लंडन, न्यूयॉर्क आणि जेरुसलेम येथे पोलिओचा फैलाव होत असल्याने चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर येथे मोठ्या प्रमाणात लसीकरणास सुरुवात झाली आहे. पोलिओ प्राणघातक असून गेल्या काही दशकांमध्ये अनेक मुलांना यामुळे अर्धांगवायूची लागण झाली होती.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला पोलिओमुळे जगभरातील पालक धास्तावले होते. मुख्यत्वे पाच वर्षाच्या खालील मुलांना लागण होणाऱ्या या आजाराची काही लक्षणं नाहीत. पण अनेकदा मुलांना ताप आणि उलटीसारखी लक्षणं जाणवतात. जवळपास २०० पैकी एका मुलाला अर्धांगवायू होतो, ज्याच्यावर काही उपचार नाही. यामध्ये १० टक्के मृत्यूदर आहे.
विश्लेषण: करोना रोखणार आता अद्ययावत मुखपट्टी?
यावर कोणतेही उपचार नाहीत, मात्र १९५० मध्ये आलेल्या लसीच्या सहाय्याने त्याला रोखलं जाऊ शकतं. सध्या जगभरातून पोलिओ जवळपास नाहीसा झाला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे एकमेव असे देश आहेत, जिथे हा आजार अद्यापही आहे. मात्र यावर्षी मालवी आणि मोझाम्बिक येथेही रुग्ण आढळले आहेत. १९९० नंतर पहिल्यांदाच येथे रुग्णांची नोंद झाली आहे.
वेगवेगळे प्रकार
पोलिओव्हायरसचे दोन मुख्य प्रकार आहेत. ब्रिटनची राजधानी लंडन आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सांडपाण्यात पोलिओव्हायरसचा दुसरा प्रकार आढळून आला आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये अर्धांगवायूचं एक प्रकरण आलं आहे. जेरुसलेम, इस्रायलमध्येही अनुवांशिकदृष्ट्या साधर्म्य असलेला विषाणू आढळून आला आहे. याचा स्त्रोत समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ सध्या काम करत असल्याची माहिती, ग्लोबल पोलिओ इरॅडिकेशन इनिशिएटिव्हने (GPEI) दिली आहे.
हेदेखील वाचा – विश्लेषण : राकेश झुनझुनवाला बाजारातील ‘बिग बुल’ कसे बनले?
या ठिकाणांवर लसीतून निर्माण होणाऱ्या पोलिओचं प्रमाण शून्य असलं, तरी इतर देशांमध्ये मात्र त्यांचा धोका आहे. ज्यामुळे दरवर्षी त्याचा उद्रेक होतो, ज्यामध्ये २०२१ मधील नायजेरियातील ४१५ प्रकरणांचा समावेश आहे.
फैलाव कसा होत आहे?
पोलिओ लसीमध्ये असणाऱ्या दुर्बल जिवंत विषाणूंमुळे हा आजार फैलावतो. मुलांचं लसीकरण केल्यानंतर काही आठवडे त्यांच्या विष्ठेतून विषाणू बाहेर पडतात. लसीकरणचं प्रमाण कमी असणाऱ्या समुदायांमध्ये यामुळे फैलाव होऊन त्याचं रुपांतर व्हायरसच्या हानिकारक आवृत्तीत होऊ शकतं.
ब्रिटन आणि अमेरिकेसह काही देशांमध्ये आता या लाईव्ह लसीचा वापर होत नसला, तरी उद्रेक थांबवण्यासाठी काही देश मात्र याचा वापर करतात. यामुळे जागतिक प्रसार होऊ शकतो. खासकरुन, कोविडनंतर लोक प्रवास करु लागले असल्याने याची शक्यता अधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञ काय सांगतात?
लसीकरणाचं प्रमाण कमी असलेल्या लोकसंख्येमध्ये पोलिओव्हायरसचे दोन्ही प्रकार आढळत असल्याचं तज्ज्ञ सांगत असल्याची माहिती युनायटेड स्टेट्स सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) मधील डेरेक एरहार्ट यांनी दिली आहे.
संयुक्त राष्ट्राने सांगितल्यानुसार, महामारीच्या आधी लोकांमध्ये लसीकरणाबद्दल संकोच होता आणि ही एक फार मोठी समस्या होती. त्यामुळेच कोविडनंतर एका पिढीमध्ये प्रतिकारक्षमतेचा मोठा व्यत्यय निर्माण झाला.
२०२० मध्ये पोलिओ लसीतून होणारी १०८१ प्रकरणं समोर आली होती. गतववर्षीच्या तुलनेत ही संख्या तिप्पट होती. २०२२ मध्ये पोलिओ लसीकरण पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु असून, आतापर्यंत १७७ प्रकरणं समोर आली आहेत.
मात्र सांडपाण्यातून पोलिओची लागण होणं हा पालकांसाठी एक महत्वाचा इशारा आहे. जगभरातील सर्व तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी पालकांना एकच मोलाचा सल्ला दिला आहे. तो म्हणजे लसीकरण करुन आपल्या मुलांचं संरक्षण करा.