अभय नरहर जोशी
अमेरिकेत बेछूट गोळीबारांमुळे आतापर्यंत शेकडो निष्पाप आबालवृद्धांचे प्राण गेल्याने तेथे बंदूक नियंत्रण कायदा कठोर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर इंग्लंडमधून एक चिंताजनक माहिती समोर आली. इंग्लंड आणि वेल्समधील ४३ विभागीय पोलीस क्षेत्रांपैकी २९ विभागांत गेल्या दशकात अवैध बंदूक वापराचे गुन्हे वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्याविषयी…
‘गार्डियन’च्या विश्लेषणात काय समजले?
इंग्लंड आणि वेल्स येथील तीनपैकी दोन पोलीस क्षेत्रांत बंदुकीच्या गोळीबाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत यापैकी एका पोलीस क्षेत्रात या गुन्ह्यांत जवळपास सहा पटींनी वाढ झाल्याचे दिसते. गार्डियन दैनिकाने केलेल्या गृह विभागातील नोंदीच्या विश्लेषणांत ही माहिती समोर आली. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत संपूर्ण ‘युनायटेड किंग्डम’चा विचार केल्यास बंदुकीच्या गुन्ह्यांत १४ टक्क्यांनी घट झालेली दिसते. यात लंडनमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय घटल्याचे दिसते. मात्र, त्याच वेळी ४३ पोलीस क्षेत्रांपैकी २९ ठिकाणी या गुन्ह्यांत वाढ झाल्याचेही दिसते. यापैकी आठ पोलीस क्षेत्रांत हे प्रमाण दुपटीपेक्षाही जास्त आहे.
गुन्ह्यांचा मुद्दा ऐरणीवर कसा आला?
लिव्हरपूलमध्ये एका आठवड्याच्या अंतराने बंदुकीच्या बेछूट गोळीबाराने तीन जण मृत्युमुखी पडल्याने बंदुकींद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचा मुद्दा ऐरणीवर आला. यात एकाचा पाठलाग करत घरात घुसलेल्या एका बुरखा घातलेल्या बंदूकधाऱ्याने एका नऊ वर्षीय मुलीचीही हत्या केली. या गुन्ह्यात दोन बंदुकींचा वापर झाल्याचे निदर्शनास आले. या वाढत्या घटनांमुळे ब्रिटनमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. इंग्लंडच्या उत्तर भागात आणि मिडलँंड्समध्ये अग्निशस्त्रे (फायरआर्म्स-बंदूक-पिस्तूल वगैरे) उपलब्ध होण्याचे प्रमाण चिंताजनक रीत्या वाढले आहे. त्यामुळे येथे वाढत्या गोळीबाराच्या गुन्ह्यांना नियंत्रणात आणणे उपलब्ध पोलीस मनुष्यबळाद्वारे कठीण जाऊ लागले आहे. दहा वर्षांपूर्वी येथे असे गुन्हे नगण्य होते. विशेषतः ईशान्य भागात २००९ ते २०१२ दरम्यान बंदुकीच्या गुन्ह्याचे वार्षिक सरासरी प्रमाण ९१ होते. तेथे आता हे गुन्हे तिप्पट प्रमाणात वाढले आहेत. येथे २०१९ ते २०२२ दरम्यान या गुन्ह्याचे वार्षिक सरासरी प्रमाण २९४ झाले आहे. क्लीव्हलँड पोलीस क्षेत्रात हे गुन्हे सहा पटींनी वाढून वार्षिक सरासरी २२ वरून १२७ पर्यंत गेले आहे. डरहॅम, ससेक्स, लिंकनशायर, नॉर्थम्ब्रिया, साउथ यॉर्कशायर, नॉरफोक आणि केंट परगण्यांतील (काउंटी) पोलीस क्षेत्रांत बंदूक गुन्ह्यांचे सरासरी प्रमाण गेल्या दहा वर्षांत दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. या भागातील मोठ्या शहरांत या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे.
लंडनमध्ये कोणत्या उपायांमुळे गुन्हे कमी?
ससेक्स, केंट आणि चेशायर या परगण्यात संघटित गुन्हेगारी टोळ्या ग्रामीण भागात सक्रिय झाल्याची माहिती ब्रायटन विद्यापीठातील गुन्हेगारी शास्त्राचे प्राध्यापक आणि बंदूक गुन्हे विशेषतज्ज्ञ पीटर स्कायर्स यांनी दिली. त्यांनी सांगितले, की २०१० दरम्यान ज्या भागात बंदुकीद्वारे होणारे गुन्हे जास्त प्रमाणात घडत होते, त्यापेक्षा जेथे पोलीस पुरेसे सतर्क नाहीत, अशा ठिकाणी हे गुन्हे घडण्याचे प्रमाण आता वाढले आहे. लंडनमध्ये पोलिसांतर्फे राबवलेल्या ‘ऑपरेशन ट्रायडंट’, ‘मेट्स गन’ आणि ‘गँग क्राइम युनिट’ सारख्या प्रतिबंधक उपाययोजनांमुळे येथे गेल्या दशकात बंदूक गुन्ह्यांचे प्रमाण निम्मे करण्यात यश आले आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या एकूण बंदुकीच्या गुन्ह्यांच्या तुलनेत सरासरी पाच गुन्हे आता राजधानी लंडनमध्ये घडतात. लंडनमध्ये अशी स्थिती असताना देशाच्या इतर भागांमध्ये अशा गुन्ह्यांतील वाढीचा अन्वयार्थ लावल्यास, असे दिसते की इंग्लंडच्या उत्तर भागात अशा गुन्ह्यांचे प्रमाण लंडनपेक्षा जास्त झाले आहे. ‘गार्डियन’च्या विश्लेषणात असे आढळले, की मार्च २०२२ पर्यंत, ईशान्य आणि वायव्य भागासह यॉर्कशायर आणि हंबर प्रांतात एक लाख जणांमागे सरासरी १३ जणांविरुद्ध बंदुकीच्या अवैध वापराबद्दलचे गुन्हे दाखल होते. त्या वेळी लंडनमध्ये हेच प्रमाण सरासरी १२ होते.
