दोन दिवसांपासून उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानीच्या घटना समोर येत आहेत. पावसाच्या रौद्र रूपाचे अनेक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. दरम्यान, मुसळधार पाऊस, पूर, ढगफुटी, वादळ, भूस्खलन या सर्व आपत्ती हवामान बदलामुळे येत आहेत, असे संशोधक सतत सांगत असतात. संशोधक, अभ्यासकांनी सतर्कतेचा इशारा देऊनही मानव अद्याप सजग झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर याआधी देशात कोणकोणत्या राज्यांत अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तहानी झालेली आहे? तसेच त्याची कारणे काय आहेत? हे जाणून घेऊ या ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संशोधकांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरतोय?

सध्या देशात संशोधकांनी सांगितलेल्या घटना प्रत्यक्षात घडत आहेत. आगामी काळात देशात पाऊस अधिक तीव्र होईल आणि कमी काळात अतिमुसळधार पावसाचे प्रमाण वाढेल, असे भाकीत संशोधकांनी यापूर्वी वर्तवलेले आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता, हा अंदाज खरा ठरत आहे, असे म्हटले तर तेे वावगे ठरणार नाही. २०१३ साली उत्तराखंडमध्ये पावसामुळे अपरिमित हानी झाली होती. तेव्हापासून जवळजवळ प्रत्येक वर्षी कमीत कमी एकदा तरी अतिमुसळधार पावसामुळे नुकसान झालेले आहे. या अतिमुसळधार पावासामुळे पूर, पडझड, जीवित हानी, वित्तहानी झालेली आहे. काश्मीर, चेन्नई, बंगळुरू, पुणे, मुंबई, गुरगाव, केरळ, आसाम, बिहार, तसेच देशातील अनेक भागांत अशा प्रकारचा विध्वंस यापूर्वी झालेला आहे.

सध्या उत्तर भारतात पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथे सध्या सुरू असलेला पाऊस हा मागील २० ते २५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक तीव्र आहे, असे म्हटले जातेय. अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती अपरिहार्य असू शकते; मात्र या आपत्तींमुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. अनेक वेळा हलगर्जीपणा, दुर्लक्ष, उदासीनता व लालसा ही कारणे मानवाच्या नुकसानीस कारणीभूत ठरलेली आहेत.

बंगळुरूमध्ये ठिकठिकाणी वेगाने बांधकाम

बंगळुरूमध्ये जवळजवळ दरवर्षी पूर येतो. येथे कोसळणारा पाऊस या पुराला कारणीभूत नाही; तर बऱ्याच वर्षांपासून या भागात सातत्याने ठिकठिकाणी वेगाने बांधकामे होत आहे. परिणामी पाणी वाहून नेणारे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या भागात दरवर्षी पूर येतो.

श्रीनगरमध्ये २०१८ साली मुसळधार पाऊस

श्रीनगरमध्येही अशीच स्थिती आहे. २०१४ साली अतिमुसळधार पावसामुळे या भागात मोठा पूर आला होता. सप्टेंबर महिन्यात झालेल्या चार दिवसांच्या पावसाने येथे हाहाकार माजवला होता. संपूर्ण महिन्यात जेवढा पाऊस पडतो, त्याच्या पाच पट पाऊस त्या चार दिवसांत झाला होता. झेलम नदीच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे. पाणी वाहून जाण्यास नैसर्गिक मार्ग शिल्लक न राहिल्यामुळे येथे पुराचे प्रमाण वाढले आहे.

केरळ, उत्तराखंडमध्येही अशीच स्थिती

केरळ राज्याला मुसळधार पाऊस नवा नाही. २०१८ साली येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नद्यांच्या पूरसदृश भागात मोठ्या प्रमाणात घरे झाली आहेत. तसेच पर्यटकांसाठी पायभूत सुविधा निर्माण करण्यात आल्यामुळेही येथे नद्यांना पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलेली गटारे तुंबलेली असतात. त्यामुळे साधारण पाऊस झाला तरी येथे पूरसदृश स्थिती निर्माण होते. अनेक ठिकाणी पाणी साचते. उत्तराखंडमध्येही मोठ्या प्रमाणात होत असलेली बांधकामे, तसेच कोणतेही नियोजन नसताना पायाभूत सुविधांची उभारणी यांमुळे पुराची स्थिती निर्माण होते, असे एका अभ्यासात म्हटलेेले आहे.

निसर्गचक्राला अडथळा निर्माण न होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे

भूतकाळात घडून गेलेल्या या प्रत्येक घटनेने आपल्याला एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे. या घटनांतून धडा घेणे गरजेचे होते. दुर्दैवाने आपण निसर्गाच्या या इशाऱ्याकडे बहुतांश वेळा दुर्लक्षच केले आहे. सध्या भारतात ठिकठिकाणी वेगाने
बांधकामे केली जात आहेत. त्यामध्ये रस्ते, बंदरे, रेल्वे, शहरातील कामे, गृहनिर्माण, रुग्णालये, वीज केंद्रांची उभारणी आदींचा समावेश आहे. विकासासाठी अशी बांधकामे होणे गरजेचे आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तींचा या बांधकामांवर काही परिणाम होणार नाही हे पाहायला हवे. तसेच या बांधकामांमुळे निसर्गचक्रामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणेही गरजेचे आहे.

पावसाला दोष देणे चुकीचे

सध्या दिल्ली, गुरगाव या भागांत पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. मात्र, पावसाला दोष देणे चुकीचे आहे. विकासाच्या हव्यासापोटी आपण निसर्गचक्रात अडथळा निर्माण करत आहोत की नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extreme rainfall events increasing in india since 2013 know drastic incidents cause behind it prd