What Is Fake Fielding Rule India Bangladesh Video Of Virat Kohli: टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्द बांगलादेश सामन्यानंतर बांगलादेश संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज नुरूल हसनने सामन्यानंतर विराट कोहलीवर ‘फेक फिल्डींग’ केल्याचा आरोप केला आहे. विराटने केलेली कृती पंचांनी वेळीच पाहिली असती तर आम्हाला पाच अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या, असं नुरुल म्हणाला आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. हर्षा भोगलेंपासून अनेकांनी या आरोपांवर मत व्यक्त केलं आहे.
नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण
मात्र हे ‘फेक फिल्डींग’ प्रकरण नेमकं असतं तरी काय? ‘फेक फिल्डींग’चे नियम काय आहेत? ‘फेक फिल्डींग’ केली म्हणजे नेमकं काय केलं? भारत बांगलादेश सामन्यात नक्की घडलं काय? यापूर्वी ‘फेक फिल्डींग’ची काही प्रकरणं घडली आहेत का? ‘फेक फिल्डींग’मध्ये दोषी ठरल्यास काय कारवाई केली जाते? विराटविरुद्ध तक्रार केल्यानंतर त्याला पुढील काही सामन्यांसाठी बाहेर बसावं लागेल का? यासारख्या प्रश्नांबद्दल विराटवर झालेल्या आरोपांनंतर सर्च केलं जात आहे. जाणून घेऊयात या ‘फेक फिल्डींग’बद्दलची सविस्तर माहिती…
नुरुलने नेमकं काय म्हटलं आहे?
लिटन दास आणि नाजमुल सांतो यांनी १८४ धावांचा पाठलाग करताना पाऊस सुरु होण्यापूर्वीच्या सात षटकांमध्ये भारतीय गोलंदाजीची पिसं काढली. सात षटकांमध्ये बिनबाद ६६ वरुन बांगलादेशचा पराभव झाल्याने तो चाहत्यांबरोबरच खेळाडूंनाही जिव्हारी लागला आहे. शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करुन नाबाद राहिलेल्या नुरुलने शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगला एक चौकार आणि षटकार लगावत बांगलादेशच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण पाच धावांनी त्यांनी हा सामना गमावला आणि सोबत उपांत्यफेरीत पोहोचण्याची शक्यताही धुसर झाली आहे. सामन्यानंतर नुरुलने विराटवर खोटा थ्रो केल्याचा आरोप करत ‘फेक फिल्डींग’कडे इशारा केला. “पावसामुळे नक्कीच आमच्या खेळावर परिणाम झाला. पण यावेळी एक खोटा थ्रो करण्यात आला, ज्यामुळे आम्हाला पाच अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या,” असं नुरुलने म्हटलं.
नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय
नेमकं घडलं काय?
विराट कोहलीने ‘फेक फिल्डींग’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २ नोव्हेंबर २०२२ रोजी टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये अॅडलेडच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये भारताने बांगलादेशवर पाच धावांनी विजय मिळवला. सामन्यातील सातव्या षटकामध्ये कोहलीने केलेली कृती पंचांच्या नजरेतून हुकल्याचा दावा बांगलादेशी चाहत्यांकडून आणि खेळाडूंकडून केला जात आहे. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लिटन दासने सीमारेषेजवळ मारलेला चेंडू अर्शदीप सिंगने यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे फेकला तेव्हा कोहलीने चेंडू आपल्याकडे टाकण्यात आला असून आपण रिलेपद्धतीने तो नॉन स्ट्रायकर्स एण्डला फेकत असल्याची कृती केली. मात्र चेंडू अर्शदीपकडून थेट दिनेश कार्तिकच्या हातात विसावला. यावेळी मैदानातील पंच म्हणजेच मारिस एरॅसमस आणि ख्रिस ब्राऊन या दोघांनाही विराटची ही कृती पाहिली नाही. तसेच लिटन दास आणि सांतोनेही त्यावेळी ही कृती पाहिली नाही. सामन्यानंतर म्हणजेच पाच धावांनी पराभूत झाल्यानंतर मात्र नुरूल हसनने यावर आक्षेप घेत विराटवर ‘फेक फिल्डींग’चा आरोप केला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ… India Bangladesh Fake Fielding Video Of Virat Kohli:
खरंच बंगलादेशला मिळाल्या असत्या का पाच धावा?
