२०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेला २० नोव्हेंबर पासून कतारमध्ये सुरुवात झाली आहे. फ्रान्स हा स्पर्धेचा गतविजेता आहे, त्यांनी २०१८ मध्ये फिफा विश्वचषक जिंकला होता. २०२२ च्या विश्वचषकात फ्रान्सचा पहिला सामना २३ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. गतविजेत्या फ्रान्सकडे २०२२ च्या विश्वचषकासाठी फेव्हरेट्स म्हणून पाहिले जाते. फ्रान्सच्या संघाला या स्पर्धेत प्रगती करण्यापासून केवळ इतर प्रतिस्पर्धी संघचं नाही तर एक ‘अभिशाप’ देखील रोखू पाहत आहे. या अभिशापाला ‘विजेत्यांना शाप (चॅम्पियन्स कर्स)’ म्हणतात. या शापामुळे आधीच अनेक गतविजेते दुखावले गेलेले आहेत.
रशियामध्ये झालेल्या २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव केला होता. फ्रान्सच्या इतिहासात त्यांनी दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली होती. या आधी २०१४ ला ब्राझीलमध्ये विश्वचषक स्पर्धा पार पडली तेव्हा जर्मनीने ट्रॉफी जिंकली होती. परंतु २०१८ ला रशियामध्ये ‘गतविजेते’ म्हणून उतरलेला जर्मन संघ ग्रुप स्टेजच्या पुढे देखील जाऊ शकले नाहीत. जर्मनी संघाच्या ग्रुपमध्ये स्वीडन, मेक्सिको आणि दक्षिण कोरिया सारख्या संघांचा समावेश होता. जर्मन संघ या गटात तळाच्या स्थानी होता.
‘गतविजेत्या’ संघाची ग्रुप स्टेजमध्येच बाद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. २००२ पासून, फिफा विश्वचषकातील प्रत्येक गतविजेत्या संघाच्या नशिबी हीच वेळ आली होती. २००६ मध्ये केवळ ब्राझीलचा संघ याला अपवाद म्हणून ठरली. ‘विजेत्यांच्या शापाचा (चॅम्पियन्स कर्स)’ इतिहास हा खालीलप्रमाणे घडत गेला:
२००२: फ्रान्स ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला
२०१०: इटली गट टप्प्यात बाहेर
२०१४: स्पेन ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला
२०१८: जर्मनी ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला
फ्रान्स २०२२ च्या कतार विश्वचषकात त्यांच्या मजबूत संघासह उतरणार नाही. पॉल पोग्बा, एन’गोलो कांटे आणि प्रेस्नेल किम्पेबे हे खेळाडू आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, तर करीम बेंझेमा आणि क्रिस्टोफर न्कुंकू यांना सराव सत्रात दुखापत झाल्याने आता ते देखील बाहेर पडले आहेत. त्यामुळे फ्रान्सच्या बाबतीत ‘विजेत्यांचा शापाच्या’ इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.