सिद्धार्थ खांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज शेन वॉर्न कसोटी क्रिकेटमध्ये जगातील बहुतेक संघांविरुद्ध यशस्वी ठरला. पण या नियमाला खणखणीत अपवाद ठरला भारत. भारताविरुद्ध शेन वॉर्नच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवातच अडखळती ठरली. परंतु त्यानंतरही भारतीय फलंदाजांनी वॉर्नला सहसा वरचढ होऊ दिले नाही. काय आहेत यामागची कारणे?

सिडनीतली पहिली कसोटी

फिरकी गोलंदाजीची कला प्रामुख्याने भारत, पाकिस्तान आणि काही प्रमाणात श्रीलंकेमध्येच मुख्य प्रवाहात असल्याचा तो काळ. ऐंशीच्या दशकातही तेज गोलंदाजांचा बोलबाला होता. नव्वदच्या सुरुवातीस परिस्थिती फार वेगळी नव्हती. ऑस्ट्रेलियन संघात काही चांगले तेज गोलंदाज होते, अशा वेळी शेन वॉर्नचे आगमन झाले. पण त्याचा सामना पहिल्याच कसोटीत भारताशी होता. त्या कसोटी सामन्यात रवी शास्त्रीने २०६ धावा केल्या, सचिन तेंडुलकरने १४८ धावा चोपल्या. शेन वॉर्नने १५० धावा देऊन एकमेव बळी मिळवला. तो सामना ऑस्ट्रेलियाने कसाबसा वाचवला, भारताला दुसरा डाव खेळण्याची संधी मिळाली नाही. काहीसा स्थूल, सोनेरी केसांचा वॉर्न त्यावेळी फार महान वगैरे सोडा, पण गंभीरही भासला नाही.

भारताविरुद्ध शेन वॉर्न

कसोटी सामन्यांपुरते बोलायचे झाल्यास शेन वॉर्नला सर्वाधिक सायास भारताविरुद्ध पडले. त्याचे बळी ७०८, त्यांचे पृथक्करण असे – इंग्लंडविरुद्ध ३६ कसोटी सामन्यांत २३.२५च्या सरासरीने १९५ बळी (इंग्लंडविरुद्ध कोणत्याही गोलंदाजासाठी हा विक्रम), न्यूझीलंडविरुद्ध २४.३७च्या सरासरीने १०३ बळी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २४.१६च्या सरासरीने १३० बळी. पण हे गोरे देश फिरकीविरुद्ध सहसा चाचपडतातच ना? पण मग पाकिस्तान आणि श्रीलंका या फिरकी उत्तम खेळू शकणाऱ्या संघांविरुद्धही त्याची कामगिरी उत्तमच होती. पाकिस्तानविरुद्ध १५ सामन्यांत २०.१७च्या सरासरीने ९० बळी आणि लंकेविरुद्ध १३ सामन्यांत २५.५४च्या सरासरीने ५९ बळी. वेस्ट इंडिजविरुद्ध त्या काळात ब्रायन लाराच्या उपस्थितीमुळे त्याची आकडेवारी काहीशी बिघडली. तरीही १९ सामन्यांत २९.९५च्या सरासरीने ६५ बळी ही कामगिरी फार वाईट म्हणता येणार नाही. आणि भारताविरुद्ध? १४ सामन्यांत ४७.१८च्या सरासरीने ४३ बळी! शेन वॉर्न हा लेगस्पिनर. लेगस्पिनरकडून धावा रोखण्याची नव्हे, तर बळी घेण्याची अपेक्षा असते. पण वॉर्नची भारताविरुद्धची कामगिरी स्वतंत्रपणे विचारात घेतल्यास सुमारच ठरते. भारतात वॉर्नच्या बरोबरीनेच सचिनचा उदय झाला. पण सचिनप्रमाणेच रवी शास्त्री, नवज्योत सिद्धूनेही काही वेळा वॉर्नची धुलाई केली. पुढे राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण. सौरव गांगुली, वीरेंदर सेहवाग हे फलंदाज त्याच्यासमोर खेळले. त्यांत काही प्रमाणात द्रविड व सौरव वगळता इतर बहुतेक फलंदाजांनी वॉर्नवर हुकूमत गाजवली.

