कुलदीप घायवट
कारखाने, वाहनांतून येणारा धूर, बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ, झाडांची बेसुमार कत्तल व इतर अनेक मानवनिर्मित कारणांनी वर्षातील बहुतांश काळ दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही खालावलेली असते. ऑक्टोबर महिन्यात दिल्लीजवळील पंजाब, हरियाणा आणि इतर शेजारी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पेंढा जाळला जातो. यावेळी अनेकदा हवेची पातळी धोकादायक स्थितीत असते. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत अशीच स्थिती राहते. आता मुंबईची वाटचाल याच दिशेने होत असल्याचे दिसते आहे. हवेची स्थिती अत्यंत वाईट करणारी मानवनिर्मित सर्व कारणे मुंबईतही लागू होतात. तरीही, मुंबईला लाभलेला समुद्रकिनारा आणि समुद्री वारे मुंबईला वाचवतात. मात्र, सध्या प्रदूषणाच्या पातळीने गंभीर टप्पा गाठल्याने; तसेच समुद्री वाऱ्यांची गती मंदावल्याने हवेतील प्रदूषक घटक एकाच ठिकाणी साचून मुंबईला धुरक्याने वेढले आहे. प्रदूषणाच्या पातळीत मुंबईने दिल्लीला मागे सारल्याचे दिसून येत आहे.
राज्याला धुरक्याने का वेढले आहे?
डिसेंबरच्या सुरुवातीपासून मुंबईसह राज्याच्या बऱ्याच भागाला धुरक्याने वेढले आहे. धूळ, धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने धुरके तयार होते. एखाद्या गाठ बांधलेल्या फुग्यात जशी हवा कोंडून राहते, त्या फुग्याप्रमाणेच राज्यातील हवेची अवस्था झाली आहे. सध्या वाऱ्याचा वेग १० ते २० किमी प्रति तास इतका मंदावला आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या बाष्पामुळे हवेत धुलीकण तरंगत राहतात. त्यामुळे धूलिकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर २.५) वाढले आहे. जमिनीलगतच्या थंड हवेमुळे इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते. मुंबईप्रमाणेच राज्याच्या इतर भागांमध्येही अशीच स्थिती दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसांत मुंबई, चंद्रपूर, नागपूर, कल्याण येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०० च्या पुढे गेल्याची नोंद आहे.
पीएम २.५ आणि एक्यूआय म्हणजे काय?
हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण प्रति घनमीटर क्षेत्रात किती धुलीकण हवेत आहे त्यानुसार मोजले जाते. पीएम २.५ हा हवेत विरघळलेला एक छोटासा पदार्थ असून या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटर किंवा त्याहून कमी आहे. जेव्हा पीएम २.५ ची पातळी जास्त असते, तेव्हा धुरक्याचे किंवा धूलिकणांचे प्रमाण वाढून दृश्यमानतेची पातळी घसरते. मानवी केस सुमारे १०० मायक्रोमीटरचे असून पीएम २.५ चे सुमारे ४० कण केसाच्या रुंदीवर ठेवले जाऊ शकतात. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) हवेची गुणवत्ता ठरवली जाते. ठराविक कालावधीत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देषांक निश्चित केला जातो. राष्ट्रीय वातावरणीय वायु गुणवत्ता मानके (एनएएक्यूएस) नुसार एक्यूआयची स्थिती ०-१०० असल्यास ठीक, १०१-२०० सामान्य, २०१-३०० वाईट, ३०१-४०० अत्यंत वाईट, ४०० पेक्षा जास्त असल्यास धोक्याची पातळी ओलांडून परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजण्यात येते.
कोणकोणत्या आजारांना आमंत्रण ?
धुलीकणांत कार्बन सल्फेट, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डाय डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यांचे प्रमाण आटोक्याबाहेर वाढल्यास ते जीवघेणे ठरते. त्यामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे असे आजार, तर त्वचेच्या आजारात ॲलर्जी, त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे, हृदयविकार, रक्तदाब, मेंदूची कार्यप्रणाली मंदावणे असे आजार उद्भवत आहेत. हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे रुग्णसंख्या १५ ते २० टक्के टक्क्यांनी वाढली असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.
काय काळजी घ्यावी?
सकाळी आणि सायंकाळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सध्या थंड पेये आणि तेलकट खाणे वर्ज्य केले पाहिजे. यासह योगा, व्यायाम करणे आवश्यक आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्ध, श्वसनाचे आजार असणाऱ्यांसाठी हे वातावरण अत्यंत धोकादायक असून त्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेर पडताना मुखपट्टी वापरावी, अशी माहिती श्वसनविकार तज्ज्ञ मनोज मस्के यांनी दिली.
प्रदूषण कमी करता येईल का?
अनेक ठिकाणी बांधकामे २४ तास सुरू असल्याचे दिसून येते. परिणामी, मुंबईतील बांधकामातून माती, सिमेंट-काँक्रिटचे कण मोठ्या प्रमाणात हवेत मिसळतात. तसेच कारखाने, वाहनांतून निघणारा धूर व इतर रसायनांमुळे प्रदूषणांचे प्रमाण वाढते. त्यावर निर्बंध आणणे आवश्यक आहे. बांधकामांची वेळ निश्चित करणे, सम-विषम गाडी क्रमांकावरून वाहतूक ठेवणे आवश्यक आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या नियमांचे पालन कारखाने करतात का याची वेळोवेळी तपासणी करण्याची आवश्यकता आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले.