अन्वय सावंत
जगातील अव्वल बुद्धिबळपटू आणि जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने सिनक्वेफिल्ड चषक स्पर्धेतून अचानक माघार घेतली. चौथ्या फेरीच्या सामन्यापूर्वी कार्लसनने ‘ट्वीट’ करत आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याची माहिती दिली. त्याच्या या निर्णयाबाबत बुद्धिबळ विश्वातील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच या ‘ट्वीट’मध्ये त्याने नामांकित फुटबॉल प्रशिक्षक जोसे मोरिनियो यांची चित्रफितही जोडली. ‘‘मी जर काही बोललो, तर मोठ्या अडचणीत सापडेन,’’ असे मोरिनियो त्या चित्रफितीमध्ये म्हणत होते. त्यामुळे कार्लसनला नक्की काय संदेश द्यायचा आहे आणि त्याने या स्पर्धेतून अचानक माघार घेण्यामागे काय कारण आहे, असा अनेकांना प्रश्न पडला. हान्स निमन या तुलनेने नवख्या बुद्धिबळपटूकडून अनपेक्षित पराभूत झाल्यानंतर कार्लसनने हा निर्णय घेतला, तेव्हा निमनने बहुधा फसवणूक (चीटिंग) करून डाव जिंकला, अशी चर्चा सुरू झाली. निमनने अर्थातच या आरोपांचा इन्कार केला आहे.
कार्लसनने माघार घेत असल्याचा निर्णय कधी जाहीर केला?
सिनक्वेफिल्ड चषक स्पर्धेच्या तीन फेऱ्यांअंती कार्लसनच्या खात्यावर १.५ गुण होते. सोमवारी (५ सप्टेंबर) चौथ्या फेरीत त्याच्यापुढे अझरबैजानचा ग्रँडमास्टर शख्रियार मामेदेरोव्हचे आव्हान होते. मात्र, या सामन्याची वेळ सुरू झाल्यानंतरही कार्लसन बुद्धिबळ पटाजवळ आला नाही. अखेर सामन्यासाठी आगमनाचा १० मिनिटांचा कालावधी संपल्यावर त्याला पराभूत घोषित करण्यात आले. या सामन्यापूर्वी आपण या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे कार्लसनने ‘ट्विटर’च्या माध्यमातून जाहीर केले होते.
विश्लेषण : फुटबॉलपटू पॉल पोग्बा जादूटोणा करतो? भावानेच केला आरोप; नक्की काय आहे प्रकरण?
कार्लसनने ‘ट्विटर’द्वारे काय मांडले?
‘‘मी स्पर्धेतून (सिनक्वेफिल्ड चषक) माघार घेत आहे. सेंट लुइस बुद्धिबळ क्लबमध्ये खेळताना मला कायमच खूप मजा येते आणि भविष्यात पुन्हा या स्पर्धेत खेळण्याची आशा आहे,’’ असे कार्लसनने त्याच्या ‘ट्वीट’मध्ये लिहिले. त्याने या स्पर्धेबाहेर जाण्याचे कारण स्पष्ट करणे टाळले. मात्र, या ‘ट्वीट’मध्ये त्याने मोरिनियो यांची चित्रफित जोडल्याने चर्चांना उधाण आले.
तिसऱ्या फेरीत निमनने फसवणूक केल्यामुळे कार्लसनची माघार?
कोणतीही मोठी स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्यातून माघार घेण्याची ही कार्लसनची पहिलीच वेळ होती. त्याने आरोग्याच्या कारणास्तव ही माघार घेतली असावी असे अनेकांना वाटले. मात्र, अमेरिकेचा ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले. सिनक्वेफिल्ड चषक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत कार्लसनला अमेरिकेच्या १९ वर्षीय हान्स निमनने अनपेक्षितरीत्या पराभूत केले होते. या सामन्यात काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या निमनने फसवणूक केल्याची शंका आल्यामुळे कार्लसनने स्पर्धा अर्ध्यावरच सोडल्याची शक्यता आहे, असे नाकामुरा समाजमाध्यमांवर व्यक्त होत म्हणाला.
कार्लसनविरुद्धच्या विजयानंतर निमन काय म्हणाला?
कार्लसन आणि वेस्ली सो यांच्यात २०१८मध्ये लंडन येथे सामना झाला होता. या सामन्यात कार्लसनने जी-३ निम्झो-इंडियन डावाचा वापर केला होता आणि त्याच्याआधारे आपण या सामन्याची तयारी केली, असे कार्लसनविरुद्धच्या विजयानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये निमन म्हणाला. मात्र, २०१८च्या लंडन स्पर्धेत मी सहभागीच झालो नव्हतो, असे वेस्लीने स्पष्ट केले. परंतु कार्लसन आणि वेस्ली यांच्यात २०१९मध्ये कोलकाता येथे सामना झाला होता व या सामन्यात कार्लसनने जी-३ निम्झो-इंडियन डावाचा वापर केला होता, असे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) उपाध्यक्ष नायजल शॉर्ट यांनी सांगितले.
कार्लसनच्या माघारीबाबत ‘फिडे’ची काय प्रतिक्रिया आहे?
‘‘स्पर्धेतील कामगिरी कशीही असो, पण कार्लसनने यापूर्वी कधीही माघार घेतली नव्हती. आताही ठोस कारण असल्याशिवाय तो हे पाऊल उचलणार नाही. तो पराभूत झाल्यानंतर कारणे देणारा किंवा प्रतिस्पर्ध्याचा अनादर करणारा खेळाडू नाही. त्याने स्पर्धेतून माघार का घेतली, याचे तर्कवितर्क मी लावणार आहे,’’ असे ‘फिडे’चे महासंचालक एमिल सुतोवस्की म्हणाले. कार्लसनने माघार घेतल्यानंतर चौथ्या फेरीच्या सामन्यांना १५ मिनिटे उशिराने सुरुवात झाली. या वेळेत कोणीही फसवणूक करू नये, यासाठी अतिरिक्त तपासण्या करण्यात आल्या.