गेल्या अनेक वर्षांनंतर पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संस्कृत शब्दकोशाचा लेखन आणि संपादकीय कक्ष विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. १९४८ मध्ये या सर्वात मोठ्या शब्दकोश प्रकल्पाला सुरूवात झाली होती. हा जगातील सर्वात मोठा संस्कृत शब्दकोश असणार आहे. या संस्कृत शब्दकोश बनवण्याची प्रक्रिया नेमकी कशी राहिली आहे आणि याची वैशिष्टे काय आहेत? जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : गुजरातमध्ये पशुधन नियंत्रण विधेयक का मागे घेतले?
अशी झाली सुरूवात
पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील भाषाशास्त्र विभागाचे प्रमुख आणि संस्कृत प्राध्यापक एस.एम. कात्रे यांनी १९४८ मध्ये जगातला सर्वात मोठा संस्कृत शब्दकोश बनवण्याच्या अनोख्या प्रकल्पाची कल्पना मांडली आणि कामाला सुरूवात केली. त्यांनी या शब्दकोशाचे पहिले संपादक म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर प्राध्यापक ए. एम. घाटगे यांनी या शब्दकोशाचे काम पुढे नेले. १९४८ ते १९७३ दरम्यान ४० तज्ज्ञांनी ऋग्वेदपासून (अंदाजे १४०० ईसापूर्व) ते हस्यार्णवपर्यंत (१८५० ए.डी.) ६२ शांखांमधील १४६४ पुस्तकांचा अभ्यास करत हा शब्दकोश तयार केला आहे. या शब्दकोशात वेद, दर्शन, साहित्य, धर्मशास्त्र, व्याकरण, तंत्र, महाकाव्य, गणित, स्थापत्य, वैद्यकशास्त्र, पशुवैद्यकशास्त्र, कृषी, संगीत, शिलालेख, इनडोअर गेम्स, युद्ध, राजनैतिक आदी विषयांचा समावेश आहे. हा प्रकल्प गेल्या सात दशकांपासून संस्कृत अभ्यासकांचा संयम, कष्ट आणि अथक प्रयत्नांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आज २२ संस्कृत प्राध्यापकांची एक चमू या शब्दकोशीसाठी काम करते आहे. लवकरच या शब्दकोशाचा ३६वा खंड प्रकाशित करण्यात येणार आहे.
हेही वाचा – विश्लेषण : MEA ने कॅनडातील भारतीयांना सतर्क राहण्यास का सांगितले आहे?
शब्दकोश तयार करण्याची प्रक्रिया कशी?
शब्दकोश तयार करणाऱ्या तज्ज्ञांकडून प्रत्येक शब्दाचा तपशील एका कागदावर नोंदवण्यात येत असे. १४६४ पुस्तकांमधून शब्द काढण्याच्या प्रक्रियेला २५ वर्षे लागली. या २५ वर्षात एक कोटी शब्दांचा तपशील गोळा करण्यात आला होता. ही सर्व कागदं एका लेखन कक्षात खास डिझाइन केलेल्या कपाटात जतन करण्यात आली आहेत. तसेच ते स्कॅन करून डिजिटल पद्धतीने जतनही केले जात आहेत. या शब्दकोशात वर्णक्रमानुसार शब्दांची रचना केली आहे. तसेच शब्दांच्या अर्थाव्यतिरिक्त, शब्दाची अतिरिक्त माहिती, संदर्भही देण्यात आले आहेत. “कधीकधी, एखाद्या शब्दाचे २० ते २५ अर्थ निघू शकतात. शब्दांचा वापर पुस्तकांच्या संदर्भानुसार बदलत असतो. एखाद्या शब्दाचे विविध अर्थ सापडल्यानंतर पहिला मसुदा तयार केला जातो. त्यानंतर ते मुद्रीत शोधणासाठी पाठवले जाते. त्यानंतर त्याला संपादकाकडे पाठवले जाते. तो मसुदा अंतिम झाल्यानंतर छपाईसाठी पाठवला जातो”, अशी माहिती प्रकल्पाच्या सहाय्यक संपादक सारिका मिश्रा यांनी दिली. तर “आम्ही एका वर्षापेक्षा कमी कालावधीत एक खंड प्रकाशित करू शकतो. एका खंडात अंदाजे चार हजार शब्द समाविष्ट केले आहेत,” अशी माहिती सहाय्यक संपादक ओंकार जोशी यांनी दिली आहे. दरम्यान, आता पर्यंत एकूण ६०५६ पानांचे ३५ खंड प्रकाशित करण्यात आले आहेत.
जगातला एकमेव विपुल शब्दसंग्रह?
प्र-कुलगुरू प्राध्यापक प्रसाद जोशी हे या शब्दकोशाचे नववे मुख्यसंपादक आहेत. या प्रकल्पात काम करणारे त्यांचे वडील आणि काका यांच्यानंतर कुटुंबातील तिसरी व्यक्ती आहेत. २०१७ पासून प्राध्यापक जोशी हे या प्रकल्पाचे प्रभारी म्हणून काम बघत आहेत. एवढा समृद्ध आणि विपुल शब्दसंग्रह असलेली जगात दुसरी कोणती भाषा आहे का, असे विचारले असता ते म्हणतात, “ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोश २० खंड आणि २,९१,५०० शब्दांसह सर्वात लोकप्रिय आणि वापरल्या जाणार्या शब्दकोशांपैकी एक आहे. तर Woordenboek Der Nederlandsche Taal (WNT) हा डच भाषेतील आणखी एक मोठा एकभाषिक शब्दकोश आहे. यात १७ खंडांमध्ये ४.५ लाख शब्द आहेत. आपला संस्कृत शब्दकोश तयार झाला की या दोन्ही शब्दकोशांच्या तुलनेत तो तिप्पट असेल. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या ३५ खंडांमध्ये सुमारे १.२५ लाख शब्द आहेत. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी काही दशके लागणार आहेत. या शब्दकोशात अंदाजे २० लाख शब्दांचा संग्रह असेल असा आमचा अंदाज आहे.”
लवकरच डिजीटल स्वरुपात प्रकाशित
प्राध्यापक जोशी यांच्या चमूवर संस्कृत भाषा जिवंत ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. पण संस्कृत भाषेचा अभ्यास करणाऱ्यांची खरी कमतरता आहे. मात्र, या चमूकडून लोकांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आणि त्यांचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या, सर्व प्रकाशित खंड पुस्तक स्वरुपात उपलब्ध आहेत. मात्र, वर्षभरता डिजिटल कॉपी उपलब्ध करून देण्यासाठी कॉलेज प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे.