मॅकडोनल्ड्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह इस्टरब्रूक यांनी कंपनीला १०५ दशलक्ष डॉलर्सची रक्कम परत केली आहे. स्टीव्ह यांनी ही रक्कम रोख आणि स्टॉक्स म्हणजेच शेअर्सच्या माध्यमातून कंपनीला परत केली आहे. जगातील सर्वात आघाडीच्या फास्ट फूड कंपन्यांपैकी एक असणाऱ्या मॅकडोनल्ड्सने दाखल केलेल्या याचिकेनंतर तडजोड म्हणून स्टीव्ह यांनी ही रक्कम परत केलीय. स्टीव्ह यांनी पदावर असताना कंपनीमधील कर्मचाऱ्यांशी खासगी संबंध ठेऊन त्याबद्दलची माहिती लपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला. स्टीव्ह यांना कंपनीने निलंबित केलं होतं. कंपनीचे नियम मोडून स्टीव्ह यांनी परस्पर संमतीने कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबतच नातं ठेवल्याचं उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.
कोण आहेत स्टीव्ह इस्टरब्रूक?
स्टीव्ह इस्टरब्रूक हे ५२ वर्षीय ब्रिटीश उद्योग व्यवस्थापक म्हणून कॉर्परेट जगतामधील नवाजलेलं नाव आहे. त्यांचा जन्म इंग्लंडमधील वॉटफोर्टमध्ये झाला. त्यांनी डर्हम विद्यापिठामधून नॅचरल सायन्स विषयामध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर ते १९९३ सालापासून मॅकडोनल्ड्ससोबत काम करु लागले. २००६ साली त्यांच्याकडे मॅकडोनल्ड्स युकेचा कारभार सोपवण्यात आला आणि त्यांना मॅकडोनल्ड्स युरोपचे अध्यक्ष हे पद देण्यात आलं. २००७ साली त्यांना कंपनीचा स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, नॉर्व आणि आयर्लंडमधील उद्योग संभाळण्यास सांगितलं. त्यांना उत्तर युरोपमधील कंपनीच्या व्यवहारांचं प्रमुखपदही देण्यात आलं. २०११ साली स्टीव्ह यांनी मॅकडोनल्ड्स कंपनीला रामराम केला आणि ते पिझ्झा एक्सप्रेस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यानंतर २०१३ साली स्टीव्ह यांनी पुन्हा मॅकडोनल्ड्स कंपनी जॉइन केली. ते वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ब्रॅण्डींगसंदर्भातील मुख्य अधिकारी पदावर रुजू झाले. कंपनीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करेपर्यंत ते पदावर कार्यरत होते. त्यांचे एका महिला कर्मचाऱ्यासोबत जवळचे खासगी संबंध असल्याचं उघड झाल्यानंतर त्यांना पदावरुन बडतर्फ करण्यात आलं.
माफी मागितली…
मॅकडोनल्ड्सने जारी केलेल्या पत्रकामध्ये स्टीव्ह यांनी, “मॅकडोनल्ड्स आणि कंपनीच्या कार्यकारी मंडळाने त्यांच्या ग्राहकांचा आणि लोकांचा आधी विचार करण्याचं धोरण स्वीकारत योग्य निर्णय घेतलाय. मी सीईओ म्हणून काही जबाबदार पार पाडण्यात आणि कंपनीची मूल्य जपण्यामध्ये कमी पडलो. एक नेतृत्व करणारा अधिकारी म्हणून मी अपयशी ठरलो. मी माझ्या माजी सहकाऱ्यांची, बोर्डाची आणि कंपनी फ्रेन्चायझी मालकांची तसेच पुरवठादारांची माफी मागतो,” असं म्हटलंय.
शरीरसंबंध नसल्याचा दावा…
मॅकडोनल्ड्सने स्टीव्ह यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात स्पष्टीकरण देताना चौकशीदरम्यान स्टीव्ह यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत नातं असल्याचं मान्य केलं. मात्र आपण कधीच कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत, असं स्टीव्ह यांनी म्हटलंय.
