निशांत सरवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जॅान्सन अँड जॉन्सन’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या गेली अनेक वर्षे प्रसिद्ध असलेल्या जॅान्सन बेबी पावडरचे उत्पादन परवाना कायमचा रद्द करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत. नवजात शिशु, बालकांसाठी ही बेबी पावडर सर्रास वापरली जाते. मात्र या पावडरमुळे त्वचेला इजा होऊ शकते, याची खात्री पटल्याने ही कारवाई केली आहे. पण या कंपनीचे हे प्रसिद्ध उत्पादन कायमचे बंद होणार की पुन्हा सुरू होणार? कारण अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये या कंपनीच्या टाल्क बेबी पावडरवर बंदी आली आहे.

काय प्रकरण आहे?

अन्न व औषध प्रशासनामार्फत ठराविक कालावधीत सौंदर्य प्रशासनाची अचानक तपासणी केली जाते. नाशिक, पुणे येथील उत्पादनांचे नमुने संबंधित औषध निरीक्षकांनी याच तपासणीअंतर्गत घेतले. हे नमुने तपासणीसाठी मुंबईतील औषध नियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तेथील शासकीय विश्लेषकांनी हे नमुने राष्ट्रीय मानकानुसार नसल्याचा अहवाल दिला. नवजात शिशु वा बालकाच्या त्वचेला योग्य असेल असे ‘पीएच’ प्रमाण (पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन – आम्लधर्मी व अल्कधर्मी प्रमाण ) प्रसाधनात असणे आवश्यक असते. त्यासाठी मानक निश्चित केलेले असते.

हेही वाचा – विश्लेषण : कोर्टातल्या कामकाजावर टिप्पणी केली म्हणून प्रसिद्ध यूट्यूबर सवुक्कू शंकर यांना झाला तुरुंगवास! नेमकं काय आहे प्रकरण?

काय कारवाई?

मुंबईतील औषध नियंत्रण प्रयोगशाळेच्या विश्लेषकांचा अहवाल मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने, सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदींनुसार उत्पादन परवाना रद्द का करण्यात येऊ नये अथवा नमूद केलेल्या परवान्याअंतर्गत मंजूर असलेल्या सौंदर्य प्रसाधनाची उत्पादन अनुमती निलंबित / रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कंपनीस सदर उत्पादनाचा साठा बाजारातून परत बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

कारवाई झाली का?

औषध नियंत्रण प्रयोगशाळेच्या शासकीय विश्लेषकांचा अहवाल मान्य नाही, असे उत्तरादाखल कंपनीने कळवले. तसेच केंद्रीय औषधप्रयोगशाळेकडून फेरचाचणी होण्यासाठी नाशिक व पुणे न्यायालयात अर्ज केला. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाला आपली कारवाई तात्पुरती थांबवावी लागली.

अहवाल काय?

कोलकाता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून नमुन्यांची फेरचाचणी करण्यात आली. या अहवालातही नमुने राष्ट्रीय मानकानुसार प्रमाणित नाहीत, असे नमूद करण्यात आले. सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार उत्पादनासाठी परवाना दिला जातो. त्यावेळी उत्पादनासाठी मानके ठरवून दिलेली असतात. त्यानुसार कंपनीची उत्पादने आहेत का याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जाते.

विश्लेषण : क्रिकेटच्या संघात आता ११ नाही तर १५ खेळाडू दिसणार; काय आहे नवा ‘इम्पॅक्ट प्लेअर रुल?’ जाणून घ्या

पुढे काय?

कंपनीला मुलुंड येथील केंद्रात जॅान्सन बेबी पावडरचे उत्पादन थांबवावे लागेल. मात्र वापी व गुजरात येथील उत्पादनावर कोणतीही बंदी नाही. तेथील अन्न व औषध प्रशासनाला केंद्रीय औषध प्रयोगशाळेचा अहवाल पाठविला जाईल. त्यानंतर तेथील प्रशासन कारवाईबाबत निर्णय घेईल. मात्र तेथे झालेली उत्पादने कंपनीला महाराष्ट्रात विकता येतील.

अन्न व औषध प्रशासन काय म्हणते?

जॅान्सन बेबी पावडरचा प्रामुख्याने नवजात बालकांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे सदर उत्पादनाचे पीएच हे प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त उत्पादन सुरू ठेवणे हे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. म्हणून कंपनीच्या मुलुंड उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त गौरीशंकर बायले यांचे म्हणणे आहे. संचालक, केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कोलकत्ता यांचा अहवाल पुरावा मानून अन्न व औषध प्रशासनाला कारवाई करतायेते.

पुन्हा उत्पादन सुरू करता येईल का?

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईविरोधात कंपनीला संबंधित मंत्र्यांकडे अपील करता येईल. त्यानंतरही समाधान न झाल्यास उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापुढे दाद मागता येईल. या काळात मुंबईतील कंपनीत उत्पादन सुरू करता येणार नाही. या निर्णयाविरोधात कंपनीला अनुकूल आदेश मिळाला तर हे उत्पादन पुन्हा सुरू करता येईल.

nishant.sarvankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why johnson and johnson baby powder manufacturing license cancelled in maharashtra print exp sgy
Show comments