नुरुलने बांगलादेशला पाच धावा मिळाल्या असत्या असा उल्लेख सामन्यानंतर विराटच्या ‘फेक फिल्डींग’संदर्भात बोलताना केला. मात्र खरोखर बांगलादेशला या धावा मिळाल्या असत्या का असा प्रश्न विचारल्यास नियमांप्रमाणे त्याचं उत्तर हो असं द्यावं लागेल. आयसीसीच्या नियम क्रमांक ४१.५ नुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूने जाणूनबुजून त्याच्या बोलण्यामधून किंवा कृतीतून फलंदाजाचं लक्ष विचलित करण्याचा, त्याची फसवणूक करण्याचा किंवा फलंदाजीमध्ये अडथळा करण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. जर पंचांना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूकडून असं काही झाल्याचं आढळलं तर ते संबंधित बॉल डेड बॉल जाहीर करु शकतात तसेच पाच धावा पेनाल्टी धावा म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघाला देऊ शकतात. म्हणजेच विराटच्या ‘फेक फिल्डींग’वर फलंदाजांनी किंवा पंचांनी वेळीच आक्षेप घेतला असता तर कदाचित बांगलादेशला अतिरिक्त पाच धावा मिळाल्या असत्या.
नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video
पूर्वी कोणाला ठोठावण्यात आला आहे दंड?
२०१७ मध्ये क्रिकेटच्या नियमांमध्ये जे बदल करण्यात आले त्यामध्ये पहिल्यांदा ‘फेक फिल्डींग’चा समावेश करण्यात आला. या नियमानुसार ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनला सर्वात आधी दंड ठोठावण्यात आला होता. जेएलटी वन-डे कप स्पर्धेमध्ये लाबुशन क्विन्सलॅण्ड बुल्सच्या संघाकडून खेळताना त्याला या नव्या नियमाचा फटका बसला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाविरुद्ध ब्रिसबर्नमध्ये खेळताना लाबुशनने मीड ऑफवरुन चेंडू फेकत असल्याचा आव आणत हात हवेत फिरवला मात्र त्याच्या हातात चेंडू नव्हता. त्यामुळेच त्याला ‘फेक फिल्डींग’च्या नियमाअंतर्गत दोषी ठरवण्यात आलं.
मागील वर्षी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या सामन्यामध्ये पाकिस्तानने केलेला ‘फेक फिल्डींग’चा दावा फेटाळून लावण्यात आला होता. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये ३१ धावांची गरज असताना फकर झमानला क्विंटन डी कॉकने धावबाद केलं होतं. मात्र धावबाद करताना डी कॉकने क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू नॉन स्ट्राइकर एण्डला चेंडू फेकत असल्याचा इशारा केला होता. मात्र चेंडू फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या दिशेने म्हणजेच विकेटकिपरकडेच आला आणि बेसावध असलेल्या फकर झमान धावबाद झाला. फकर झमानला चेंडू विरुद्ध बाजूला फेकला जात असल्याचं वाटलं आणि तो हळू धावू लागला. मात्र सीमारेषेजवळून अदिन मार्करमने थेट स्टम्पवर चेंडू फेकला आणि फकर क्रिझबाहेर असल्याने बाद झाला.
‘फेक फिल्डींग’चे नेमके नियम काय?
४१.५.१ – कोणत्याही क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने जाणूनबुजून फलंदाजाचं शाब्दिक किंवा कृतीमधून लक्ष्य विचलित होईल असं वागणे, खेळात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणे चुकीचं आहे.
४१.५.२ – क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने फलंदाजाचं लक्ष्य विचलित होईल, अडथळा निर्माण होईल अशी कृती जाणीवपूर्वकपणे केली आहे क नाही हे ठरवण्याचा अधिकार मैदानावरील दोन्ही पंचांना असतो.
४१.५.३ – एकाही पंचाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील एखाद्या खेळाडूने अशाप्रकारे फलंदाजाचं लक्ष्य विचलित होईल, अडथळा निर्माण होईल अशी कृती जाणीवपूर्वकपणे केल्याचं आढळल्यास चेंडू डेड घोषित केला जाईल. तसेच हा चेंडू डेड का घोषित केला हे दुसऱ्या पंचाला कळवलं जाईल.
४१.५.४ – चेंडू डेड घोषित केल्यास दोघांपैकी एकाही फलंदाजाला बाद घोषित केलं जाणार नाही. म्हणजेच असा गोंधळ झाल्यास फलंदाज या चेंडूवर बाद घोषित केला जाऊ शकत नाही.
नक्की वाचा >> Ind vs Ban: पाऊस सुरु होण्याच्या तीन चेंडूंआधी विराटच्या त्या एका कृतीमुळे भारताने गमावला असता सामना? ‘त्या’ धावा चर्चेत
४१.५.५ – अडथळा निर्माण करताना थेट शारीरिक संपर्क आला असेल तर पंचांनी एकत्र चर्चा करुन घडलेला प्रकार हा नियम ४२ (खेळाडूंची वर्तवणूक) नुसार योग्य आहे की अयोघ्य हे ठरवावं.
४१.५.५.१ – घडलेला प्रकार हा नियम ४२ (खेळाडूंची वर्तवणूक) नुसार अयोग्य आणि नियमांचं उल्लंघन करणारा असेल तर त्यांनी खेळाडूंच्या वर्तवणुकीसंदर्भातील नियमांप्रमाणे कारवाई करावी. त्यांनी ४१.५.७ ते ४१.५.९ अंतर्गत सर्वच नियमांअंतर्गत दोषी खेळाडूवर कारवाई करावी.
४१.५.५.२ – घडलेला प्रकार हा नियम ४२ (खेळाडूंची वर्तवणूक) नुसार नियमांचं उल्लंघन केल्याचं नसल्याचं पंचांना वाटल्यास त्यांनी ४१.५.७ ते ४१.५.९ नुसार पुढील निर्णय घ्यावा.
४१.५.६ – गोलंदाजाजवळ उभ्या असलेल्या पंचाने फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा दिल्याचं इशाऱ्याने घोषित करावे. यासंदर्भात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारा पंच हा निर्णय का घेण्यात आलं हे कळवावे आणि त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधारालाही ही माहिती दिली जावी.
४१.५.७ – फेक फिल्डींग प्रकरणातील चेंडू हा षटकामधील चेंडू गणला जाऊ नये.
४१.५.८ – ‘फेक फिल्डींग’च्या प्रकरणामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून अडवणूक होण्याचा प्रयत्न होण्याआधी फलंदाजांनी जितक्या धावा केल्या असतील त्या आणि पेनल्टी म्हणून देण्यात आलेल्या पाच धावा दोन्ही एकूण धावांमध्ये मोजल्या जाव्यात. तसेच धाव घेत असल्यास ती धाव पूर्ण मोजली जावी. धाव ‘फेक फिल्डींग’ होण्याच्या आधी म्हणजेच चेंडू टाकल्यानंतर घेण्यास सुरुवात केली असेल तर ती ग्राह्य धरली जावी.
४१.५.९ – मैदानात असणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी एकत्र चर्चा करुन पुढील चेंडू कोण खेळणार हे ठरवावं.
४१.५.१० – सामना संपल्यानंतर पंच या घडलेल्या घटनेसंदर्भात वरिष्ठांना कळवावं. तसेच सामन्यावर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेलाही यासंदर्भातील माहिती दिली जावी. यामुळे संबंधित संघाचा कर्णधार आणि खेळाडूविरोधात पुढील नियमांनुसार कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो.
पाच धावा मिळाल्या असत्या तरी…
टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात ‘फेक फिल्डींग’साठी भारताला दंड म्हणून पाच धावा बांगलादेशच्या खात्यात जमा झाल्या असत्या तर डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशला देण्यात आलेलं लक्ष्यही वेगळं असतं. कारण पावसामुळे सामना थांबवण्याच्या तीन चेंडू आधी हा सारा प्रकार घडला. त्यामुळेच हा संपूर्ण प्रकार जर-तरच्या शक्यतेमध्येच चर्चा केला जाऊ शकतो असं अनेक चाहत्यांचं मत आहे. या पाच धावा बांगलादेशला मिळाल्या असत्या तर डकवर्थ-लुईस नियमानुसार वेगळ्या आकडेवारीच्या आधारे लक्ष्य निश्चित करण्यात आलं असतं. त्यामुळे बांगलादेशला न मिळालेल्या या पाच धावाच भारताच्या विजयाला कारणीभूत ठरलं असलं म्हणणं धाडसाचं ठरेल.
नक्की पाहा >> Ind vs Ban: बांगलादेशने दिनेश कार्तिकची विकेट ढापली? ‘थर्ड अंपायर आंधळा आहे का?’ चाहत्यांचा Video शेअर करत प्रश्न
विराटवर कारवाई होणार का?
‘फेक फिल्डींग’बद्दल चर्चा असली तरी बांगलादेशकडून यासंदर्भात कोणतीही तक्रार करण्यात आलेली. नियमांप्रमाणे त्याचवेळी गोष्ट निदर्शनास आणून देणं आवश्यक असतं. म्हणूनच या प्रकरणात विराटविरोधात कारवाई होण्याची शक्यता नाही. तसेच याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषकातील पुढील वाटचालीवरही परिणाम होणार नाही असं दिसत आहे.