Effects of heat waves on humans : मार्च महिना सुरू होताच देशभरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमधील कमाल तापमाचा पारा ३७ अंशाच्या पार गेला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा रखरखत्या उन्हात बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, अति उष्ण तापमानामुळे आरोग्यावर परिणाम तर होतोच; शिवाय वेळेआधी वृद्धपणाही येऊ शकतो, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. अभ्यासात नेमकं काय म्हटलं आहे, याबाबत जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अति उष्णतेमुळे शरीरावर काय परिणाम होतो?

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला, “अति उष्णतेमुळे आपल्या शरीरातील ऊर्जा झपाट्याने कमी होऊन वृद्धत्वाची प्रकिया वेगवान होते. उष्ण तापमानामुळे वेळेआधीच वृद्धपणा येऊ शकतो. दीर्घकाळ अतिउष्ण तापमानात राहिल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर पडताना नागरिकांनी शक्य तितकी काळजी घ्यायला हवी. उष्ण तापमानाचा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होतो”, असंही अभ्यासात नमूद करण्यात आलं.

संशोधकांनी नेमका कसा अभ्यास केला?

सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या पीअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. वृत्तानुसार, संशोधकांनी या अभ्यासात सुमारे ३,७०० व्यक्तींना सहभागी करून घेण्यात आले होते. विशेष म्हणजे सर्व व्यक्तींचे वय ६८ वर्षांच्या आसपास होतं. संशोधकांनी वृद्धत्वाच्या प्रक्रियेवर दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्काचे आनुवंशिक परिणाम पाहिले. त्यांनी २०१० ते २०१६ दरम्यान सहभागींच्या ठावठिकाणांचे निरीक्षण केले आणि उष्णतेच्या लाटांची तीव्रता तपासली. संशोधकांनी यूएस हीट इंडेक्स वापरून उष्णतेच्या पातळीचे तीन गटांत विभाजन केले.

आणखी वाचा : Haircut in Space : अंतराळात कसे कापतात केस? सुनीता विल्यम्सच्या केसांची का होतेय चर्चा?

अभ्यासासाठी तापमानाची तीन गटांमध्ये विभागणी

पहिला गटाला सावधगिरी (३२ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान), दुसऱ्या गटाला आत्यंतिक सावधगिरी (३२-३९ डिग्री सेल्सिअस) व तिसऱ्याला अतिधोका (३९-५१ डिग्री सेल्सिअस) असे नाव दिले. लोक सरासरीपेक्षा किती लवकर वृद्ध होत आहेत हे शोधण्यासाठी संशोधकांनी रक्ताच्या नमुन्यांमधील एपिजेनेटिक बदलांसाठी हजारो जीनोमिक क्षेत्रांची तपासणी केली. संशोधकांनी ड्युनेडिनपेस (DunedinPACE), पीसीग्रिमएज (PCGrimAge) व पीसीफेनोएज (PcPhenoAge) या तीन जैविक वृद्धत्व मोजणाऱ्या घड्याळांचा वापर केला.

अभ्यासातून नेमकं काय समोर आलं?

अभ्यासानुसार, उष्णतेच्या दीर्घकाळ संपर्कात राहणं आणि जलद वृद्धत्व यांचा थेट संबंध आहे. संशोधकांना असं आढळून आलं की, उच्च तापमानाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती वेळेआधीच वृद्ध होतात. सहा वर्षांच्या चाचणी कालावधीत, पीसीग्रिमएज घड्याळानं १.०९ वर्षांचे अतिरिक्त वृद्धत्व दाखवलं; तर पीसीफेनोएज घड्याळानं २.४८ वर्षांची वृद्धत्वाची वाढ दाखवली. ड्युनेडिनपेस घड्याळ वापरून कमी कालावधीचे वृद्धत्व परिणाम मोजले गेले. त्यामध्ये ०.०५ वर्षांची लहान, परंतु तरीही लक्षणीय वाढ दिसून आली. या निकालांवरून स्पष्ट झाल्यानुसार, अभ्यास कालावधीत उष्णतेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यानं काही व्यक्तींमध्ये अपेक्षित सहा वर्षांपेक्षा ८.४८ वर्षांआधीच वृद्धत्व दिसून आलं होतं.

