सौरभ कुलश्रेष्ठ
मुंबईत बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या तीन वीज वितरण कंपन्यांकडून वीजपुरवठा होतो. त्यापैकी टाटा पॉवरचा ट्रॉम्बे येथील ९३० मेगावॉटचा प्रकल्प वगळला तर बाकीची सर्व वीज बाहेरून मुंबईत आणावी लागते. त्यासाठी उच्च दाब पारेषण वाहिन्या आहेत. या पारेषण वाहिन्या मुंबईच्या सीमेवर महापारेषण या राज्य सरकारच्या कंपनीच्या वाहिन्यांशी जोडल्या गेलेल्या आहेत. मुंबईत वीज आणणाऱ्या पारेषण वाहिन्यांपैकी २ वाहिन्या या मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे बंद होत्या. म्हणजेच पारेषण क्षमतेत घट झाली होती. तशात सकाळी ०८ वाजून ४४ मिनिटांनी मुलुंड – ट्रॉम्बे ही पारेषण वाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे वीज कमी पडू लागल्याने वीजमागणी व पुरवठ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्राने भार नियंत्रणासाठी टाटा पॉवरला औष्णिक व जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती वाढवण्याचे निर्देश दिले. मात्र त्यावर तातडीने कार्यवाही न करता वीजनिर्मिती वाढवण्याची मागणी करणारा मेल पाठवावा असे टाटाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात कळवा – ट्रॉम्बे ही पारेषण वाहिनी ०९. ४९ वाजता बीएआरसीच्या आवारात जंगलातील आगीमुळे तांत्रिक बिघाड होऊन बंद पडली. त्यातून प्रश्न चिघळला आणि मागणी जास्त व निर्मिती कमी यामुळे टाटा पॉवरच्या ट्रॉम्बे वीजनिर्मिती केंद्रातील वीजनिर्मिती संच बंद पडले. परिणामी दक्षिण मुंबईत वीजपुरवठा बंद पडला.
अखंड विजेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वीजपुरवठा ठप्प का होतो आहे?
मुंबईची सरासरी वीजमागणी ३ हजार मेगावॉटच्या आसपास असून उन्हाळ्यात ती कमाल ३६०० मेगावॉटपर्यंत जाते तर हिवाळ्यात २३००-२४०० मेगावॉटपर्यंत खाली येते. त्यापैकी १७०० मेगावॉट टाटांच्या ट्रॉम्बे प्रकल्पातून आणि अदानींच्या डहाणू प्रकल्पातून ५०० मेगावॉट अशी वीजनिर्मिती खास मुंबईसाठी होते. त्यापैकी केवळ टाटा पॉवरचा ट्रॉम्बे येथील ९३० मेगावॉटचा प्रकल्प शहरात असून बाकीची सर्व वीज बाहेरून मुंबईत आणावी लागते. त्यासाठी पारेषण वाहिन्या आहेत. पण त्यांची क्षमता कमी पडत आहे. एखाद-दुसरी पारेषण वाहिनी बिघडली की इतर यंत्रणेवर ताण येऊन तांत्रिक बिघाड होतो. ८ वर्षांपूर्वी मुंबईच्या पारेषण यंत्रणेची क्षमता वाढवण्यासाठी विक्रोळीला उच्चदाब उपकेंद्र आणि पश्चिम उपनगरात पारेषण वाहिन्यांचा प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातून पारेषण यंत्रणेची क्षमता आणखी ३ हजार मेगावॉटने वाढवण्याचे लक्ष्य होते. पण २०२० पर्यंत हे प्रकल्प सुरूच झाले नाहीत. १३ ऑक्टोबर २०२० ला मुंबईच नव्हे तर आसपासच्या भागातील वीजपुरवठाही पारेषण यंत्रणेतील बिघाडामुळे दोन दिवस बंद होता. मुंबईतील वीजनिर्मिती वाढवण्यास असलेल्या मर्यादा आणि बाहेरून वीज आणायची तर पारेषण यंत्रणेचा विस्तार ८ वर्षे रखडल्याने गेल्या काही वर्षांत वारंवार मुंबईत वीजपुरवठा खंडित होत आहे.
मुंबईतील वीजपुरवठा यंत्रणेचे भवितव्य काय?
मुंबईत १३ ऑक्टोबर २०२० रोजी वीजपुरवठा बंद होऊन नाचक्की झाल्यानंतर मुंबईतील पारेषण यंत्रणेच्या विकासाची कामे हाती घेण्यात आली. टाटा पॉवरकडे बरीच वर्षे रखडलेल्या विक्रोळी-खारघर प्रकल्पाचे काम हाती घेतलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईने या पारेषण यंत्रणा विस्ताराचे काम वेगात सुरू केले आहे. या ४०० केव्ही क्षमतेच्या उच्चदाब प्रकल्पासाठी १८९० कोटी रुपये खर्च करण्यात येत असून डिसेंबर २०२२ मध्ये तो प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईत २ हजार मेगावॉट वीज बाहेरून आणणे त्यामुळे शक्य होईल. त्यामुळे जानेवारी २०२३ पासून मुंबईच्या पारेषण यंत्रणेचा काही प्रमाणात विस्तार होऊन मुंबईला दिलासा मिळेल. त्याचबरोबर कुडुस ते आरे या पश्चिम उपनगरातील पारेषण वाहिनीचे कामही अदानीला देण्यात आले असून त्यासाठी ७ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास मात्र आणखी तीन वर्षे लागतील. या शिवाय मुंबई ऊर्जा मार्ग पारेषण प्रकल्पाचे काम मुंबईच्या सीमेवर हाती घेण्यात आले असून त्याअंतर्गत पडघा ते खारघर व पडघा ते नवी मुंबई आणि आपटा ते तळोजा अशा पारेषण वाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्याचाही लाभ महामुंबई क्षेत्रातील वीज पारेषण यंत्रणेला व पर्यायाने मुंबईला होईल. या पारेषण वाहिन्यांबरोबरच मुंबईतील ट्रॉम्बे येथील वीजप्रकल्पाच्या विस्ताराला परवानगी मिळावी आणि ५०० मेगावॉटचा संच बसवण्यात यावा असा टाटा पॉवरचा प्रयत्न आहे. तर उरण येथील वायूवर आधारित प्रकल्पाचा विस्तार करून मुंबईसाठी आणखी वीजनिर्मिती करता येईल का याची चाचपणी ऊर्जा विभाग करत आहे.