नौदलाने नुकताच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला ज्यामध्ये भर समुद्रात नौदलाच्या सी-किंग हेलिकॉप्टरटमधून एक क्षेपणास्त्र डागले जाते. हे युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र असून ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’- ( DRDO) ही संस्था नौदलाच्या सहाय्याने विकसित करत आहे. या क्षेपणास्त्राची ही पहिली चाचणी होती. ही चाचणी नौदलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती कारण जुन्या युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्राची जागा हे नवे क्षेपणास्त्र घेणार आहे. या क्षेपणास्त्राला NASM-SR म्हणजेच Naval Anti-Ship Missile–Short Range म्हंटले जात आहे. मराठीत याला ‘नौदलाचे लघु पल्ल्याचे युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र’ असं म्हणता येईल.
युद्धनौकाभेदी NASM-SR क्षेपणास्त्राचा विकास
नौदलाची ताकद जशी विविध प्रकारच्या युद्धनौकांच्या समावेशाने वाढते तशी शत्रु पक्षाच्या युद्धनौकांना नेस्तनाबुत करणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे ती आणखी मजबूत होते. भारतीय नौदल आता युद्धनौकांच्या बांधणीत जवळपास स्वयंपूर्ण झालं आहे. नौदलात ‘ब्रह्मोस’ हे क्षेपणास्त्र जरी दाखल झाले असले तरी अस्सल युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र म्हणून ब्रिटीश बनावटीचे Sea Eagle हे क्षेपणास्त्र १९९० च्या दशकापासून अजुनही वापरात आहे. तेव्हा Sea Eagle ची जागा स्वदेशी बनावटीचे NASM-SR हे युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र घेणार आहे. विशेषतः नौदलाच्या ताफ्यातून सी-किंग हेलिकॉप्टर निवृत्त होणार असून त्याची जागा अमेरिकेतील Sikorsky कंपनीची SH-60R ही बहुउद्देशीय हेलिकॉप्टर घेणार आहेत. तेव्हा त्या नव्या हेलिकॉप्टरमधून सुद्धा NASM-SR क्षेपणास्त्र डागता येणार आहे. २०१८ ला क्षेपणास्त्राचा पहिल्यांदा उल्लेख तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केला, या क्षेपणास्त्राच्या संशोधन आणि विकासाकरता सुमारे ४३४ कोटी रुपयांची तरतूद केल्याची त्यांनी माहिती दिली. २०२० च्या DefExpo 2020 या संरक्षण विषयक जागतिक प्रदर्शनात NASM-SR प्रतिकृती पहिल्यांदा बघायला मिळाली. DRDO ने गेल्या ४० वर्षात विविध प्रकारची क्षेपणास्त्रे विकसित केली असल्याने NASM-SR हे युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र आणखी काही मोजक्या चाचण्यांचे सोपस्कार पार पाडत लवकरच नौदलात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.
NASM-SR क्षेपणास्त्र नेमकं कसं आहे ?
NASM-SR क्षेपणास्त्राचे वजन सुमारे ३८० किलो असून क्षेपणास्त्राच्या टोकावर असलेल्या दारुगोळ्याचे वजन हे सुमारे १०० किलो आहे. म्हणजेच जेव्हा हे क्षेपणास्त्र एखाद्या युद्धनौकेवर किंवा छोट्या जहाजावर किंवा लक्ष्यावर आदळेल तेव्हा या १०० किलो वजनाच्या स्फोटकाचा स्फोट होईल. जास्तीत जास्त तीन किलोमीटर उंचीवरुन हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकणार आहे. क्षेपणास्त्राचा पल्ला हा जास्तीत जास्त ५५ किलोमीटर एवढा आहे. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राचा वेग हा सबसोनिक – sub-sonic म्हणजेच आवाजाच्या वेगापेक्षा काहीसा कमी आहे. ( आवाजाचा वेग ३४३ मीटर प्रति सेकंद ).
NASM-SR क्षेपणास्त्र का प्रभावी ठरेल ?
नुकतंच रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनने ‘Neptune’ या युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांचा अचुक वापर करत रशियाच्या अत्यंत महत्त्वाच्या ‘मास्कवा’ या क्षेपणास्त्रवाहु युद्धनौकेचे नुकसान केले. इंधन टाकीचा वेध क्षेपणास्त्राने घेतल्याने युद्धनौकेवर मोठे स्फोट झाले आणि युद्धनौका बुडाली. तेव्हा NASM-SR क्षेपणास्त्र क्षमतेने आणि पल्ल्याने जरी लहान असले तरी अचुक लक्ष्यभेद झाल्यास शत्रुपक्षाच्या युद्धनौकेचे जबर नुकसान होऊ शकते. एवढंच नाही तर NASM-SR क्षेपणास्त्राच्या सहाय्याने जमिनीवरील लक्ष्याचाही वेध घेता येणे शक्य होणार आहे. त्यामुळेच NASM-SR क्षेपणास्त्रामुळे भविष्यात भारतीय नौदलाच्या ताकदीत मोलाची भर पडणार आहे.