बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे कुटुंब एका खंडणी प्रकरणामुळे अडचणीत आले आहे. हे प्रकरण २००३ पासून सूरत न्यायालयात सुरू आहे. एका कथित खंडणी प्रकरणाशी संबंधित सुरत जिल्हा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका वकिलाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि तीच्या पालकांसह डॉन फजलू रहमानचाही समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, शिल्पा शेट्टीची आई सुनंदा यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील मिनेश झवेरी अलीकडच्या न्यायालयीन सुनावणीत अनुपस्थित होते आणि त्यांच्या जागी एक कनिष्ठ वकील उपस्थित होता. परंतु, कनिष्ठ वकिलाच्या उपस्थितीसाठी आवश्यक असणारी स्वाक्षरी न्यायालयाला दिसून आली नाही. त्यामुळे न्यायालयाने कनिष्ठ वकिलाला दंड ठोठावला. हे प्रकरण नक्की काय आहे? या प्रकरणाशी शिल्पा शेट्टी यांचा संबंध काय? त्याविषयी जाणून घेऊ या.
शिल्पा शेट्टीशी संबंधित प्रफुल साडी प्रकरण काय आहे?
शिल्पा शेट्टीशी संबंधित हे प्रकरण १९९८ पासूनचे आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुरत येथील प्रफुल साड्यांसाठी एका टीव्ही जाहिरातीमध्ये मॉडेलिंग करण्यासाठी एक वर्षाचा करार केला होता. परंतु, संबंधित जाहिरात एका वर्षानंतरही प्रसारित होत राहिली. त्यासंबंधी अभिनेत्रीने तक्रार करीत, हे कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आणि कंपनीचे मालक पंकज अग्रवाल यांच्याविरुद्ध कायदेशीर नोटीस दाखल केली. चार वर्षे ही जाहिरात प्रसारित होत राहिली. त्यामुळे शिल्पा शेट्टीने चार वर्षांच्या वाढीव प्रसारणासाठी ८०,००,००० रुपये देण्यात यावेत, असे सांगितले.
याच प्रकरणी बदला म्हणून कंपनीचे मालक पंकज अग्रवाल याने २००३ मध्ये सुरतच्या उमरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत त्यांनी आरोप केला की त्यांना अंडरवर्ल्ड डॉन फजल-उर-रहमानकडून धमकीचा फोन आला. फजल-उर-रहमान शिल्पा शेट्टीच्या वतीने त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे त्याने आपल्या तक्रारीत म्हटले. खटला दाखल करताना या खटल्यात शिल्पा शेट्टीचे पालक सुरेंद्र आणि सुनंदा शेट्टी, तिचे तत्कालीन वैयक्तिक सचिव दिलीप पळसेकर, रेहमान आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर विविध आयपीसी कलमांखाली तक्रार दाखल करण्यात आली.
शिल्पा शेट्टीच्या कुटुंबाविरुद्ध कायदेशीर कारवाई
या प्रकरणात शिल्पा शेट्टीची आई सुनंदा, वडील सुरेंद्र आणि इतर काही आरोपींना अटक करण्यात आली; पण नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले. २०१० मध्ये या प्रकरणातील आरोप खरे असल्याचे सांगण्यात आले आणि २०१३ मध्ये यावर न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली. खटला सुरू झाल्यानंतरच पळसेकर आणि सुरेंद्र शेट्टी यांचे निधन झाले. मात्र, या प्रकरणाचा तपास वर्षानुवर्षे सुरूच आहे. शिल्पा शेट्टीच्या पालकांनी अग्रवालशी केलेल्या संभाषणाच्या अनेक व्हॉइस क्लिप गोळा करण्यात आल्या. न्यायालयाला डॉन आणि अग्रवाल यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंगदेखील सापडले.
पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप्सची मदत
पुरावे म्हणून न्यायालयात अनेक ऑडिओ क्लिप्स ऐकवण्यात आल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमार यांनी अश्रफ यांच्याशी झालेल्या फोन संभाषणाच्या रेकॉर्डिंगच्या आधारे अग्रवाल यांची साक्ष घेतली. सुनंदा शेट्टीकडून लढणाऱ्या कनिष्ठ वकिलाने यावर आक्षेप घेतला आणि दावा केला की, रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ संभाषणात काय म्हटले आहे याची तपशीलवार नोंद केलेली नाही.
न्यायाधीशांनी कनिष्ठ वकिलाला कोणी कामावर ठेवले, असा प्रश्न केला, ज्यावर त्यांनी आपण सुनंदा यांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे सांगितले. न्यायाधीशांनी वकालतनामा (न्यायालयात पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वकिलाला अधिकृत करणारे कायदेशीर कागदपत्र) तपासला आणि त्यावर त्यांना कनिष्ठ वकिलाची स्वाक्षरी आढळली नाही. त्यानंतर न्यायालयाने वकिलाला २५ हजारांचा दंड ठोठावला.
न्यायालयीन सुनावणीत नक्की काय घडले?
फेब्रुवारीमध्ये सुरत जिल्हा न्यायालयाने रेहमान आणि सुनंदा शेट्टी यांच्याविरुद्ध न्यायालयात उपस्थित न राहिल्याबद्दल अजामीनपात्र वॉरंट जारी केले आणि ११ एप्रिल रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली. ११ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यादरम्यान तक्रारदार अग्रवाल यांनी अशरफ हा रेहमानचा सहकारी असल्याचे सांगत त्यांच्यातील कथित संभाषणाशी संबंधित पुरावे न्यायालयात सादर केले.
सुनंदा यांचे वकील अनुपस्थित असल्याने त्यांचे प्रतिनिधित्व कनिष्ठ वकिलाने केले. न्यायालयात पुरावे सादर करताना, सुनंदा यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने आक्षेप घेतला. त्यावेळी वकिलाला पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यास अधिकृत करणारे कायदेशीर कागदपत्र तपासल्यानंतर न्यायालयाला त्यांची सही आढळली नाही आणि अखेर त्यांना दंड ठोठावला. आता खटल्याची पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.
फजल-उर-रहमान कोण आहे?
फजल-उर-रहमान उर्फ फजलूवर अंडरवर्ल्ड गुंड आहे. त्याने दुबईतील अनेक अंडरवर्ल्ड गुंडांबरोबर काम केल्याचा संशय आहे. फजल-उर-रहमान मूळचा बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी आहे. फजलू हा १९९८ मध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्या अपहरणानंतर पहिल्यांदाच चर्चेत आला होता. २०१८ मध्ये फजल-उर-रहमानसह सर्व आरोपींची निर्दोष सुटला झाली. त्यांच्यावर १५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप होता. रेहमान बराच काळ मलेशियात होता आणि देशात परतला असल्याची माहिती आहे.