ट्वीटरची सूत्रं जेव्हापासून एलॉन मस्कने हाती घेतली आहेत, तेव्हापासून तंत्रज्ञानाशी निगडीत कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचा सपाटा सुरू असल्याचे दिसत आहे. हजारो लोकांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आता त्यांच्याच मार्गावर फेसबुकची मालक असणारी ‘मेटा’ कंपनीही निघाली आहे. आता एलॉन मस्क प्रमाणाचे मार्क झुकरबर्गही वेगळ्या रणनीतीवर काम करत आहेत.
मेटा कंपनीने जवळपास ११ हजार जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आपल्या १३ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बुधवारी एक पत्र लिहिले, ज्यानंतर हे स्पष्ट झाले की तेही मस्क यांच्या मार्गावर पुढे जात आहेत.
मेटा कंपनी आपल्या १८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्याप्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहे. त्यांना कर्मचारी कपात का करावी लागत आहे? अर्थव्यवस्थेच्या हिशोबाने हे कसे आहे?, भारतावर याचा काय परिणाम होईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
‘मेटा’ वाईट काळातून जात आहे? –
‘मेटा’ला पुरेशा जाहिराती मिळत नसल्याने, जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न सातत्याने घटत आहे. कंपनीचा विविध प्रोजेक्टमध्ये समावेश असल्याने खर्चही वाढला आहे. कंपनी आता नवीन कर्मचारी घेण्याचे टाळत असून खर्चाचे प्रमाण कमी करत आहे. सध्यातरी या तिमाहीमध्ये मेटाची हीच रणनीती असणार आहे. कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या अगोदर मेटा कंपनीने काही अशी पावलं उचलली होती, ज्यावरून दिसून येत होतं की सर्वकाही ठीक नाही. मेटाचा रिअल स्टेट बिझनेसही अयशस्वी ठरला. कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्येही कपात केली, त्यामुळेच कंपनी तोट्यात चालत असल्याचं सांगितलं जात होतं.
‘मेटा’च्या व्यवसायात घसरण का? –
मेटा आपल्या महत्वकांक्षी मेटावर्स परियोजनेवर मोठी रक्कम खर्च करत आहे. मेटाला मिळणाऱ्या जाहिराती कमी झाल्या आहेत. कोविड महामारीच्या दरम्यान अनेक टेक कंपन्या पुढे आल्या होत्या. लोक लॉकडाउन आणि करोना महामारीमुळे घरांमध्ये अडकलेले होते व ऑनलाइन डिजिटल उपकरणांवर जास्त वेळ घालवत होते. महामारीला लढा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत झाले आहे. टिकटॉक सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही फेसबुकला चांगली टक्कर देत आहे.
भारतीय कर्मचाऱ्यांवर काय होणार परिणाम? –
मार्क झुकरबर्ग यांच्या या निर्णयाचा परिणाम निश्चितपणे जागतिक स्तरावरही होणार आहे. भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही टांगती तलवार असणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, त्यामुध्ये भारतीयांचाही समावेश आहे. कपातीचा परिणाम यांच्यावर झाला आहे. मार्क झुकर बर्ग यांनी स्पष्ट केले आहे की ज्यांची नोकरी जात आहे, त्यांना नोटीस पीरियड दिला जात आहे. कंपनी कोणालाही अडचणीत सोडणार नाही.
‘मेटा’च्या कर्मचाऱ्यांमध्ये २०२३ या वर्षाच्या शेवटपर्यंत वाढ करण्यात येणार नाही, असं सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं. मेटाच्या तिसऱ्या तिमाहीतील निराशाजनक निकालानंतर झुकरबर्ग यांनी ही घोषणा केली होती. २०२३ या वर्षामध्ये कंपनीचा गुंतवणुकीवर भर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
तिसऱ्या तिमाहीत मेटाचा नफा घसरून ४.४ अब्ज डॉलर्सवर आला आहे. नफा ५२ टक्क्यांनी घसरल्यानंतर आता या कंपनीतून काही कर्मचाऱ्यांना डच्चू मिळणार आहे. मेटाच्या शेअरमध्ये एका दिवसात तब्बल २५ टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर कंपनीला मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचे बाजारमूल्य ६०० अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे.