अनेक महिन्यांपासून मध्य प्रदेशातील दामोह जिल्ह्यातील रुग्णांनी आपलं जीवन एका अशा व्यक्तीच्या हाती सोपवलं होतं, जो स्वत: लंडनमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ असल्याचे सांगत होता. डॉ. एन. जॉन कॅम असं त्याचं नाव असल्याचं तो लोकांना सांगत होता. मोठ्या आशेने येणाऱ्या रुग्णांना आपण जगातल्या सर्वात आघाडीच्या हृदयरोगतज्ज्ञाकडून उपचार घेत आहोत असं वाटत होतं. मात्र, त्याचा खोटारडेपणा उघड होण्यास काहीसा उशीरच झाला असं म्हणावं लागेल, कारण तोपर्यंत सात जणांनी आपला जीव गमावला होता. या तोतया डॉक्टरने शस्त्रक्रियेच्या नावाखाली १५ रुग्णांना फसवलं. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. हे प्रकरण उघड होताच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने हस्तक्षेप करत याबाबत चौकशी सुरू केली आहे.

बनावट प्रमाणपत्रे आणि बनावट शस्त्रक्रिया

या फसव्या डॉक्टरचं खरं नाव नरेंद्र विक्रमादित्य यादव असं आहे. त्याने मध्य प्रदेशात स्वत:ची ओळख हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एन. जॉन कॅम अशी सांगितली होती. या खोट्या ओळखीच्या आधारे यादव याने दामोह येथील रुग्णालयात नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला. त्याने जटिल हृदयरोग शस्त्रक्रिया केल्याची बनावट प्रमाणपत्रं बनवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मध्य प्रदेशातील बाल कल्याण समितीचे अध्यक्ष दीपक तिवारी यांनी हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आणले. यामध्ये यादवची योग्य पात्रता नसतानाही रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा वापर केला असा दावा केला आहे. डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत यादव याने तब्बल १५ शस्त्रक्रिया केल्याची माहिती आहे. दुर्दैवाने यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. एका रुग्णाचा मृत्यू शस्त्रक्रियेदरम्यानच झाल्याचे समजते.

पीडित रुग्णांपैकी एक ६३ वर्षीय रहीसा होत्या, त्यांना १३ जानेवारीला हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली आणि १६ जानेवारीला अँजिओप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना पुन्हा झटका आला आणि मग त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले. काही वेळाने रहीसा यांचा मृत्यू झाला, अशी माहिती रहीसा यांचा मुलगा नबी कुरेशी याने दिली. “आम्हाला सांगितले की तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, त्यामुळे आम्ही शवविच्छेदनासाठी गेलो नाही. पण, नंतर आम्हाला माध्यमांकडून कळले की एक तोतया डॉक्टर रुग्णांवर शस्त्रक्रिया करत आहे. तिच्या मृत्यूनंतर रुग्णालयाकडून अद्याप कोणीही आमच्याशी काही बोललेले नाही”, असं नबी कुरेशी याने एका वृत्तवाहिनीला सांगितले. पाटेरा इथल्या जितेंद्र सिंग यांनी त्यांचे वडील मंगल सिंग यांना ४ फेब्रुवारीला अॅसिडिटीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली आणि लगेचच हृदय शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेच्या काही तासांनंतरच त्यांचा मृत्यू झाला असे जितेंद्र सिंग यांनी सांगितले. शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर डॉक्टर दिसलेच नाही आणि त्यांनी आम्हाला आठ हजार रुपयांचं एक इंजेक्शन आणायला सांगितलं, मात्र ते वडिलांना त्यांनी दिलंच नाही असंही जितेंद्र सिंग यांनी सांगितलं.

अशा घटना उघडकीस येताना पाहिल्यानंतर जबलपूर नाका इथले रहिवासी असलेले तिवारी यांनीही तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, रुग्णालयाच्या हृदयरोग विभागात एक व्यक्ती अनधिकृतपणे अतिशय गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करत आहे. तक्रारींमधून असं स्पष्ट झालं आहे की, यादव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असण्याची शक्यता आहे. तो एकाच ठिकाणी फार काळ वास्तव्य करत नाही. तो वारंवार एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जातो, असा संशय तिवारी यांनी व्यक्त केला.

अशा अनेक घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने अधिकृत चौकशी सुरू केली आहे. या तोतया डॉक्टरविरुद्ध तक्रार झाल्यापासून तो बेपत्ता आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक ७ ते ९ एप्रिलदरम्यान दामोह इथे जाईल. ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तक्रारीत नमूद केलेल्या संस्थेची आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करतील, अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य प्रियंका कानूंगो यांनी माध्यमांना दिली. तक्रारीनुसार, संबंधित रुग्णालयाने प्रधानमंत्री आयुष्मान योजनेअंतर्गत आलेल्या सरकारी निधीचाही गैरवापर केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती दामोहचे जिल्हाधिकारी सुधीर कोचर यांनी दिली. तसंच तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.