हे झाले कसोटी क्रिकेटविषयी. वनडेमध्ये काय परिस्थिती?

वॉर्न एकदिवसीय क्रिकेटमध्येही निष्णात गोलंदाज होता. सातशेहून अधिक कसोटी बळींची चर्चा नेहमी होते. परंतु १४५ कसोटी सामन्यांच्या तुलनेत वॉर्न एकदिवसीय सामने १९४ म्हणजे जरा कमीच खेळला. तरी त्याने तेवढ्या सामन्यांत २५.८२च्या सरासरीने २९३ बळी मिळवले. ही कामगिरी अत्युत्तम म्हणावी अशीच. पण याही प्रकारात भारताविरुद्ध त्याची कामगिरी होती – १८ सामने, ५६.२६च्या सरासरीने १५ बळी. म्हणजे कसोटीच्या तुलनेत अधिकच सुमार.

भारतीय फलंदाजांच्या वर्चस्वाची कारणे कोणती?

पारंपरिकदृष्ट्या भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी नेहमीच चांगली खेळतात. फिरकी गोलंदाजांची या देशाला मोठी परंपरा. सुभाष गुप्ते, विनू मंकड, बापू नाडकर्णी, पुढे बेदी-प्रसन्ना-चंद्रा-वेंकट ही चौकडी, मग विक्रमवीर अनिल कुंबळे, हरभजन, अश्विन ही आपली उज्ज्वल परंपरा. पद्माकर शिवलकर यांच्यासारख्या प्रतिभावंतांना कसोटी क्रिकेट संघात संधीही मिळू नये अशी ही श्रीमंती. असे गोलंदाज स्थानिक क्रिकेटमध्येच समोर आल्यामुळे फिरकीविरुद्ध विशेषतः आयपीएलपूर्व काळात भारतीय फलंदाजांनी तंत्र योग्य घोटवलेले असायचे, यात फार आश्चर्यजनक काही नाही. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजीविरुद्ध पायांचा वापर (फुटवर्क) उत्तम प्रकारे करतात. तसे केले नाही, तर फिरकी गोलंदाज वरचढ ठरतो हे आम्हाला मिळणारे बाळकडू. त्याहीपलीकडे जाऊन, आपले फलंदाज प्रत्यक्ष खेळताना आणि त्याचबरोबर नॉन-स्ट्रायकर एंडला उभे राहूनही फिरकी गोलंदाजांच्या हातांचे, बोटांचे निरीक्षण अचूक प्रकारे करतात अशी गावस्कर-वेंगसरकर-विश्वनाथ या परंपरेची ख्याती. मध्यंतरी एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने असाही दावा केला होता, की नॉन-स्ट्रायकरला उभा असलेले काही भारतीय फलंदाज अनेकदा आपल्या सहकाऱ्याला गोलंदाच्या पकडीकडे पाहून चेंडू कसा येणार हे ओरडून सांगायचे! ती आख्यायिका होती की सत्यकथन हा भाग बाजूला ठेवला, तरी फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांच्या तयारीचे ते विधान निदर्शक ठरते. वॉर्नच्या भरारीच्या आधीपासूनच आपल्याकडे सचिनचा उदय झालेला होता. त्यावेळी भारतीय संघात वेंगसरकर, अझरुद्दीन, विनोद कांबळी, प्रवीण अमरे, शास्त्री असे चांगले फलंदाज होते. पुढे सौरव-लक्ष्मण-द्रविड-सेहवाग आले. हा संपूर्ण पट पाहता, यांच्यातील एकही फलंदाज लेगस्पिनविरुद्ध कधीच फार गळपटला नाही हे लक्षात येते. वॉर्नच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्याला पहिल्याच कसोटीत आपण भरपूर चोप दिल्यामुळे त्याच्या नंतरच्या उत्तम कामगिरीचे दडपण आपल्यावर कधीच आले नसावे. आपल्या दृष्टीने तो कधीही जादूगार किंवा मिथक नव्हता.