उष्णता आणि वृद्धत्व यांच्यातील संबंध

जरी वृद्धत्व नैसर्गिकपणे येत असलं तरी लोक वेगवेगळ्या गतीनं वृद्ध होतात. ताणतणाव आणि झोपेचा अभाव ही वृद्धत्वाच्या पर्यावरणीय घटकांची उदाहरणं आहेत, जी कालांतरानं आपलं आरोग्य किती लवकर बिघडू लागतं हे दर्शवितात. वेळेआधी वृद्धत्व येण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे उष्णता. उच्च तापमानात दीर्घकाळ राहिल्यानं आपल्या जनुकांच्या कार्यपद्धतीत बदल होतो. त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्यादेखील निर्माण होतात.

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये डीएनए बदलत नसला तरी पर्यावरणीय ताण जनुकांच्या कार्यपद्धतीवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे ते चालू किंवा बंद होतात. एपिजेनेटिक्स नावाची ही प्रक्रिया वृद्धत्वाचा एक प्रमुख घटक आहे. डीएनए मेथिलेशन (डीएनएएम) हा एपिजेनेटिक नियंत्रणाचा सर्वांत सुप्रसिद्ध प्रकार आहे. ही एक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे रसायने डीएनएशी बांधली जातात आणि आनुवंशिक कोड स्वतः बदलल्याशिवाय जनुक क्रियाकलाप बदलतात.

हेही वाचा : पीएचडीधारक विद्यार्थ्याचा ६० महिलांवर बलात्कार, व्हिडीओही काढले; घटनेला वाचा कशी फुटली?

उष्णतेच्या ताणामुळे डीएनए पॅटर्नमध्ये बदल

उष्णतेच्या ताणामुळे डीएनए पॅटर्नमध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे शरीराची स्वतःची दुरुस्ती करण्याची आणि आवश्यक प्रक्रियांचे नियमन करण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते, असं संशोधकांनी म्हटलं आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील जेरॉनटोलॉजी आणि समाजशास्त्राच्या प्राध्यापक जेनिफर एलशायर म्हणाल्या, “हा अभ्यास खरोखर उष्णता आणि आर्द्रतेच्या संयोजनाबद्दलचा आहे. दीर्घकाळ उष्ण तापमानात राहिल्यानं अनेकांना घाम येतो. त्यामुळे शरीरातून विशिष्ट प्रकारची द्रव्यं बाहेर पडतात. घामाच्या बाष्पीभवनामुळे त्वचेला थंडावा देण्याची आपली क्षमता हळूहळू कमी होते, ज्यामुळे वेळेआधीच वृद्धपण येऊ शकतं. “बऱ्याच वृद्ध व्यक्तींना तर घामही येत नाही”, असंही त्यांनी सांगितलं.

भारतासह अनेक देशांमध्ये उष्णतेच्या लाटा

भारतासह अनेक देशांमध्ये उष्णतेच्या लाटा तीव्र होत आहेत, ज्यामुळे आरोग्य धोके आणि वृद्धत्वाशी संबंधित समस्या वाढत आहेत. मासे, कोंबडी आणि उंदरांमधील एपिजेनेटिक बदलांशी उष्णतेचा संबंध असल्याचे पूर्वीचे पुरावे असूनही, मानवांवर मर्यादित अभ्यास झाले आहेत. सध्याचा अभ्यास हा दीर्घकाळ उष्णतेच्या संपर्कात राहिल्यानं मानवी शरीरावर होणारे परिणाम दाखवून देतो. या शोधांनंतरही तापमानामुळे होणाऱ्या जैविक बदलांशी लोक कसे जुळवून घेऊ शकतात याबद्दल बऱ्याच काही बाबी अज्ञात आहेत. दरम्यान, पर्यावरणीय एपिजेनेटिक्सवरील २०२० च्या पुनरावलोकनात या विषयावर केवळ सात अभ्यास आढळले आहेत. त्यापैकी बहुतेक अभ्यास उष्णतेऐवजी थंडीच्या संपर्कावर केंद्रित होते.