प्रल्हाद बोरसे
सन २००८ मध्ये नाशिक जिल्ह्यतील मालेगाव येथील भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेला यंदा २९ सप्टेंबर रोजी १४ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्फोटाशी संबंधित खटला न्यायालयात अजूनही सुरू आहे. हा खटला निकाली निघण्यास आणखी किती दिवस लागतील, अशी विचारणाच त्यामुळे उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात ‘एनआयए’कडे केली आहे.
बॉम्बस्फोटाचे हे प्रकरण नेमके काय?
सन २००८ मध्ये, रमजान सण काही तासांवर येऊन ठेपल्याने नवे कपडे आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी मुस्लीम आबालवृद्धांची लगबग सुरू असताना २९ सप्टेंबर २००८ च्या रात्री पावणेदहाच्या सुमारास गजबजलेल्या भिक्कू चौकातील एका दुकानाबाहेर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीत पेरून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. या घटनेत सात जणांचा मृत्यू आणि ९२ जण जखमी झाले होते. मोठय़ा प्रमाणावर चेंगराचेंगरीही झाली होती. याआधी दोन वर्षांपूर्वी २००६ मध्ये शहरातील बडा कब्रस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात ३१ जण मृत्युमुखी आणि तीनशेहून जास्त रहिवासी जखमी झाले होते. संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात दुसऱ्यांदा बॉम्बस्फोट होतो, एकंदर ३८ बळी तात्काळ जातात तरीही तपास संथ कसा, यावरून मोठी खळबळ उडाली. या वेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले होते. घटनास्थळी तातडीने गेलेले मालेगावचे तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्यावरही जमावाने हल्ला केला होता. त्या वेळी अंगरक्षक आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखून हवेत गोळीबार केल्याने प्रभू हे बालंबाल बचावले होते.
या खटल्यातील संशयित कोण?
बॉम्बस्फोटप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या गृह मंत्रालयाने दुसऱ्याच दिवशी हा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला. २६/११च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे हे अधिकारी या पथकाचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात संशयित म्हणून साध्वी प्रज्ञा सिंह यांचे नाव आले. या पथकाने प्रारंभी प्रज्ञा सिंहसह काही संशयितांना अटक केली. नंतर या गुन्ह्यात काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे तपासात समजले. त्यानुसार लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. प्रज्ञा, पुरोहित आणि उपाध्याय हे या कटाचे सूत्रधार असल्याचे आणि स्फोटात वापरलेली दुचाकी ही प्रज्ञा यांचीच असल्याचा दावा एटीएसने केला होता. यानंतर राजकीय पटलावर ‘भगवा दहशतवाद’ अशी मांडणी करणे सुरू झाले.
तपास यंत्रणांपुढील आव्हान काय?
सन २०११ मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. श्रीकांत पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर या सात जणांविरुद्ध एनआयएच्या विशेष न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. हे सातही संशयित सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणातील संशयित साध्वी प्रज्ञा सिंह यांनी जामिनावर असताना २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून भाजपची उमेदवारी मिळवली आणि त्या विजयीदेखील झाल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशच्या या राजधानीत आले नाहीत, परंतु नजीकच्या छतरपूर येथील निवडणूक प्रचार सभेत २४ एप्रिल २०१९ रोजी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी, साध्वी प्रज्ञा यांना या खटल्यात नाहक गोवण्यात आल्याचा दावा जाहीरपणे केला होता.
खटल्याच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान आजवर २६ साक्षीदारांनी घूमजाव केले आहे. इतकेच नव्हे तर तपास यंत्रणांनी विशिष्ट लोकांची नावे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोपही काहींनी केल्याचे उघड झाले.
खटल्यास विलंब का?
या खटल्याच्या कामकाजास विलंब होत असल्याची तक्रार करत त्याविरुद्ध या खटल्यातील एक संशयित समीर कुलकर्णी याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सूचना देऊनही हे काम संथपणे सुरू असल्याचा कुलकर्णी याचा आक्षेप आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने हा खटला पूर्ण करण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न एनआयएला विचारला. त्यावर प्रत्येक सुनावणीच्या वेळी किमान दोन साक्षीदारांना हजर ठेवण्यात येत असते; परंतु अनेकदा एकाच साक्षीदाराची साक्ष नोंदविण्याचे काम अनेक दिवस सुरू असते, असे एनआयएतर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आले. एका साक्षीदाराची तर तब्बल नऊ दिवस साक्ष तपासणी झाली. ही तपासणी न्यायालय किंवा आम्ही थांबवू शकत नाही. त्यामुळे खटल्यास विलंब होत असल्याचा युक्तिवाद एनआयएच्या वकिलांनी न्यायालयात केला. आरोपींकडून केले जाणारे वेगवेगळे अर्ज हेदेखील खटल्याच्या कामकाजास विलंब होण्याचे एक कारण ठरते. त्यानुसार या खटल्यात आतापर्यंत आरोपींनी ७१९० अर्ज केल्याची माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली.
खटल्याचे पुढे काय होणार?
मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला, अजमेर स्फोट, समझोता एक्स्प्रेस स्फोट यासारखे खटले यापूर्वीच निकाली निघाले असले तरी २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीचे काम अद्याप सुरूच आहे. खटल्यात आतापर्यंत २७१ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. एकूण ४९५ साक्षीदारांना तपासण्यात येणार असल्याचे याआधी एनआयएने स्पष्ट केले होते. त्यावरून सुनावणीचे अद्याप बरेच काम शिल्लक असल्याचे दिसत आहे. खटल्याची एकूणच व्याप्ती बघता निकालासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतरही ‘यांचा सहभाग होता/ नव्हता’ अशा प्रकारचा निकाल येणार की स्फोट कोणी व का घडवला हेही उघड होणार, हे निश्चित नाहीच.
borsepralhad@gmail.com