अभय नरहर जोशी
अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) या अवकाश संशोधन संस्थेतर्फे १८ डिसेंबर २०२१ रोजी अवकाशात ‘जेम्स वेब’ दुर्बीण सोडण्यात आली. आपल्या सौरमालेपलीकडे बरेच मोठे विश्व आहे. तेथील दीर्घिकांचे निरीक्षण करणे हा या दुर्बिणीचा हेतू आहे. याआधी ‘हबल’ व ‘स्पिटझर’ या दोन दुर्बिणींनी अत्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी केली. त्याच्या पुढचे पाऊल ‘जेम्स वेब’ अवकाश दुर्बिणीने टाकले आणि नेत्रदीपक मनोहारी अवकाश प्रतिमांची मालिका पाठवून नवयुगाची नांदी केली. अद्भुत दूरविश्वाचे दर्शन घडवणाऱ्या या दुर्बिणीविषयी…
नवयुगाचा प्रारंभ का म्हणायचे?
अवकाशगंगांचे नर्तन आणि अवकाशातील महाकाय खडक, अशनी, तारांगणाचे मनोहारी दर्शन ‘नासा’च्या जेम्स वेब दुर्बिणीने १२ जुलैला पाठवलेल्या प्रतिमा मालिकांद्वारे घडवले आणि सर्वांचे डोळे दीपून गेले. याद्वारे यापूर्वी कधी न पाहिलेल्या दूरविश्वाचे भव्य दर्शन होऊ लागले आहे. दहा अब्ज डॉलर खर्चून तयार केलेल्या या अवकाश दुर्बिणीने आपल्याला ही छायाचित्रे पाठवून आपल्या क्षमतेचे दर्शनच जणू घडवले. त्यामुळे अवकाश संशोधन क्षेत्रात एका नवयुगाचा प्रारंभ झाला. जेम्स वेब दुर्बिणीतील तंत्रज्ञान हे आधीच्या दोन दुर्बिणींपेक्षा प्रगत असून त्यात अवरक्त नजीक व मध्य अवरक्त तरंगलांबीचा वापर (इन्फ्रारेड कॅमेरा) करण्यात आला आहे. हे सर्वांत क्रांतिकारी तंत्रज्ञान मानले जाते. त्यामुळे ही दुर्बीण प्रचंड अंतरावरील विश्वाचे सुस्पष्ट दर्शन घडवते. मानवाने अवकाशाची माहिती घेण्यासाठी हा जणू गवाक्षच अवकाशात तयार केला आहे. विज्ञानाला पडलेले अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ही दुर्बीण करणार आहे.
‘जेम्स वेब’ची निर्मितीप्रक्रिया कशी होती?
या दुर्बिणीचा निर्मिती काळ २५ वर्षांचा होता. १९८९ मध्ये ‘स्पेस टेलिस्कोप इन्स्टिट्यूट’ या संस्थेने तसेच ‘नासा’ने पुढील प्रगत दुर्बीण तयार करण्यासाठी एक चर्चासत्र आयोजित केले होते. हबल दुर्बिणीची जागा घेणारी ही दुर्बीण अवरक्त किरणांच्या माध्यमातून निरीक्षण करेल, असे १९९६ मध्येच ठरवण्यात आले होते. त्यात चार मोठे आरसे असतील, हेही जवळपास निश्चित होते. नंतर या आरशांची संख्या वाढवण्यात आली. २००२ मध्ये ‘नासा’ने या दुर्बिणीसाठी लागणारी साधने तयार करण्यासाठी खगोल वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली चमू तयार केले. २००४ मध्ये या दुर्बिणीची बांधणी सुरू झाली. २०११ मध्ये १८ आरसे तयार करून त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. २०१२-१३ या काळात दुर्बिणीचे सुटे भाग तयार करण्यात आले व ते नंतर ‘गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर’ या ‘नासा’च्या संस्थेत आणण्यात आले. २०१३-२०१६ या काळात सुटे भाग एकत्र करण्यात आले. त्यात सूर्यसंरक्षित आवरणाचाही समावेश होता. २०१५-२०१६ या काळात दुर्बिणीची प्रकाशीय उपकरणे सज्ज झाली. २१ फूट (साडेसहा मीटर) आकारांचे जे आरसे बसवण्यात आले, ते १८ सुवर्णजडित भागांचे आहेत. नंतर तयार झालेला दुर्बिणीचा भाग ‘नासा’च्या जॉन्सन स्पेस सेंटर येथे पाठवण्यात आला. तेथे क्रायोजेनिक कक्षात त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. या दुर्बिणीला आधी ‘नासा’ने ‘नेक्स्ट जनरेशन टेलिस्कोप’ असे नाव २००२ मध्ये दिले होते. पण नंतर ‘नासा’चे माजी प्रमुख जेम्स वेब यांचे नाव त्या दुर्बिणीस देण्यात आले. १९६१ ते १९६८ या काळात ते ‘नासा’चे प्रमुख होते. त्यांच्या वेगळ्या मोहिमांसाठी ते प्रसिद्ध होते.
या दुर्बिणीला अवकाशात कसे सोडले?