तपास यंत्रणांना छडा लावणे कठीण का?
क्लीव्हलँडमध्ये हेच प्रमाण दर एक लाख नागरिकांमागे ३२ होते. इंग्लंड आणि वेल्समधील सरासरी दहाच्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट होते. क्लीव्हलँडमध्ये पोलिसांनी या वाढलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सप्टेंबर २०१९ ला विशेष प्रतिबंधक मोहीम राबवली. त्या खालोखाल मिडलँंड्स, ग्रेटर मँचेस्टर, दक्षिण यॉर्कशायर, पश्चिम यॉर्कशायर, मर्सीसाइड आणि नॉर्थम्प्टनशायर येथील गुन्ह्यांचे प्रमाण लंडनच्या तुलनेत जास्त होते. पीटर स्कायर्स यांच्या मते ‘युनायटेड किंग्डम’मध्ये दर महिन्याला सरासरी १०० अवैध अग्निशस्त्रे जप्त केले जातात. मात्र, या शस्त्रांच्या निर्मिती-खासगी वितरणाचे नेमके प्रमाण किती आहे, याबाबत कुठल्याही संस्थेकडे ठोस माहिती नाही. बंदुकींच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुन्ह्यांत एकदा बंदूक वापरली जाते व नंतर ती गायब केली जाते. त्यानंतर दीर्घ काळ बंदुकीचा वापर न झाल्याने ‘नॅशनल बॅलेस्टिक इंटेलिजन्स सर्व्हिस’ व ‘नॅशनल क्राइम एजन्सी’ (एनसीए) या तपास यंत्रणांना अशा ७५ टक्के गुन्ह्यांचा छडा लावणे कठीण जाते.
गुन्हेगारी टोळ्यांची कार्यशैली कशी?
इंग्लंडमधील गंभीर आणि संघटित गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या ‘एनसीए’च्या म्हणण्यानुसार बंदुकींच्या उपलब्धतेवर नियंत्रण आणण्यास राष्ट्रीय प्राधान्यक्रम दिला पाहिजे. ही अग्निशस्त्रे युरोपमधून वाहनांतून लपवून वितरित केली जातात. गुन्हेगारी जाळ्यांद्वारे ती टोळ्यांपर्यंत पोहोचतात. यातील बहुतांश शस्त्रे या ‘हँड गन’ असतात. लिव्हरपूल येथील जॉन मूर्स विद्यापीठातील गुन्हेगारी विषयाचे तज्ज्ञ व मर्सीसाइड परगण्यातील टोळ्यांचे अभ्यासक डॉ. रॉबर्ट हेस्केठ यांनी सांगितले, की लिव्हरपूलमधील काही भागांत बंदूक खरेदी काही आठवड्यांत होऊ शकते. मात्र, या गुन्हेगारी टोळ्या या बंदुका विकत घेण्याऐवजी एकमेकांकडून वापरण्यास घेण्यावर भर देतात. त्यासाठी बंदूक विकत घेण्याची गरज नसते. तिच्या मूळ मालकाकडून काही काळासाठी ती घेऊन आणि वापरल्यानंतर मालकास परत केली जाते. त्यामुळे गुन्ह्यानंतर हे शस्त्र लपवून ठेवण्याची किंवा त्याची विल्हेवाट लावण्याची टांगती तलवार राहत नाही.
विरोधी मजूर पक्षाचा आक्षेप काय आहे?
इंग्लंडमधील विरोधी मजूर पक्षाच्या नेत्या व गृह विभागाच्या समांतर मंत्री ‘शॅडो सेक्रेटरी’ व्हेट कूपर यांनी बंदुकींच्या देशातील अवैध आयातीवर नियंत्रणासाठी गृह विभाग पुरेसे प्रयत्न करत नसल्याची टीका करताना म्हटले, की अनेक ठिकाणी बंदुकीद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणाने गंभीर रूप घेतले आहे. मात्र, सत्ताधारी हुजूर पक्षाने (काँझरव्हेटिव्ह) पोलिसांच्या संख्येत कपात केल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यास किंवा त्यांच्या छडा लावण्यास पोलीस कमी पडत आहेत. इंग्लंडमधील सत्ताधारी नेत्यांनी बंदूक तस्करी रोखण्यासाठी, सक्षम पोलीस यंत्रणेसाठी, बहुतांश क्षेत्रांत सुरू असलेल्या गंभीर हिंसाचाराच्या प्रतिबंधासाठी समन्वयाने कृतियोजना आखण्यासाठी परिषद तातडीने घेण्याची मागणी मजूर पक्ष करत आहे. गृह विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले, की गुन्हेगारांना अवैध रीत्या होणाऱ्या शस्त्रपुरवठ्यावर प्रतिबंधासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच बंदुकीद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणा व इतर काही संस्थांच्या सहकार्यासह योग्य धोरणे, गुप्तचर साहाय्य, तपास आणि कारवायांसाठी सर्वंकष उपाययोजना आखल्या जात आहेत व लवकरच त्यांची प्रभावी अंमलबजावणी होईल. त्याच बरोबर कायदेशीर बंदूक परवानेही कठोर निकषपूर्ती व शहानिशा करून देण्याची काळजी घेतली जात आहे.