग्रेवाल हे ३८ वर्षीय असून लोकप्रिय सूफी गायक आणि गीतकार म्हणून ओळखले जातात. ग्रेवाल यांचा जन्म मेहमा सवाई, भटिंडा जिल्ह्यातील एका जाट शीख शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी एसबीसी कॉलेज, कोटकपुरा येथून पदवी आणि पंजाबी विद्यापीठ, पटियाला येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. ग्रेवाल यांनी इयत्ता६ मध्ये असताना संगीत शिकण्यास सुरुवात केली. २०१३ मध्ये त्यांचा म्युझिक अल्बम ‘अखन’ हा हिट ठरला. त्यांचा दुसरा ‘जोगीनाथ’ हा चित्रपटही चांगलाच गाजला. या गायकाने २०१६ मध्ये चित्रपट ‘अरदास’मध्ये ‘फकीरा’ गाण्याद्वारे पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी मुक्तसर साहिबच्या करमजीत कौरशी यांच्याशी त्यांचे लग्न झाले.
दिल्ली आंदोलनात सहभाग :
कंवल ग्रेवाल यांनी मागच्या वर्षी शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला तसेच त्यांनी ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत शेतकरी कायद्यांच्या निषेधार्थ १० गाणी लिहली. यातील एक गाणे युट्युबवरून केंद्र सरकारच्या आदेशामुळे काढून टाकण्यात आले. या गाण्याला अवघ्या दोन दिवसांत साठ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. अनेक वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या शीख कैद्यांची सुटका करण्याविषयी बोलणारे त्यांचे ‘रिहाई’ या गाण्यावर गृह मंत्रालयाने यूट्यूबवरून बंदी घातली होती. ‘इतिहास’, ‘झवानी जिंदाबाद’, ‘बेबे बापू दा ख्याल’, ‘आखरी फैसला’, ‘जितेगा पंजाब’ ही त्यांची इतर काही गाणी होती