इंग्लडविरुद्ध तीन कसोटी सामने हरल्यानंतर पाकिस्तानने न्यूझीलंडविरोधात दोन सामान्याची एक मालिका खेळली जी अनिर्णित राहिली. तसं पाहीलं तर घरच्या मैदानावर पाकिस्तान मागील पाच कसोटी सामन्यांपैकी तीन सामने हरला आहे आणि एकाही सामान्यात विजयी झालेला नाही. मात्र सरफराज अहमदच्या शतकाच्या बळावर ते न्यूझीलंडविरोधात दुसरा व शेटवचा सामना जिंकण्याच्या जवळपास पोहचले होते. ही कसोटी अटीतटीच्या परिस्थितीत संपली. सरफराज अहमदच्या ११८ धावांनी एकवेळी ३१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानसाठी विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या.
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित राहिली. ज्यामुळे पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानने गेल्या वर्षी मायदेशात एकही कसोटी सामना जिंकला नाही. पाकिस्तानशिवाय इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ अंतिम शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात, भारतासमोर अंतिमफेरीसाठी काय कशी असणार समीकरणे आणि गुणतालिका काय आहे?
WTC पॉइंट टेबलची काय स्थिती –
पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ WTC अंतिम सामना खेळणार नाहीत. कारण, पाकिस्तान आता ३८.१ टक्के आणि ६४ गुणांसह गुणतालिकेत अजूनही सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड अजूनही ३६ गुण आणि २७.२ टक्क्यांसह आठव्या स्थानावर आहे. अशी न्यूझीलंडची दयनीय अवस्था झालेली आहे.
भारताविरोधात ०-२ अशा पराभवानंतर बांग्लादेश ११.११ टक्क्यांसह नवव्या स्थानावर आहे. वेस्टइंडीज ४०.९१ टक्क्यांसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर इंग्लड ४६.९७ टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाविरोधात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत ०-२ अशा पराभवानंतर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच ५० टक्के पीसीटीसह चौथा स्थानावर घसरली आहे. तर ५३.३३ टक्क्यांसह श्रीलंका तिसऱ्या स्थावर आहे.
टीम इंडियाची स्थिती काय? –
अंतिम फेरीत पोहचण्यासाठी भारताला फ्रेबुवारी आणि मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार नियोजित घरच्या कसोटी सामन्यांपैकी किमान तीन जिंकणे आवश्यक आहे. भारताला बॉर्डर-गावस्कर मालिकेत आपले स्थान कायम राखण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल.
भारताला न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकल्यासही फायदा होऊ शकतो. याशिवाय ऑस्ट्रेलियावर २-० ने विजय मिळवल्यासही भारताला WTC अंतिमफेरीत प्रवेश मिळू शकतो. परंतु जर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध २-० असा विजय मिळवला आणि भारताला तीन सामने जिंकता आले नाहीत तर संघर्ष करावा लागेल.
भारतासाठी पाकिस्तानच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेचा निकाल फारसा परिणामकारक ठरत नाही. कारण, बांग्लादेशच्या भूमीवर २-० अशा विजयानंतर टीम इंडिया ५८.९३ पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया ७८.५७ टक्क्यांसह आरामात अव्वलस्थानावर कायम आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी WTC साठी निर्णायक ठरणार आहे. ही मालिका जर २-२ अशी अनिर्णित राहिली तरीही अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाच जातील. भारताचा या मालिकेतील मोठा पराभवच दक्षिण आफ्रिकेसाठी पुन्हा दरवाजे खुले करू शकतो.