देशामध्ये करोनाची तिसरी लाट ओसरुन आता दहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. गेल्या वर्षी जून आणि जुलैचे दोन महिने सोडले तर करोना बाधितांच्या संख्येचा आलेख हा घसरता राहीला आहे. एवढंच काय गेल्या २४ तासात मुंबईसारख्या शहरात करोना बाधित एकही रुग्ण आढलेला नाही हे विशेष.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील करोनाबाबतची परिस्थिती जरी पुर्णपणे आटोक्यात असली तरी जगभरात मात्र काही ठिकाणी परिस्थिती अजुनही गंभीरच असल्याचं दिसत आहे. युरोपमध्ये आजही दैनंदिन ८० हजारपेक्षा जास्त करोना बाधितांची नोंद होत आहे, जपानमध्ये हेच प्रमाण एक लाखाच्या घरात आहे, अमेरिकेत ४० हजार एवढं आहे तर चीन आत्तापर्यंतच्या सर्वांत मोठ्या करोना लाटेचा सामना करत आहे.

असं असतांना देशात नोव्हेंबरपासून करोना बाधिताचा आकडा हा एक हजारच्या खालीच राहीला आहे. थोडक्यात तीन वर्षांपूर्वी देशात हाहाकार माजवणाऱ्या करोना विषाणूचे अस्तित्व नगण्य राहीले आहे असंच म्हणावे लागेल.

प्रभावी लसीकरण

जगभरात करोनाचा उद्रेक अजुनही थांबलेला नसतांना मग भारतात करोना असा का वागत आहे, जणू काही वेगळी वागणूक करोनाने इथे दिली आहे का? तर याचे उत्तर निश्चितच नाही असं आहे. दहा महिन्यात लाट न येणे, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत डेल्टा आणि ओमायक्रॉनची बहुसंख्यांना झालेला बाधा, त्यानंतर झालेले मोठ्या प्रमाणात लसीकरण यामुळे करोनाचा प्रभाव भारतात नगण्य झाल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

“याचा अर्थ एकच आहे की देशामध्ये बहुसंख्य लोकांमध्ये करोनाचा सामना करण्यासाठी पुरेशी प्रतिकारशक्ती अजुनही आहे.वनोंदवलेल्या रुग्णसंख्येपेक्षा करोनाचा संसर्ग अजुनही होत असला तरी प्रतिकारशक्ती चांगली असल्याने विषाणूचा प्रभाव हा नगण्य राहीला आहे. करोनाचा संसर्ग अजुनही होत आहे, मात्र आधी झालेला संसर्ग आणि लसीकरण यामुळे प्रतिकारशक्ती ही आता विषाणूपेक्षा प्रभावी ठरली आहे”, असं मत दिल्ली स्थित Institute of Genomics and Integrative Biology चे माजी संचालक अनुराग अगरवाल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना व्यक्त केलं आहे.

मोठ्या प्रमाणात राबवलेली लसीकरण मोहिम, विशेषतः करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असलेल्या व्यक्तिंना केलेलं लसीकरण यामुळे करोनाचा प्रभाव राहिलेला नाही. आता चौथ्या डोसची-बुस्टर डोस देण्याची आवश्यकता सध्या तरी वाटत नाही. आता जर करोनाचे संक्रमण झाले आणि नवा विषाणू तयार झाला तरच ही शक्यता आहे, सध्या तरी आता नव्याने लसीकरणाची आवश्यकता वाटत नाही असं मत अगरवाल यांनी व्यक्त केलं आहे.

“संसर्गाचा उद्रेक केव्हा म्हणता येईल जेव्हा विषाणूच्या समुह प्रसारास मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल, मात्र भारतात गेल्या ९-१० महिन्यात असं काही दिसेलंलं नाही. याचा अर्थ विषाणूचा संसर्ग सगळीकडे होत असला तरी प्रतिकारशक्ती प्रभावी ठरल्याने त्याचा मोठा उद्रेक झालेला नाही”,असं मत ऑक्सफर्ड विद्यापीठाचे विषाणूतज्ज्ञ शाहीद जमील यांनी इंडियन एक्सप्रेसकडे व्यक्त केलं आहे.

करोनाची पुढची लाट येणार का?

अनुराग अगरवाल, शाहीद जमील यांच्या मते भारतात यापुढे करोनाची लाट येण्याची शक्यता जवळपास दिसत नाही.

करोना विषाणूमध्ये नवे संक्रमण होत नवीन विषाणू सध्या तरी तयार झालेला नाही. सध्या जो विषाणू दिसत आहे तो ओमायक्रॉनचा उपप्रकार आहेत असं अगरवाल यांनी सांगितलं. तर भारतासह जगभरात करोनाचा संसर्ग झालेला आहे, प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे. तेव्हा विषाणूचे म्युटेशन होत नवा विषाणू तयार होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. वेगाने संसर्ग होईल अशा विषाणूच्या तयार होण्याची शक्यताही सध्या वाटत नाही असं मत जमील यांनी व्यक्त केलं आहे.

करोना संसर्गाच प्रभाव जरी ओसरला असला तरी आजही संसर्गजन्य नसलेल्या मलेरिया, क्षयरोगाचा मोठा प्रभाव जगाच्या विविध ठिकाणी आजही आहे. तर करोनामुळे इतर आजार होण्याची शक्यता बळावली असल्याचंही दिसून येत आहे. विशेषतः इंग्लंडमध्ये तरुणांमध्ये ह्रदयविकाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why the next wave of corona did not arrive in the country what is the current situation asj