भक्ती बिसुरे
एखाद्या ठिकाणी एकत्र जमलेल्या लोकांपैकी काही लोकांना डास चावतात आणि काहींना मात्र त्यांचे अस्तित्व जाणवतही नाही. अशा वेळी ‘सगळे डास मलाच का चावतात?’ किंवा ‘बाकी कोणालाच डास कसे चावत नाहीत?’ हा संवाद आवर्जून घडतोच. काही माणसांना खरेच इतरांपेक्षा अधिक डास का चावतात, ती ‘मस्किटो मॅग्नेट्स’ का असतात, डासांना दूर कसे ठेवावे, डास चावल्याने जीवघेणे आजार होतात का, याबाबतचा आढावा घेणारे हे विश्लेषण.
डास कोणाला चावतात?
डास सहसा मानवाकडे फारसे आकर्षित होत नाहीत. फक्त डासाची मादी चावते आणि तेही अंडी योग्यपणे घालण्यासाठी शरीरात पोषक द्रव्य मिळवण्यासाठी ती चावण्यायोग्य प्राणी शोधते. सहसा चावणारे डास लहान प्राण्यांचीच निवड करतात. डासांना जास्त उडता येत नाही. त्यामुळे त्यांची दृष्टीही तेवढी चांगली नाही. त्यांना अन्न शोधण्यासाठी हालचाली आणि रंग यांवर अवलंबून राहावे लागते. लॅक्टिक ॲसिड, कार्बन डायऑक्साईड अशा काही गोष्टी डासांना आकर्षित करतात. गडद रंगाचे कपडे, आकार, हलत्या वस्तू डासांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात. सहसा लोकसंख्येपैकी २० टक्के लोकसंख्येला सरासरीपेक्षा जास्त डास चावतात. डास आकर्षित होणे ही गोष्ट सुमारे ८५ टक्के अनुवांशिक असते. रक्ताचा प्रकार, त्वचेवरील लॅक्टिक ॲसिड किती प्रमाणात तयार होते यावर डास तुमच्याकडे आकर्षित होणार का हे ठरते. पर्फ्युमचा वापर, आहारातील खारट पदार्थांचे किंवा पोटॅशियमचे प्रमाण यांमुळे डास चावण्याचा धोका वाढतो असा एक समज आहे, मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – विश्लेषण: ‘जॅान्सन बेबी पावडर’वर बंदी?
डास चावण्याचा सर्वाधिक धोका कोणाला?
काही विशिष्ट परिस्थितीतील व्यक्तींना डास चावण्याचा धोका नेहमीच अधिक असतो. यामध्ये गरोदर महिलांचा समावेश आहे. लठ्ठ व्यक्ती उच्छवासातून कार्बन डायऑक्साईड अधिक प्रमाणात बाहेर सोडतात, त्यामुळे त्यांना डास चावण्याचा धोका जास्त आहे. ए किंवा बी रक्तगटाच्या तुलनेत ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींना किंवा शरीराचे तापमान जास्त असलेल्या व्यक्तींना डास चावण्याचा धोका अधिक असतो. अल्कोहोल सेवन केलेल्या, नुकताच व्यायाम केलेल्या व्यक्तींचा चयापचयाचा दर आणि उच्छवासातून कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचे प्रमाण अधिक असल्यास त्यांना जास्त डास चावतात. ज्यांना घाम जास्त येतो, त्वचेवरील छिद्रांद्वारे लॅक्टिक ॲसिड, युरिक ॲसिड आणि ऑक्टेनॉल स्रवण्याचे प्रमाण जास्त असेल तर डास चावण्याचे प्रमाण जास्त असते. गडद रंगाचे कपडे घालणाऱ्यांना इतरांपेक्षा जास्त डास चावतात. आंघोळ न करणे, अस्वच्छ कपडे घालणे यामुळे मलेरिया वाहक डास आकर्षित होण्याचा धोका वाढतो. घाम येत नसेल आणि श्वासाचा वेग अधिक नसेल तर तुम्हाला कमीत कमी डास चावतील. डास ज्यांच्याकडे अजिबात आकर्षित होत नाहीत त्यांच्यामध्ये उपजतच डासांना दूर ठेवणारे काही विशिष्ट रसायन असण्याची शक्यता असते, मात्र ते कोणते याबाबत संशोधन अद्याप यशस्वी झालेले नाही, असे शास्त्रज्ञ सांगतात.
डासांना दूर ठेवण्यासाठी काय करावे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते डास चावण्यामुळे दरवर्षी जगात १० लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू होतो. डास तुमच्याकडे आकर्षित होत असतील तर घाम येणार नाही याची काळजी घ्या. व्यायाम केल्यानंतर नियमित आंघोळ करा. हलक्या रंगाचे कपडे, संपूर्ण बाह्यांचे कपडे वापरण्यास प्राधान्य द्या. सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळा. घर आणि परिसरात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या, कारण तिथे डासांची पैदास होण्याची शक्यता अधिक असते. डासांच्या पैदाशीवर नियंत्रण ठेवण्यामुळे तुम्ही डास आणि त्यांच्यापासून होणारा संसर्ग यांची शक्यता नियंत्रणात ठेवू शकता. डास चावू नयेत म्हणून डास प्रतिबंधक कॉईल, क्रीम, औषधे यांचा वापर करणेही शक्य आहे. डासांना आकर्षित करून त्यांना मारणारी काही उपकरणेही बाजारात उपलब्ध असल्याने डास चावू नयेत यासाठी त्या उपकरणांचा वापर करणे शक्य आहे.
डासांना दूर ठेवणे का आवश्यक?
डास हे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या, हत्तीपाय यांसारख्या कीटकजन्य आजाराचे वाहक म्हणून काम करतात. त्यामुळे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, उलट्या, अतिसार अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास हे आजार जीवघेणेही ठरतात. त्यामुळे डासांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि डास चावणार नाहीत याची खबरदारी घेणे हे आवश्यकच आहे. तुमच्या परिसरात किंवा शहरात कीटकजन्य आजारांचे प्रमाण अधिक असेल तर तुम्ही डासांना दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, आजाराची लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.