सचिन विरुद्ध वॉर्न!

वॉर्नला भारतावर वर्चस्व गाजवता आले नाही, कारण त्याला सचिनवर पकड घेता आली नाही! दोघांच्या पहिल्या द्वंद्वापासून सचिनने वॉर्नला अचूक हेरून ठेवले होते. नव्वदच्या दशकात भारत आणि ऑस्ट्रेलिया फारसे क्रिकेट खेळले नाहीत, त्यामुळे भारताविरुद्ध नामुष्की पत्करूनही अंगभूत गुणवत्तेच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर वॉर्न नामांकित गोलंदाज बनत गेला. त्याचवेळी समांतर पणे सचिनही नावलौकीक कमावत होताच. पण वॉर्नला विशेषतः गोऱ्या माध्यमांनी डोक्यावर घेतल्यामुळे या चँपियन गोलंदाजाविरुद्ध अधिक चांगल्या प्रकारे खेळायचेच, असा चंग सचिनमधील खडूस फलंदाजाने बांधलेला होता. सिडनी कसोटी सामना, पुढे १९९८मधील चेन्नई कसोटी किंवा शारजातील ती सुप्रसिद्ध तिरंगी स्पर्धा या प्रत्येक वेळी वॉर्न समोर असला की सचिनला दुहेरी स्फुरण चढायचे. आक्रमक फलंदाजी करून वॉर्नचा टप्पा (लेंग्थ) बिघडवायचा, हे सचिनचे तंत्र. त्याबरोबरीने वॉर्नच्या इतर चाळ्यांना न बधणारी धीरगंभीर, एकाग्र वृत्ती हे सचिनचे वैशिष्ट्य इतर भारतीय फलंदाजांमध्येही दिसून यायचे. त्यामुळे त्या काळी इतर गोलंदाजांविरुद्ध नव्हती इतकी चांगली कामगिरी या फिरकीच्या जादूगाराविरुद्ध भारताने करून दाखवली. २९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सचिनला वॉर्नने केवळ चारवेळा बाद केले. एकदिवसीय सामन्यात सचिनची वॉर्नविरुद्ध सरासरी १०० होती. सचिन पुढे सरसावत आपल्याला समोरच्या दिशेने भिरकावून देत असल्याची दुःस्वप्ने रात्री पडायची, हे वॉर्न म्हणाला त्यात अतिशयोक्ती नव्हती. सचिनविषयी, भारताविषयी दिग्विजयी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे आणि चिकित्सक, चोखंदळ ऑस्ट्रेलियन क्रिकेट माध्यमे आणि रसिकांचे मत झपाट्याने बदलत गेले, याची कारणे दोन – पहिले अर्थातच ऑस्ट्रेलियनांचा देव डॉन ब्रॅडमन यांनी सचिनविषयी (‘तो अगदी माझ्यासारखाच खेळतो’) व्यक्त केलेला अभिप्राय आणि दुसरे म्हणजे ऑस्ट्रेलियनांनाचा अत्यंत लाडका शेन वॉर्नविरुद्ध सचिन आणि भारताने सातत्याने करून दाखवलेली उत्तम कामगिरी. सचिन आणि वॉर्न या दोघांना परस्परांविषयी नितांत आदर होता. पण आपण सचिन आणि भारताला जिंकू शकलो नाही ही कबुली वॉर्न अखेरपर्यंत देत राहिला. ते त्याचे मोठेपण आणि सचिनच्या भारताचेही!