तामिळनाडूत गेल्या दोन आठवड्यात पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून राज्यात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन आत्महत्या ४८ तासांमध्ये झाल्या आहेत. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. मात्र या आत्महत्यांमागे नेमकी काय कारणं आहेत? असा प्रश्न लोकांना सतावत आहे. याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊयात
आत्महत्यांची कारणं काय?
विद्यार्थी आत्महत्या करण्यामागे वेगवेगळी कारणं समोर येत आहेत. शिक्षकांकडून होणारा छळ आणि लैंगिक अत्याचाराला कंटाळून विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत. याशिवाय नीटच्या परीक्षेत चांगली कामगिरी करु न शकल्याने किंवा स्पर्धा परीक्षेत यश न मिळाल्यानेही विद्यार्थी आत्महत्या करत आहेत.
परीक्षेत चांगली कामगिरी न करु शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांकडून ओरडा पडण्याची तसंच सतत इतरांचं उदाहरण दिलं जाण्याची भीती सतावत असते असं निदर्शनास आलं आहे.
आत्महत्येची प्रकरणं
१३ जुलै रोजी सर्वात पहिल्या आत्महत्येची नोंद करण्यात आली. यानंतर २५ जुलैला दोन आणि त्यानंतर मंगळवारी (२६ जुलै) आणि गुरुवारी (२८ जुलै) अशी एकूण पाच जणांनी आत्महत्या केली. यामधील बहुतांश विद्यार्थी उच्च माध्यमिक वर्गातील आहेत.
तामिळनाडूत पहिली आत्महत्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. शाळेच्या आवारात मृतदेह आढळल्यानंतर आंदोलकांनी शाळेत घुसून तोडफोड केली होती. शाळेच्या बसलाही आग लावण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी १२८ जणांना अटक केली आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
मुख्यमंत्री एम के स्टॅलिक यांनी आत्महत्यांमुळे आपल्याला फार दु:ख झाल्याचं सांगितलं आहे. शैक्षणिक संस्था चालवणाऱ्यांनी याकडे एक व्यवसाय म्हणून नव्हे, तर सेवा म्हणून पाहावं असं स्पष्ट सांगितलं आहे.
“विद्यार्थी फक्त पदवी घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये येत नाहीत. तुम्ही (शिक्षक) त्यांना आत्मविश्वास. हिंमत दिली पाहिजे. विद्यार्थी आणि खासकरुन मुलींनी निडरपणे समस्या, अपमान आणि अडथळ्यांचा सामना केला पाहिजे. तामिळनाडूमधील विद्यार्थी फक्त बौद्धिक हुशार नव्हेत तर शारिरीक आणि मानसिकदृष्ट्याही मजबूत झाले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे,” असं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.
“सरकार शांत बसणार नाही. जर विद्यार्थिनींना कोणीही शारिरीक, मानसिक किंवा लैंगिक त्रास दिला तर कडक कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अण्णाद्रुमूकचे अंतरिम सरचिटणीस आणि माजी मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी पोलीस, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनावर योग्य वेळी पावलं न उचलल्याचा आरोप केला आहे. “मुख्यमंत्री स्टॅलिन यासाठी पूर्णपणे जबाबदार आहेत. जर त्यांनी वेळेत कारवाईचा इशारा दिला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती,” असं त्यांचं म्हणणं आहे.