वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी देशातील चांदीची आयात मागील वर्षीच्या तुलनेत ९६ टक्क्यांनी घसरली आहे. या वर्षी देशात फक्त ११.२८ टन चांदीची आयात करण्यात आली आहे. सन २०१९ मध्ये एकूण पाच हजार ५९८ टन चांदीची आयात करण्यात आली होती. मात्र या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यामध्ये केवळ एक हजार ४६८ टन चांदीची आयात करण्यात आली आहे. भारतातील चांदीची मागणी प्रामुख्याने आयातीच्या मदतीनेच पूर्ण केली जात असल्याने या आकडेवारीसंदर्भात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
या वर्षी भारतातील चांदीची आयात एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यामागे मूळ कारण मागीत झालेली घट आहे. ग्राहकांकडून चांदीला मागणीच नसल्याने आयात मंदावली आहे. सध्या बाजारपेठांमध्ये वापरुन झालेले चांदीचे दागिणे आणि चांदीचे संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहक त्यांच्याकडील चांदी विकत असून बाजारात वापरलेली चांदी अधिक प्रमाणात आहे. हाच मागणी घटण्यामागील मूळ मुद्दा आहे. करोनामुळे आधीच सोन्या-चांदीची मागणी मंदावलेली असताना नव्या चांदीऐवजी बाजारपेठेत जुनी चांदी अधिक असल्याने ग्राहकांनी चांदी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
दर महिन्याला बाजारपेठेमध्ये ३०० टन वापरलेली चांदी येते. मागील वर्षी वापरलेली चांदी बाजारपेठेत आल्याचे प्रमाण अगदीच नगण्य होतं. मात्र यंदा हे प्रमाण खूप जास्त आहे. हिंदुस्तान झिंकचीच जुन्या चांदीची मासिक टक्केवारी ही ४० ते ५० टन इतकी आहे. २०११ मध्ये गुंतवणूक म्हणून ज्यांनी सिलव्हर बार विकत घेतले असतील ते लोकं आता ७२ हजार प्रति किलो दराने ते विकत आहेत. हाच ट्रेण्ड चांदीच्या दागिण्यांबद्दल दिसून येत आहे. रोख रक्कम मिळावी या हेतूने चांदी विक्री करणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सांगतात.
ऑगस्ट महिन्यामध्ये चांदीचे दर सर्वाधिक म्हणजेच ७७ हजार ९४९ रुपये प्रति किलोपर्यंत वधारले होते. जानेवारीत हाच दर ४६ हजार किलो इतका होता. त्यामुळेच चांदीमधील गुंतवणुकीचा फायदा घेण्याची हीच उत्तम वेळ असल्याचे अनेकांना वाटत असून त्यामुळेच चांदी विक्रीचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेत आता बाहेरून चांदी आयात करण्याची गरज नाहीय. २०१२ नंतर पहिल्यांदाच चांदीची आयात एवढ्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
मात्र अशाच प्रकारे चांदीची किंमत कमी होत राहिली तर पुढील काही आठवड्यांमध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चांदीची मागणी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या वर्षी एकूण तीन हजार २०० ते तीन हजार ५०० टन चांदीची आयात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ४० टक्क्यांनी कमी आहे.