-अन्वय सावंत
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८मध्ये झालेल्या केप टाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरून बॅन्क्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली होती. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कठोर कारवाई करताना तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची, तर बॅन्क्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली होती. तसेच स्मिथवर केवळ दोन वर्षांसाठी कर्णधारपद भूषवण्यावर बंदी घालण्यात आली होती, तर याच प्रकरणी वॉर्नरला आजीवन कर्णधारपद भूषवता येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या वेगळ्या खेळाडूंसाठी घेण्यात आलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीका झाली. त्यामुळे या वर्षी वॉर्नरची बंदी उठवण्याबाबत चर्चा सुरू झाली; परंतु ही प्रक्रिया फार लांबली. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्याला योग्य वागणूक देत नसल्याची वॉर्नरमध्ये भावना निर्माण झाली. तसेच कुटुंबीयांनाही या सर्व प्रक्रियेचा त्रास होत असल्याचे वॉर्नरने सांगताना आपली कर्णधारपदावरील बंदी उठवण्यामागची याचिका मागे घेतली.
वॉर्नरवर कर्णधारपद भूषवण्यावर आजीवन बंदी का घालण्यात आली होती?
२०१८च्या चेंडू छेडछाड प्रकरणीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा मलिन झाली होती. त्यांना क्रिकेटविश्वात बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले. चेंडूशी छेडछाड करणाऱ्या बॅन्क्रॉफ्टला त्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नव्हता. तो त्याचा केवळ आठवा कसोटी सामना होता. त्यामुळे संघातील अनुभवी खेळाडूंच्या पाठिंब्याशिवाय त्याने चेंडूशी छेडछाड करण्यासारखे पाऊल उचलणे शक्य नसल्याचे म्हटले गेले. या प्रकरणात वॉर्नरला मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले होते. त्याच्या सूचनेनंतरच बॅन्क्रॉफ्टने चेंडूला छेडछाड केल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे वॉर्नरवर क्रिकेट खेळण्यापासून एका वर्षाची बंदी घालण्यात आली. त्या वेळी वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार होता. त्याने केलेल्या कृतीमधून त्याच्यात नेतृत्वगुण नसल्याचे स्पष्ट झाल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियामधील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे कर्णधारपद भूषवण्यापासून वॉर्नरवर आजीवन बंदी घालण्यात आली.
वॉर्नरबाबतची क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भूमिका कधी बदलली?
या वर्षी फेब्रुवारीमध्ये वॉर्नरवरील कर्णधारपदाची आजीवन बंदी उठवण्याबाबतची चर्चा सुरू झाली. मात्र, ही प्रक्रिया फार लांबली. २०१८पासून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झाले. मात्र, वॉर्नरच्या मार्गातील प्रमुख अडथळा होता, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आचारसंहिता. एखाद्या खेळाडूने आपल्यावरील बंदी मान्य केल्यास त्याला पुढे जाऊन या बंदीला आव्हान देण्याची परवानगी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेमध्ये नव्हती. वॉर्नरने २०१८मध्ये आपल्यावरील बंदी स्वीकारली होती. मात्र, त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या आचारसंहितेत काही बदल केले आणि खेळाडूंना प्रदीर्घ कालावधीच्या बंदीला आव्हान देण्याची परवानगी दिली.
आचारसंहितेत काय बदल करण्यात आले?
‘‘आचारसंहितेतील बदलांनुसार, ज्या खेळाडू आणि साहाय्यक प्रशिक्षकांवर प्रदीर्घ कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे, त्यांना या बंदीला आव्हान देता येणार आहे. त्यांच्या विनंतीची त्रिसदस्यीय पुनरावलोकन समितीकडून दखल घेतली जाईल,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नव्या आचारसंहितेत सांगण्यात आले होते. तसेच ज्या खेळाडू किंवा साहाय्यक प्रशिक्षकावर बंदी घालण्यात आली होती, त्यांनी आपल्या वागणुकीत सुधारणा केली आहे का आणि त्याच्यावर बंदी घातल्यापासून पुरेसा कालावधी झाला आहे का, यावर ही बंदी उठवण्याबाबतचा निर्णय होणार असल्याचे या आचारसंहितेत स्पष्ट करण्यात आले होते.
वॉर्नरने बंदीला आव्हान देताना काय म्हटले होते?
‘‘प्रत्येकाला समान संधी मिळणे गरजेचे आहे. मी गुन्हेगार नाही. प्रत्येकाला आपल्यावरील कारवाईला आव्हान देण्याचा अधिकार असला पाहिजे. माझ्यावर बंदी घालण्यात आली ते समजण्यासारखे होते, पण ही बंदी आजीवन असणे योग्य नाही. ऑस्ट्रेलियन संघात परतण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मी स्वत:मध्ये सुधारणा केली आहे. २०१८ मध्ये माझ्यावर बंदी घालण्याचा निर्णय अवघ्या चार दिवसांत घेण्यात आला होता. मात्र, आता ही बंदी उठवण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागतो, हे निराशाजनक आहे. माझ्याबाबतचा निर्णय लवकरच होईल अशी आशा करतो,’’ असे वॉर्नर आव्हान देताना म्हणाला होता.
वॉर्नरने आव्हान देणारी याचिका का मागे घेतली?
वॉर्नरने या वर्षी नोव्हेंबरमध्ये कर्णधारपदाच्या बंदीला आव्हान देणारी याचिका दाखल केली. ही सर्व प्रक्रिया खासगीत होईल असा वॉर्नरचा समज होता; पण तसे झाले नाही. ही सर्व प्रक्रिया सार्वजनिकपणे व्हावी असे त्रिसदस्यीय पुनरावलोकन समितीचे मत होते. त्यामुळे वॉर्नरच्या वागणुकीत कितपत बदल झाला याबाबत चर्चा होण्यापेक्षा पुन्हा २०१८च्या प्रकरणाची अधिक चर्चा झाली. अखेर वॉर्नरने आव्हान देणारी याचिका मागे घेतली. ‘‘समितीला ही प्रक्रिया सर्वांसमोर करायची आहे. मात्र, मी माझ्या कुटुंबाला क्रिकेटचे गलिच्छ कपडे धुण्याचे वॉशिंग मशीन बनवू इच्छित नाही,’’ अशी तीव्र प्रतिक्रिया वॉर्नरने व्यक्त केली.