ही दुर्बीण फ्रेंच गयाना येथून ‘एरिएन-५’ अग्निबाणाच्या सहाय्याने सोडली गेली. पृथ्वीपासून १६ लाख किलोमीटरवरून ही दुर्बीण सूर्याला प्रदक्षिणा घालत आहे. ‘द सेकंड लॅगरेंग पॉईंट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अवकाशातील स्थळावरून ही दुर्बीण कार्यरत असेल. तिला मार्गक्रमणासाठी कमीत कमी इंधन लागेल. अवकाशतंत्रज्ञानातील व अभियांत्रिकीतील विस्मयजनक कामगिरी म्हणून त्याकडे पाहिले जाते. ‘सेर्न’ संस्थेच्या ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’ या वैज्ञानिक प्रयोग प्रकल्पाप्रमाणे या दुर्बिणीसाठी तब्बल दहा अब्ज डॉलर खर्च आला आहे. यापूर्वी हबल दुर्बीण व स्पिटझर दुर्बिणीने अत्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी करून आपल्याला विश्वाची बरीच माहिती दिली आहे. त्यातील मर्यादांवर मात करत आता जेम्स वेब दुर्बीण त्यांची वारसदार म्हणून यापुढे काम करणार आहे. या दुर्बिणीत वीस वर्षे पुरेल एवढे प्रणोदक इंधन (प्रोपेलंट) आहे.
या दुर्बिणीने आतापर्यंत कशाचे दर्शन घडवले?
या दुर्बिणीने पाठवलेल्या प्रतिमांद्वारे साडेतरा अब्ज वर्षांपूर्वीच्या प्रारंभी विश्वनिर्मिती कशी झाली, याचा सर्वांत सुस्पष्ट अंदाज येतो. या दुर्बिणीने ‘कॅरिना नेब्युला’मधील (धूम्रमय नक्षत्रसमूह) ‘एनजीसी ३३२४’ या तारानिर्मिती भागातील तब्बल सात हजार ६०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या पर्वत आणि दऱ्यांचे (कॉस्मिक क्लिफ) दर्शन घडवले. ‘नासा’चे खगोल भौतिकशास्त्रज्ञ अँबर स्ट्रॉन यांनी सांगितले, की आतापर्यंत पाहू न शकलेल्या नवनवीन ताऱ्यांचे दर्शन पहिल्यांदाच या दुर्बिणीद्वारे आम्हाला घडत आहे. या दुर्बिणीने पाच अवकाशगंगांचा समूह ‘स्टीफन्स क्विंटेट’चे यापूर्वी कधीही न झालेले तपशीलवार दर्शन घडवले. यातील चार आकाशगंगा परस्परांच्या जवळ जाताना जणू चकमक घडल्याचाच भास होतो. नक्षत्र समूहाच्या मध्यभागी आकाशगंगा भंगल्याने निर्माण झालेल्या धक्कालहरीही (शॉकवेव्ह) या दुर्बिणीने टिपल्या. ‘सदर्न रिंग नेब्यूला’ या नक्षत्रसमूहामधील एक मिणमिणता ताराही (डिम स्टार) या दुर्बिणीने प्रथमच टिपला. धुळीने लपेटलेला हा तारा नष्ट होण्यापूर्वी वायू लहरी आणि धुळीची वर्तुळे सोडत असल्याचे पहिल्यांदा टिपले गेले. त्यामुळे शास्त्रज्ञांना ताऱ्यांच्या मृत्यू प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत होऊ शकते. या दुर्बिणीद्वारे अति दूरवरच्या एका वायुग्रहाच्या वातावरणात पाण्याची वाफही आढळली. ‘नासा’च्या निकोल कोलोन यांनी सांगितले, की जेव्हा एखादा ग्रह आणि त्याचे वातावरण ताऱ्यासमोरून जाते तेव्हा काय होते याचा परिणाम आम्ही या दुर्बिणीद्वारे पाहू शकलो. जेव्हा ताऱ्याचा प्रकाश वातावरणातून जातो त्याद्वारे प्रकाशाची तरंगलांबी आपण खंडित पद्धतीने अभ्यासू शकतो.
ही दुर्बीण कशी काम करणार आहे?
ही दुर्बीण उणे २२३ अंश सेल्सियस तापमानात काम करणार आहे. या दुर्बिणीला पाच स्तरांचे सूर्य संरक्षक आवरण आहे. त्यामुळे ती थंड राहण्यास मदत होणार आहे. अवरक्त किरण तंत्रज्ञानामुळे ती धुळीच्या ढगांमागे लपलेले तारे व ग्रहांचे निरीक्षण करू शकणार आहे. दुर्बिणीतून मिळालेली माहिती ‘नासा’च्या ‘डीप स्पेस नेटवर्क’मध्ये जमा होणार आहे. नंतर तिचे विश्लेषण देशोदेशीचे वैज्ञानिक करतील. विश्वातील प्रकाश, दीर्घिकांची निर्मिती, ताऱ्यांचा जन्म यांचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेत असणार आहे. याशिवाय केप्लर दुर्बिणीने सुरू केलेली बाह्य़ग्रह शोधण्याची मोहीमही त्यामुळे पुढे चालू राहील. हबल दुर्बिणीची मध्यंतरी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे आता तीन दुर्बिणी अवकाशातील रहस्यांचा एकाचवेळी शोध घेणार आहेत. पण जेम्स वेब दुर्बीण अधिक शक्तिशाली असेल. त्यामुळे विश्वातील अंधुकात अंधूक घटकही तिच्या नजरेतून सुटणार नाही. महाविस्फोटाच्या घटनेनंतर विश्वाच्या जन्माचा जो काही सोहळा झाला, त्या काळात म्हणजे अब्जावधी वर्षांपूर्वीच्या विश्वाच्या इतिहासाच्या टप्प्यातील प्रत्येक गोष्टीचा वेध या दुर्बिणीद्वारे घेतला जाणार आहे. आपल्या सौरमालेतील अनेक रहस्यांचा उलगडा तर होईलच, शिवाय ज्या दीर्घिका आधीच्या विश्वात होत्या त्यांचाही शोध घेतला जाईल. त्यातून माणसाचे विश्वाचे ज्ञान अधिक व्यापक होण्यास मदत होणार आहे.
abhay.joshi@expressindia.com