आज मालिका विश्वात डोकावले तर तर प्रत्येक वाहिनीवर कोणती ना कोणती मालिका सुरु असतेच. गेल्या वीस वर्षात मालिका विश्व पूर्णपणे बदलले आहे. ऐंशी नव्वदच्या दशकात काही ठरविक भागांच्या मालिका प्रसारित होत. मात्र डेली सोप हा प्रकार आणण्याचे श्रेय जाते ते निर्माती एकता कपूर यांना, २००० चा दशक उजाडलं आणि एकता कपूर यांनी मालिका विश्वाचा चेहरामोहरा बदलून टाकला. मालिका विश्वात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या त्या वेगळ्या अडचणीत सापडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूर यांना त्यांच्या ‘XXX’ या वेब सीरिजमधील कंटेंटवरून फटकारले आहे. न्यायालयाचं म्हणणे आहे की ‘एकता कपूर देशातील तरुणांची मानसिकता बिघडवत आहेत’.
न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि सी टी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘यावर काहीतरी केले पाहिजे. तुम्ही देशातील तरुण पिढीचे मन दूषित करत आहात. ओटीटी वरील कंटेंट आज सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना नक्की काय दाखवत आहात’? एकता कपूर यांच्या ‘XXX’ या वादग्रस्त वेब सीरिजवरून सध्या त्यांच्यावर टीका केली जात आहे.
माजी सैनिक शंभू कुमार यांनी एकता कपूर यांच्या ALTBalaji वर प्रसारित झालेल्या ‘XXX’ या वेब सीरिज विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मते, या वेबसीरिजमध्ये सैनिकांचा अपमान केला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या आहेत. २०२० साली त्यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला आहे की, या वेबसीरिजमध्ये सैनिकाच्या पत्नीशी संबंधित अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. नेटकऱ्यांनी ट्विटरवर ‘AltBalaji Insults Army’ हा हॅशटॅग ट्रेंड केला होता. दुसऱ्या सीझनमधील ‘प्यार और प्लास्टिक’ नावाचा एक भाग, ज्यात पती लष्करी सेवेत असताना त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे दाखवण्यात आले आहेत, ज्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत.
विश्लेषण : तापमान वाढीमुळे कोणत्या पाच देशांचे भविष्य अंधःकारमय? उर्वरित जगासाठी कोणता इशारा?
एकता कपूर यांनी आपल्या अटक वॉरंटला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने आपली टिपणी दिली आहे. बिहारच्या बेगुसराय येथील एका न्यायालयाने २०२० मध्ये कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हे वॉरंट जारी केले होते. यावर एकता कपूर यांच्या वकिलांनी सांगितलं ‘याप्रकरणी आम्ही पाटणा उच्च न्यायालयात याचिका केली आहे, पण तेथे ती लवकर सुनावणीला येईल असे आम्हाला वाटत नाही. अशाच एका अन्य प्रकरणात याआधी सर्वोच्च न्यायालयाने कपूर यांना संरक्षण दिले होते’.
एकता कपूर यांना न्यायालयाने फटकारले असले तरी आज ओटीटीसारख्या माध्यमात वेगवेगळे विषय हाताळले जातात. या माध्यमासाठी कोणतेही सेन्सॉर बोर्ड अस्तिस्त्वात नाहीत. काही वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणारी भडक दृश्य, शिवीगाळ यामुळे त्या चर्चेचा विषय बनतात. नुकताच ‘मिर्झापूर ३ सीजनचा मार्ग मोकळा झाला आहे. या वेबसीरिजच्या विरोधात एकाने याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.