दत्ता जाधव
मागील दोन महिन्यांपासून केळ्यांच्या दरात तेजी आहे. मुंबई-पुण्यात केळी प्रति डझन ४०-५० रुपयांवर गेली आहेत. का होत आहे ही दरवाढ, किती दिवस सुरू राहणार आहे ही तेजी आणि या तेजीमागील कारणे काय आहेत, याविषयीचे विश्लेषण.

केळ्यांच्या भावात तेजीचे कारण काय?

केळीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात काढणीयोग्य केळ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. उत्तर भारतातील श्रावण महिना १४ जुलैपासून सुरू झाला आहे. तिथे श्रावणात होणाऱ्या अमरनाथ, केदारनाथ, कावड यात्रांसारख्या मोठ्या यात्रांसह उपवासांमुळे केळ्यांची मागणी वाढली आहे. अरबी देशांत होणारी केळीची निर्यातही सुरळीत आहे. परिणाम म्हणून केळ्यांचे दर तेजीत आहेत. आपल्याकडील श्रावण महिना २९ जुलैपासून सुरू होणार असल्यामुळे मागणीत आणखी वाढ होणार आहे. मुंबई-पुण्यातील ग्राहकांना सध्या दर्जानुसार ४० ते ५० प्रति डझन दराने केळी मिळत आहेत. त्यात सरासरी पाच रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

जळगावमधील परिस्थिती काय?

जळगाव जिल्ह्यात सुमारे ५५ हजार हेक्टर केळीचे क्षेत्र आहे. वर्षभर केळीची लागवड होत राहते. यंदा मार्च-एप्रिलमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेसह विविध कारणांमुळे यंदा केळीच्या लागवडीवर पारिणाम झाला आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या केळीच्या लागवडीत घट झाली आहे. उष्णतेत वाढ झाल्यामुळे लागण झालेल्या केळींची योग्य प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. त्यात भर म्हणून विषाणूजन्य (सीएसव्ही) रोगाचा प्रादुर्भाव होऊन नुकतीच लागवड केलेली लहान रोपे उपटून काढावी लागली. उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झाला त्याचा परिणाम म्हणून केळीच्या शेकडो एकरवरील बागा भुईसपाट झाल्या आहेत. आता नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका रावेत तालुक्याला बसला आहे. एकंदरीत नैसर्गिक आपत्तींचा परिणाम म्हणून केळीच्या एकूण पिकावरच विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे काढणीयोग्य केळ्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

केळी पक्व होण्याचा काळ वाढला?

जळगाव जिल्ह्यातील रावेत आणि यावल या तालुक्यात दर्जेदार केळींचे उत्पादन होते. येथे उत्पादित झालेल्या बहुतेक केळींची निर्यात होते. रावेत तालुक्यातील विवरे गावातील प्रगतिशील शेतकरी देवेंद्र राणे म्हणाले,की यंदा केळी पक्व होण्याचा काळ एका महिन्याने वाढला आहे. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असणाऱ्या वेळेत बाजारात केळी येणार नाहीत. त्याचा मोठा परिणाम बाजारातील उपलब्धतेवर झाला आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

केळ्यांचा पक्व होण्याचा काळ वाढल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीला दुजोरा देताना जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे निवृत्त प्राध्यापक सी. डी. बडगुजर म्हणाले, की सध्या केळींच्या पक्व होण्याच्या काळात सरासरी पंधरा दिवसांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. अवेळी, उशिरा आलेला पाऊस आणि अतिवृष्टीचा परिणामही दिसून येत आहे. संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे जमिनीला वाफसाच आला नाही. जमिनीला वाफसा नसल्यामुळे केळीची मुळे काम करू शकत नाहीत. जमिनीतून अन्नद्रव्यांचे पुरेशा प्रमाणात शोषण होत नाही. शिवाय बागेत चिखल असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत खते देता आली नाहीत. औषधांची, सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणीही वेळेत करता आली नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून केळी उशिराने काढणीला येत आहेत.

पारंपरिक उपायांची गरज?

शेतकरी पूर्वी केळीच्या बागेच्या भोवतीने शेवरी, शेवगासह अन्य झाडांचा तट (अडोसा) तयार करत असत. आता असा तट तयार केला जात नाही. या तटामुळे वेगाने येणारे वारे, थंड वारे, उष्णतेचे झोत पहिल्यांदा या तटावर येऊन आदळत असत. त्यामुळे वारे थंड असतील तर काही प्रमाणात थंडीचा कडाका कमी व्हायचा. वारे उष्ण असतील तर उष्णता थोडी कमी व्हायची. वेगाने येणारे वारे तटामुळे अडविले जायचे, त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने केळीची झाडे मोडून पडली आहेत, असे चित्र फारसे दिसायचे नाही. आता शेतकरी पाण्याची उपलब्धता झाली, की कोणत्याही प्रकारच्या जमिनीत केळीची लागवड करतात. माळरानावर असलेल्या केळीला या नैसर्गिक आपत्तींचा सर्वांधिक फटका बसतो आहे. त्यामुळे पुन्हा पारंपरिक उपाययोजना केल्यास केळींचे नुकसान काही प्रमाणात कमी करता येणार आहे.

व्यापारी दर पाडतात?

१८ आणि १९ जुलै रोजी एक नंबरच्या दर्जेदार केळ्यांचे दर ३२०० रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. व्यापाऱ्यांनी लगेच २० जुलैला हे दर २५०० रुपयांवर आणले. २२ जुलै रोजी दर्जेदार केळीला २३०० रुपयांवर दर होते. दर्जानुसार १५०० ते २३०० रुपये असा दर सुरू असून, सरासरी दर १८०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे. हे दर शेतकऱ्यांना मिळणारे आहेत. मुंबई-पुण्यातील ग्राहकांना दर्जानुसार ४० ते ५५ प्रति डझन दराने केळी मिळत आहेत. श्रावण महिन्यात आणखी पाच रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

राज्यात आता श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावणातील उपवासांमुळे केळ्यांच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. पावसाळ्यात बाजारातील अन्य फळांची उपलब्धताही कमी असते. परिणामी केळ्यांच्या मागणीत वाढ होताच दरात तेजी येते. या तेजीमुळे सध्या ४०-५० रुपये डझन असणारा दर ४५-५५ रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader