दिल्लीच्या कडकड्डूमा न्यायालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये घडलेल्या ईशान्य दिल्लीतील दंगलप्रकरणी शनिवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिद आणि ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’चे खालिद सैफी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमचला यांनी हा आदेश दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोघांना मुक्त करण्याचे तपशीलवार कारण दिल्ली न्यायालयाने दिले आहे. त्यात या आरोपींना बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) याआधीच समान आरोपांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्या सुटकेचा निर्णय आपण घेत आहोत, असे म्हटले आहे.

आरोपी तारिक मोइन रिझवी, जागर खान, मोहम्मद इलियास, खालिद सैफी आणि उमर खालिद यांना कलम ४३७ -ए-सीआरपीसी अंतर्गत १० हजार रुपयाच्या मुचलक्यासह एवढीच जामिनाची रक्कम जमा करण्याचे नर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, या आदेशाची प्रत संबंधित आरोपींना कळवण्यासाठी संबंधित कारगृह अधीक्षकांना पाठवण्यााचे निर्देश न्यायालायने दिले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण? –

२४ फेब्रुवारी २०२० रोजी चांदबाग भागात जमाव जमलेला असताना तेथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस शिपायाच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वत:चा बचाव करण्यासाठी हा शिपाई जेव्हा स्थानिक बंदिस्त वाहनतळाच्या जागेत लपण्यासाठी पळाला, तेव्हा जमावाने कथितरीत्या या वाहनतळाचा दरवाजा तोडून आत लपलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. तसेच वाहनांनाही आग लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने खालिद आणि सैफीला शनिवारी मुक्त केले. परंतु या दोघांनाही ‘यूएपीए’अंतर्गत गुन्ह्यांतर्गत अद्याप जामीन न मिळाल्याने त्यांची या प्रकरणी न्यायालयीन कोठडी कायम असणार आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) माजी नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या मालकीच्या इमारतीचा दंगलखोरांनी दगडफेकीसाठी वापर केल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला. उमर आणि सैफी यांना गुन्हेगारी कटाचा भाग असल्याने या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते, असा युक्तिवाद फिर्यादी पक्षाने केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रमचला यांनी नमूद केले, की उमर आणि सैफी यांच्यावर केलेले आरोप हे कट रचण्यापुरते मर्यादित नसून, दिल्लीत दंगल करण्याच्या व्यापक कटाशी पर्यायाने ‘यूएपीए’ प्रकरणाशी संबंधित आहेत. या दोघांविरुद्ध दिल्लीत दंगल भडकवण्याच्या मोठय़ा कटाच्या आरोपाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने, हे दोन आरोपी सध्याच्या खटल्यात दोषमुक्त होण्यास पात्र आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने उमर खालिद आणि खालिद सैफी यांच्याशिवाय तारिक मोईन रिझवी, जागर खान आणि मो इलियास यांनाही दोषमुक्त केले. तर ताहिर हुसैन, लियाकत अली, रियासत अली, शाह आलम, मोहम्मद शादाब, मोहम्मद आबिद, रशीद सैफी, गुलफाम, अर्शद कय्युम, इर्शाद अहमद आणि मोहम्मद रिहान यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

पोलिसांनी जामीन अर्जावर घेतला होता आक्षेप –

मागील सुनावणीत दिल्ली पोलिसांनी उमर खालिदच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला होता. खालिदच्या सुटकेमुळे समजात अशांतता निर्माण होईल, असे म्हणत दिल्ली पोलिसांनी उमर खालिदच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. बहिणीच्या लग्नासाठी उमर खालिद याने दोन आठवड्यांसाठी न्यायालयासमोर अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. या काळात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य करणार नसल्याचे त्याने सांगितले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why were umar khalid khalid saifi released in delhi riots case msr