तामिळनाडूमधील कल्लाकुरिचीमध्ये १२ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच मृत्यू झाल्यानंतर आंदोलन करत हिंसाचार करण्यात आला. शाळेच्या सुरक्षारक्षकाला वसतीगृहाच्या तळमजल्यावर मुलीचा मृतदेह सापडला. यानंतर चार दिवसांनी शाळेच्या आवारात आंदोलन करत हिंसाचार करण्यात आला. यावेळी तोडफोड करत, बसला आग लावत शाळेच्या संपत्तीचं नुकसान करण्यात आलं. शाळेतील दोन शिक्षकांच्या अत्याचाराला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. दोन्ही शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. जाणून घ्या आतापर्यंत नेमकं काय झालं आहे?
विद्यार्थिनीचा मृत्यू
चिन्ना सालेम जिल्ह्यातील कनियामपूर शक्ती शाळेत १२ वीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा १३ जुलैला शाळेच्या आवारातच मृतदेह आढळला. हॉस्टेलमध्ये तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या या मुलीने वरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. शाळेच्या सुरक्षारक्षकाला हा मृतदेह आढळला.
शिक्षकांकडून होणारा अत्याचार आणि छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. शवविच्छेदनात जखमा आणि रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसल्याचा दावा केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कुटुंबाने मृत्यूआधी तिला दुखापत आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी शाळा प्रशासनाला मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे.
आंदोलन आणि अटक
मुलीच्या मृत्यूची माहिती पसरताच आंदोलनाला सुरुवात झाली असून रविवारी १७ जुलैला आंदोलक हिंसक झाले. आंदोलक पोलिसांसोबत भिडले, दगडफेक केली आणि शाळेच्या बसला आग लावली. आंदोलकांमध्ये मुलीचे नातेवाईकही सहभागी झाले होते. पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून त्यांनी शाळेतही तोडफोड केली.
काही आंदोलक शाळेच्या प्रवेशद्वारावरील कमानीसारख्या गेटवर चढले आणि शाळेचं नाव असणाऱ्या फलकाची तोडफोड केली. तसंच तिथे मुलीला न्याय मिळावा यासाठी बॅनर लावले.
पोलिसांनी याप्रकरणी अण्णाद्रुमुकशी संबंधित दोन आयटी शाखेच्या कार्यकर्त्यांनाही अटक केली आहे. हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांना बेड्या ठोकल्या आहेत.
रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर विशेष पथकाने तपास हाती घेतला असून विद्यार्थिनीची छळ केल्याप्रकरणी रसायनशास्त्र आणि गणिताच्या शिक्षकाला अटक केली आहे. विद्यार्थिनीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोन्ही शिक्षकांचा उल्लेख असल्याचा दावा आहे. आतापर्यंत पाच लोकांना अटक करण्यात आली असून यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचाही समावेश आहे.
हिंसक आंदोलनासाठी शाळेने मुलीच्या आईला ठरवलं जबाबदार
या सर्व घडामोडींदरम्यान शाळेच्या सचिव शांती यांचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये त्यांनी मुलीच्या आईला शाळेच्या आवारात झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार धरलं आहे. पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांमध्ये यांचाही समावेश आहे. शाळा प्रशासनाने मुलीच्या आईवर खोटी बातमी पसरवल्याचा आरोप केला असून, हिंसा घडवण्यासाठी जबाबदार धरलं आहे.
शाळेने आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर शांती यांचा व्हिडीओ शेअर करत मुलीच्या आईवर आरोप केले आहेत. शाळेचं याच्याशी काही देणं घेणं नसल्याचा त्यांचा दावा आहे.
“आम्ही पोलीस कोठडीत असताना त्यांनी (मुलीची आई) सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवत हिंसाचार का घडवला? खोटी माहिती पसरवून आणि लोकांना भडकावून बसेस, खुर्च्या, टेबल जाळण्यात आले,” असं त्या सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
परवानगीशिवाय मृतदेह शवागारात ठेवल्याचा मुलीच्या आईचा आरोप
मुलीच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये त्यांनी परवानगीशिवाय मृतदेह शवागारात ठेवल्याचा आरोप केला आहे. मुलीचा मृतदेहदेखील पाहू दिला जात नसल्याचा त्यांचा दावा आहे. “परवानगीशिवाय माझ्या मुलीचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. माझी मुलगी अनाथ होती का?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
याआधी त्यांनी एका व्हिडीओत मुलीची सुसाईट नोट खोटी असल्याचा दावा केला होता. शाळा प्रशासनाने विनंती केल्यानंतरही आपल्याला सीसीटीव्ही दाखवलं नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
“डॉक्टरांनी मुलीला रुग्णालयात आणलं तेव्हा मृत्यू झालेला होता असं सांगितलं आहे. आम्ही तिचा मृतदेह पाहिला होता. तिचे हात, पाय, चेहरा व्यवस्थित होता, फक्त डोक्यातून रक्त वाहत होतं. तिसऱ्या माळ्यावरुन पडल्यानंतर इतका रक्तस्त्राव कसा झाला असेल? वॉर्डन, मुख्याध्यापक कोणीही आम्हाला भेटण्यास आलं नाही. ही शाळा बंद झाली पाहिजे,” असं त्यांनी व्हिडीओत सांगितलं.
कोर्टाचे शविविच्छेदनाचे आदेश
मुलीच्या वडिलांनी मद्रास उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. यानंतर सोमवारी कोर्टाने त्यासंबंधी आदेश दिले, तसंच सरकारला १४ जुलैला झालेल्या हिंसाचाराचा तपासही करण्याचे निर्देश दिले.
मुलीच्या वडिलांनी याचिकेमध्ये हे प्रकरणी सीबी-सीआयडीकडे सोपवण्यात यावं आणि दुसऱ्यांदा शवविच्छेदन केलं जावं अशी मागणी केली होती. सुनावणीदरम्यान राज्य सरकारने हे प्रकरण आधीच सीबी-सीआयडीकडे सोपवण्यात आलं असल्याची माहिती दिली.
कोर्टाने यावेळी शैक्षणिक संस्था किंवा आवारात झालेल्या कोणत्याही मृत्यूचा तपास सीबी-सीआयडी मार्फतच केला जावा असंही सांगितलं आहे.