भारताकडून ऑस्करसाठी गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. काश्मीर फाईल्स, आरआरआर हे चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते मात्र बाजी मारली ती गुजराती चित्रपटाने, या चित्रपटाच्या निवडीवरून सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे. आरआरआर चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळावे यासाठी हॉलिवूडमधील काही कलाकार एकत्र आले आहेत. भारतीय चित्रपटांच्या बाबतीत हे परिस्थिती तर तिकडे रशियातील चित्रपटसृष्टीने अकॅडमी अवॉर्ड्स पुरस्कारावर बहिष्कार घातला आहे. रशियाने याबाबत नुकतीच घोषणा केली आहे. सोव्हिएत युनियन बरखास्त झाल्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे.
बहिष्काराचं कारण :
या वर्षाच्या सुरवातीलाच रशिया युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु झाले आणि जगभरातील देशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. या युद्धात मॉस्को आणि वॉशिंग्टन यांच्यात तणाव वाढत गेला. एएफपीच्या म्हणण्यानुसार सोमवारी संध्याकाळी रशियन फिल्म अकादमीने बहिष्काराची घोषणा केली. व्हरायटीच्या अहवालानुसार, युनायटेड स्टेट्स प्रशासनाने युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतल्याने क्रेमलिनने अलीकडेच युनायटेड स्टेट्सबरोबरचे असलेले सर्व संबंध तोडून टाकणार अशी धमकी दिली आहे. रशियन अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे, ‘रशियाच्या फिल्म अकादमीचे अध्यक्षीय मंडळ यंदाच्या अमेरिकेतील ऑस्कर पुरस्कारांसाठी चित्रपट पाठवणार नाही’.
विश्लेषण: गूगल प्ले स्टोअरवरील अॅप्समध्ये ‘हार्ली’ व्हायरसचा शिरकाव; क्षणात बँक बॅलन्स होतो शून्य
ऑस्कर समितीमधील वाद :
रशियामधील ऑस्कर कमिटीच्या सभासदांमध्ये एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. ऑस्करसाठी चित्रपट पाठवण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीच्या खांद्यावर असते त्या व्यक्तीला या ऑस्कर बहिष्कार प्रकरणी लांब ठेवण्यात आले. पावेल चौखरा असं त्यांचं नाव असून रशियाच्या ऑस्कर समितीचे ते अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की ‘ऑस्करवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय हा बेकायदेशीर निर्णय होता जो त्यांच्या पाठीमागे घेण्यात आला होता. त्यानंतर चौखरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पावेल चौखरा यांनी स्थानिक वृत्तसंस्था टास यांना एक पत्र दिले होते ज्यात त्यांनी लिहलं होत, ‘रशियाच्या फिल्म अकादमीच्या नेतृत्वाने एकतर्फीपणे ऑस्कर नामांकनासाठी रशियन चित्रपटाचे नामांकन न करण्याचा निर्णय घेतला’. रशियन चित्रपट उद्योगातील तज्ञ, जोएल चॅप्रोन यांनी वेराइटीला सांगितले की ‘पावेलच्या राजीनाम्यानंतर समितीच्या इतर अनेक सदस्यांनी पद सोडले. युद्ध सुरू झाल्यावरदेखील काही सदस्यांनी समिती सोडली’.यातीलच एक सदस्य इव्हगेनी गिंडिलिस म्हणाले, ‘जेव्हा आम्ही युद्धात असतो तेव्हा आम्ही नेहमीप्रमाणे व्यवसाय करू शकत नाही. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर २७ फेब्रुवारीला मी समिती सोडली’.
बहिष्काराला कलाकारांचा पाठिंबा :
रशियातील अनेक कलाकार, निर्माते यांनी बहिष्काराला पाठिंबा दिला आहे. रशियन सिनेमॅटोग्राफर युनियनचे प्रमुख निकिता मिखाल्कोव्ह यांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे समर्थक आहेत. सोव्हिएतोत्तर प्रदेशातील देशांसाठी ऑस्करच्या तोडीचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा प्रस्ताव निकिता मिखाल्कोव्ह यांनी मांडला आहे. तसेच यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भाग घेऊन कोणतेही उद्दिष्ट साध्य करायचे नाहीं. गार्डियनशी बोलताना निकिता मिखाल्कोव्ह म्हणाले की, ‘मला असे वाटते की रशियाचे प्रतिनिधित्व करणार्या देशातील एखादा चित्रपट निवडणे जो वास्तवात रशियाचे अस्तित्व नाकारतो याला अर्थ नाही. थोडक्यात रशिया विरोधात जे आहेत आणि अमेरिकेशी संबंध ठेवून आहेत अशा सगळ्या गोष्टींवर बंदी घालायची. आणखीन एक चित्रपट निर्माता ज्याने अमेरिकेची तुलना थेट नाझी जर्मनीशी केली आहे. कॅरेन शाखनाझारोव असं त्याचा नाव असून तो लेखक, पटकथाकार आहे.
विश्लेषण : चित्रपट ‘समीक्षण’ आणि ‘टीका’ यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
ऑस्कर पुरस्कारांमध्ये रशियातील चित्रपटांचा सहभाग :
आजतागायत रशियाने नियमितपणे ऑस्करसाठी चित्रपट सादर केले आहेत. द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी नामांकन मिळालेले शेवटचे दोन चित्रपट म्हणजे २०१४ मध्ये ‘लेविथन’ आणि २०१७ मध्ये आंद्रे झव्यागिंटसेव्ह दिग्दर्शित ‘लव्हलेस’. या दोन्ही चित्रपटात भ्रष्टाचार, राजकीय समस्यांवर भाष्य केले होते.
रशियाने हॉलिवूड कलाकारांवर बंदी
हा बहिष्कार केवळ पुरस्कारापुरता नाही. रशिया युक्रेन युद्धात अमेरिकेने रशियावर काही निर्बंध घातले होते. म्हणून रशियाने अभिनेता शॉन पेन आणि बेन स्टिलर यांच्यासह २५ अमेरिकेच्या लोकांवर वैयक्तिक निर्बंध लादले आहेत. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त, २०१९ मध्ये कांतेमिर बालागोव्हचा ‘बीनपोल’ आणि २०२० मध्ये आंद्रेई कोन्चालोव्स्कीचा ‘डिअर कॉमरेड्स’, हे दोन चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडले गेले.