केंद्रीय तपास यंत्रणा सध्या देशभरात सक्रीय आहेत. राजकीय नेत्यांच्या पाठोपाठ आता ईडीच्या रडारवर अभिनेते, अभिनेत्री आले आहेत. सुकेश प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीने चौकशी केली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा हा अभिनेतादेखील काल ईडीच्या चौकशीला सामोरा गेला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘लायगर’ चित्रपटासंदर्भात त्याची ईडीने हैदराबाद येथील कार्यालयात चौकशी करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
विजय देवरकोंडा ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याचा लायगर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. या चित्रपटाचे बजेट जवळपास १२० कोटींचे होते मात्र चित्रपटाने ४० कोटींची कमाई केली. अशातच काँग्रेस तेलंगणाचे नेते बक्का जडसन यांनी चित्रपटासंदर्भात ईडीकडे तक्रार दाखल केली. त्यांचं असं म्हणणं आहे की चित्रपटामध्ये जी गुंतवणूक केली आहे ती गैर मार्गाने केली आहे. तसेच राजकारण्यांनीही या चित्रपटात पैसे गुंतवले असा दावा त्यांनी ईडीसमोर केला आहे. गुंतवणूकदारांनी आपला काळा पैसा या चित्रपटाच्या माध्यमातून पांढरा केला आहे. असे आरोप त्यांनी केले आहेत. विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विजयची चौकशी करण्यात आली होती.
विश्लेषण: वादाआधीचे आणि नंतरचे…नदाव लापिड यांचे ज्ञात-अज्ञात पैलू!
या प्रकरणात विजयच्या आधी चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि निर्माती चार्मे कौर यांची ईडीने चौकशी केली होती. त्यांना १५ दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. परदेशातून चित्रपटाच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये गुंतवल्याच्या आरोपाबाबत दिग्दर्शक आणि निर्मात्याची चौकशी केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीला असा संशय आहे की, अनेक कंपन्यांनी निर्मात्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले आहेत. ईडीने त्यांना माईक टायसन, परदेशी कलाकार आणि तंत्रज्ञ यांना कशा पद्धतीने पैसे दिले आहेत याचे पुरावे दाखल करण्यास सांगितले आहे.
‘लायगर’ चित्रपट इतर वाद :
प्रदर्शनाच्या आधी आणि प्रदर्शनानंतरदेखील हा चित्रपट सतत चर्चेत येत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विजय देवरकोंडाने आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’च्या चित्रपटाला समर्थन दिले होते त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर #बॉयकॉट लायगर असा ट्रेंड सुरु केला होता. तसेच विजयने प्रमोशन दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते ज्यामुळे त्याच्या चित्रपटाला बॉयकॉट करण्यात आले होते. विजय देवरकोंडाबरोबर अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन, राजीव रॉय, मकरंद देशपांडे या कलाकारांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.