मनुष्यबळाची कमतरता आणि नवीन ब्रिगेड्स सुसज्ज करण्याच्या आव्हानांशी तोंड देणाऱ्या युक्रेनच्या कमकुवत स्थितीचा सामरिक फायदा रशियन सैन्याकडून घेतला जात असतानाच या युद्धात आता ‘एफ – १६’ या प्रतिष्ठित लढाऊ विमानाचा प्रवेश झाला आहे. युद्धात हवाई प्रभुत्व महत्त्वाचे ठरते. युक्रेनला मिळणाऱ्या एफ – १६ विमानांनी रशियाचे आक्रमण रोखणे वा युद्धाला कलाटणी देणे शक्य होईल का, याविषयी मतमतांतरे आहेत. त्याचाच हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनला एफ – १६ विमाने कशी मिळाली ?

रशिया-युक्रेन युद्धास अडीच वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना युक्रेनला अमेरिकन बनावटीची एफ – १६ लढाऊ विमाने मिळत आहेत. म्हणजे त्यास बराच विलंब झाला आहे. रशियाच्या प्रचंड हवाईदलास तोंड देण्यासाठी युक्रेनला १०० पेक्षा जास्त एफ – १६ विमाने देण्याची गरज अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मांडली होती. एफ – १६ युक्रेनमध्ये तैनात होत असले तरी अमेरिकेने स्वत:ची विमाने दिलेली नाहीत. बेल्जियम, डेन्मार्क, नेदरलँड्स आणि नॉर्वे यांच्याकडून, विशेष परवाना जारी करून ती दिली जात आहेत. लवकरच ती युक्रेनच्या आकाशात उड्डाण करताना दिसतील. परंतु, सध्या मिळणाऱ्या विमानांची संख्या अपुरी असल्याचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>तब्बल ४० वर्षांनी पुन्हा गगनभरारी घेणार भारतीय व्यक्ती; कोण आहेत शुभांशू शुक्ला?

एफ – १६ चा युद्धावर कसा प्रभाव?

युक्रेन सोव्हिएत काळातील विमानांच्या सहाय्याने रशियन आक्रमणाला तोंड देत आहे. एफ – १६ विमानांमुळे युक्रेनचे लष्करी सामर्थ्य निश्चितपणे वृद्धिंगत होईल. एफ – १६ हे जगातील एक सर्वोत्तम लढाऊ विमान म्हणून गणले जाते. पाच दशकांपासून ते नाटो मित्रराष्ट्रे आणि जगभरातील अनेक हवाई दलांचे पहिल्या पसंतीचे विमान आहे. रशिया-युक्रेन युद्धात काही प्रमुख मोहिमांची जबाबदारी त्यांच्यावर असेल. युक्रेनवर अहोरात्र बॉम्बफेक करणाऱ्या रशियन क्षेपणास्त्र व ड्रोनला रोखण्याचा ते प्रयत्न करतील. शत्रूची हवाई संरक्षण प्रणाली निष्प्रभ करणे, हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी रशियन सैन्याची ठिकाणे आणि दारूगोळा डेपोवर हल्ला करणे यासाठी त्याचा प्रामुख्याने वापर होईल, असे काही अभ्यासकांना वाटते. अर्थात विमान देणारी राष्ट्रे बरोबर कोणती शस्त्रास्त्रे पाठवतील, त्याचा वापर मुक्तहस्ते करू देतील की नाही, यावर बरेच अवलंबून आहे. लांब पल्ल्याची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे मिळाल्यास ती रशियन बॉम्बफेकी व लढाऊ विमानांना आव्हान देऊ शकतात. एफ – १६ ची प्रगत रडार प्रणाली अन्य विमानांनाही शक्य तितके दूरचे लक्ष्य शोधून देतील. या विमानांच्या प्रवेशाने रशियन वैमानिकांच्या मनोधैर्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो. तर युक्रेनियन सैन्याचे मनोबल उंचावण्यास हातभार लागणार आहे.

अडचणी, आव्हाने कोणती?

अवघ्या काही महिन्यांच्या छोटेखानी अभ्यासक्रमातून युक्रेनच्या वैमानिकांना एफ – १६ चे प्रशिक्षण देण्यात आले. ते तुलनेने कमी असल्याने वैमानिकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. परदेशातील वैमानिक तीन वर्षांचा अभ्यासक्रम करतात. यंत्रसामग्रीची गुंतागुंत समजून घेतात. एफ – १६ विमानांचा ताफा युद्धभूमीवर कार्यप्रवण ठेवण्यासाठी देखभाल-दुरुस्ती आवश्यक ठरते. त्यासाठी तंत्रकुशल अभियंते, युद्धसामग्री विमानात समाविष्ट करणारे, गुप्त माहितीचे विश्लेषक आणि आपत्कालीन कर्मचारी यांसारख्या सहाय्यकारी मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. एफ – १६ साठी युक्रेनची रडार यंत्रणा, विमाने सुरक्षितपणे ठेवण्याची जागा (हँगर्स), सुट्टे भाग, इंधन भरण्याची व्यवस्था, दर्जेदार धावपट्टी आदींची आवश्यकता आहे. युद्धकाळात विमानांच्या संरक्षणासाठी युक्रेनला हँगर्स बांधणेही शक्य झालेले नाही. युक्रेनचे हवाई क्षेत्र रशियन क्षेपणास्त्रांच्या कक्षेत आहे. त्यामुळे जमिनीवर एफ – १६ विमानांचे संरक्षण करणेही एक आव्हान असणार आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: महिलांच्या विभागात ‘पुरुष’ बॉक्सर? ऑलिम्पिकमध्ये या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काय आहे?

रशिया काय पवित्रा घेईल?

रशियन सैन्याकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी एफ – १६ जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. आधीच त्यांच्याकडून युक्रेनच्या मर्यादित चांगल्या धावपट्ट्या लक्ष्य करण्यात येत आहेत. युक्रेनने रशियन हल्ल्यांपासून बचावासाठी काही लढाऊ विमाने परदेशी तळावर ठेवण्याचा विचार केला होता. त्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी तीव्र आक्षेप घेतला. युक्रेनच्या लढाऊ विमानांना कोणत्याही पाश्चिमात्य देशातील तळाने थारा दिल्यास क्रेमलिनच्या सैन्यासाठी ते कायदेशीर लक्ष्य असेल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. रशियन सैन्याकडे सध्या १०० लढाऊ विमाने आणि पाळत ठेवणारी अत्याधुनिक रडार प्रणाली आहे. रशियाचे सुखोई – ३५ लढाऊ विमान एफ – १६ साठी धोकादायक ठरू शकते. सुखोई – ३५ची प्रगत रडार प्रणाली एकाच वेळी आठ लक्ष्यांचा मागोवा घेण्यास आणि त्यांना व्यग्र ठेवण्यास सक्षम आहे. असे असले तरी आजवर युद्धात समोर आलेल्या विमानांपेक्षा अधिक सक्षम अशा अमेरिकन बनावटीच्या एफ – १६ शी सामना करायचा आहे हे त्यांनाही लक्षात ठेऊन मोहिमेचे नियोजन करावे लागेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: F16 fighter jets finally arrived in ukraine print exp amy
Show comments