प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न…
मॅकडोनल्ड्सने केलेल्या तपासामध्ये स्टीव्ह दोषी आढळून आले असून त्यांनी कंपनीच्या नियमांचा भंग केल्याचं उघड झालं. स्टीव्ह यांनी कंपनीमधील कर्मचाऱ्यासोबतचं आपलं नातं लपवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. कंपनीच्या बोर्डाने स्टीव्ह यांच्याविरोधात खोटारडेपणा, फसवणूक आणि कंपनीच्या नैतिक मुल्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप निश्चित करत कारवाई केलीय. कंपनीने या प्रकरणामध्ये स्टीव्ह यांना निलंबित करुन प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला. द न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार स्टीव्ह यांना निलंबित करताना ४० मिलियन अमेरिकन डॉलर्सची रक्कम देण्यास बोर्डाने मान्यता दिली होती.
पण ते फोटो आणि व्हिडीओ समोर आले अन्…
मात्र प्रकरण इथेच संपलं नाही जुलै २०२० मध्ये मॅकडोनल्ड्सच्या कार्यालयामध्ये एक निनावी पत्र आलं. यामध्ये स्टीव्ह हे सीईओ पदावर असताना त्यांचे एका कर्मचाऱ्याशी शारीरिक संबंध असल्याचा दावा करण्यात आलेला. या पत्राच्या आधारे मॅकडोनल्ड्सने अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या चौकशीदरम्यान पॉर्नोग्राफीक पुराव्यांच्या आधारे स्टीव्ह यांचे कंपनीमधील तीन कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध असल्याचं उघड झालं. कंपनीने स्टीव्ह यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आमच्याकडे पुरावा म्हणून अनेक नग्नावस्थेतील, अर्धनग्नावस्थेतील तसेच अश्लील फोटो आणि व्हिडीओ आहेत, असं सांगितलं. या फोटो आणि व्हिडीओंमधील महिलांमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्याही समावेश आहे, असंही कंपनीने म्हटलं.
फोटो व्हिडीओ कधीचे?
फोटो आणि इतर पुराव्यांवरुन हे सर्व व्हिडीओ २०१८ च्या शेवटी आणि २०१९ च्या सुरुवातील चित्रित करण्यात आल्याचं स्पष्ट होत असल्याचं कंपनीने याचिकेत म्हटलं होतं. या पुराव्यांवरुन स्टीव्ह यांनी यापूर्वी कंपनीने केलेल्या चौकशीमध्ये खोटी माहिती दिल्याचंही उघडं झाल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलेलं. या महिला कर्मचाऱ्यांपैकी एकीसोबत पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर स्टीव्ह यांनी तिला मोठ्या प्रमाणात मर्यादित स्टॉक्सपैकी काही वाटा दिल्याचे पुरावेही कंपनीच्या हाती लागले. त्यानंतरच कंपनीने स्टीव्ह यांच्याविरोधात याचिका दाखल केली.
कंपनीची याचिका आणि १०५ दशलक्ष डॉलर्सचा दंड
नंतरच्या तपासामध्ये स्टीव्ह यांचा खरा चेहरा समोर आल्याने आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही गंभीर कारवाई न करता मोठी रक्कम देत प्रकरण निलंबनानंतर बंद केलं होतं. मात्र आता त्या तपासामध्ये स्टीव्ह यांनी खरी माहिती लपवलेली असं उघड होत असल्याने आम्ही स्टीव्हविरोधात याचिका दाखल करत आहोत असं कंपनीने याचिकेत म्हटलं होतं. ही याचिका मान्य करण्यात आली असून कंपनीच्या बाजूने निकाल लागल्याने स्टीव्ह यांना आता १०५ दशलक्ष (साडेदहा कोटी) डॉलर्सची रक्कम परत करावी लागली आहे.