ज्ञानेश भुरे
बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून पुन्हा एकदा ईशान्येकडील खेळाडूंची कामगिरी लक्षणीय ठरत आहे. या वेळी मेरी कोम नाही; पण लवलिना बोरगोहेन, लालनिनरुंगा, मीराबाई चानू यांनी छाप पाडली आहे. या खेळाडूंची कामगिरी जशी लक्षवेधक आहे, तसाच या भागातील क्रीडा विकासदेखील नजरेत भरतो. या खेळाडूंची कामगिरी आणि या दुर्गम भागातील क्रीडा विकास या प्रवासाचे हे विश्लेषण…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईशान्येकडे क्रीडा क्षेत्राचा विकास कसा झाला आहे?

प्रत्येक नव्या गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होते. येथील क्रीडा आणि क्रीडा गुणवत्तेचा विकास हादेखील शून्यातूनच झाला. एक काळ असा होता की येथील दुर्गम भागामुळे सोयी-सुविधांचा अभाव तर होताच, पण खेळाडूदेखील तयार होत नव्हते. त्यामुळे मोठ्या सोडा पण, स्थानिक स्पर्धांच्या आयोजनातही अडथळे निर्माण होत होते. पण, १९९७ इम्फाळ आणि २००७ गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाने येथील चित्र बदलण्यास सुरवात झाली. हे चित्र इतक्या झपाट्याने बदलले की २०१६मध्ये गुवाहाटी आणि शिलॉंग शहरांची ‘सॅफ’ स्पर्धा आयोजित करण्यापर्यंत मजल मारली. पुढे ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाने या भागाला जणू क्रीडा स्पर्धा आयोजनाचे प्रमुख केंद्र बनवले असे म्हणायला जागा आहे.

‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ कशी ठरली फायदेशीर?

ईशान्येकडील क्रीडा प्रसाराला वेग येण्यास केंद्र सरकार आणि देशातील क्रीडा व्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या क्रीडा प्राधिकरणाचा (साइ) मोठा वाटा आहे. योगायोग म्हणा किंवा केंद्र सरकारची विशेष नजर यामुळे येथील क्रीडा विक्रासाला चालना मिळाली. सर्वानंद सोनोवाल आणि नंतर किरेन रिजिजू हे या भागाचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय नेते क्रीडामंत्री म्हणून मिळाले. देशाच्या ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ या योजनेने खऱ्या अर्थाने या भागात क्रीडा क्षेत्राला दरवाजे उघडले गेले. सोनोवाल आणि रिजिजू या क्रीडा मंत्र्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनाची संधी ईशान्येकडच्या या छोट्या राज्यांना मिळाली. यात आयएसएल, वरिष्ठ बॉक्सिंग, क्रिकेट, १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक अशा अनेक स्पर्धांचे आयोजन येथे झाले आणि हा दुर्गम भाग क्रीडा क्षेत्रातील प्रमुख स्थान बनला.

खेळाडूंना सुविधा कशा पुरविण्यात आल्या?

एक काळ हा भाग क्रीडा सुविधांपासून वंचित होता. त्यामुळे खेळाडू निर्माण होणे ही समस्या होती. क्रीडा मंत्रालय आणि ‘साइ’ या दोघांनी लक्ष घातल्यामुळे या भागाचा विकास झाला. खेलो इंडिया स्पर्धेने या विकासाला वेगळी चालना मिळाली. आयएसएलच्या माध्यमातून शिलॉंग लाजॉंग संघाच्या निर्मितीमुळे फुटबॉलचे येथील जाळे घट्ट विणले गेले. राणी लक्ष्मीबाई उपकेंद्र आसामला मिळाले. खेलो इंडियाच्या अनेक खेळांच्या अकादमी येथे स्थापित झाल्या. केंद्राच्या अर्थसंकल्पात कायम या भागाला गेली काही वर्षे झुकते माप मिळाले. पण, त्याचा फायदा त्यांनी उठवला. याचे फलित म्हणजे मणिपूरमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ साकारत आहे.

कोणकोणत्या खेळाडूंची चमकदार कामगिरी?

या सगळ्यात येथून नावारूपाला आलेल्या क्रीडा गुणवत्तेला विसरता येणार नाही. याची सुरुवात सिक्कीमचा फुटबॉलपटू बायचुंग भुतियापासून सुरू होते. पुढे त्याचा वारसदार सुनील छेत्री, बॉक्सर मेरी कोम, लवलिना, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, धावपटू हिमा दास, वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू, जेरेमी लालनिनरुंगा या नव्या राष्ट्रकुल विजेत्यांपर्यंत येऊन थांबते. खेळात चमकले की सरकारकडून रोख पारितोषिके दिली जातात, सरकारी नोकरी मिळते. साहजिक या सर्वांमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होऊ शकतो ही भावना खेळाडूंच्या मनात निर्माण झाली. घरची गरिबी दूर करण्यासाठी खेळाडूंना जणू एक मार्ग सापडला. त्यासाठी वाट्टेल तेवढी मेहनत घेण्याची त्यांची तयारी होती. आज स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत या भागातील खेळाडू देशाच्या पदकांमध्ये भर घालत आहेत.

कोणकोणत्या खेळांमध्ये ईशान्येकडील खेळाडू अग्रेसर?

फुटबॉल, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात मेघालय, मणिपूर, सिक्कीम, मिझोराम ही राज्ये या गुणवत्तेची केंद्रे म्हणून समोर येत आहेत. बीसीसीआयच्या नव्या धोरणामुळे आता येथिल स्थानिक क्रिकेट प्रसारही झपाट्याने होत आहे. एकूणच ईशान्येकडील भाग देशाची क्रीडा राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why sportspersons from north east are consistently shining in multi sports events print exp sgy