क्रिकेटमध्ये, असे अनेकदा म्हणतात की, जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण गोलंदाजाचा सामना करता तेव्हा तुमचे ध्येय खेळपट्टीवर टिकून राहण्याचे असावे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या कमकुवत गोलंदाजाचा सामना करता तेव्हा मात्र तुम्ही एका षटकात फटकेबाजीचा प्रयत्न केला पाहिजे. बाजारातील घसरणीनंतर गुंतवणूक करणे हे कमकुवत गोलंदाजाला तोंड देण्यासारखे आहे. या पडलेल्या बाजारात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ कशी आहे, याबाबत जाणून घेऊया.
शेअर बाजारात राहावे की निघावे?
अर्थातच राहावे. पडत्या बाजारात शेअर बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास गुंतणूकदारांच्या पदरी निराशाच पडणार आहे, मात्र जेव्हा बाजारासाठी आव्हान असते तेव्हा तिथेच संधी असते. शेअर बाजारातील पडझडीच्या दरम्यान, गुंतवणूकदाराला आपली गुंतवणूक रणनीती बदलण्याची आवश्यकता असते. कारण अस्थिर बाजार हा ‘इंट्राडे ट्रेडिंग’साठी अनुकूल नसतो. जेव्हा बाजार अस्थिर असतो, तेव्हा गुंतवणूकदार बनण्याची आणि पैसे गुंतवण्याची योग्य वेळ असते. पडलेल्या बाजारात कमी किमतीला अनेक चांगल्या कंपन्यांचे समभाग उपलब्ध असतात. यामुळे अस्थिर बाजारात टप्याटप्याने समभाग खरेदीचे धोरण राखले पाहिजे. यामुळे पडलेल्या बाजारातून गुंतवणूक काढून घेणे योग्य ठरणार नाही.
इतर सर्व गुंतवणूक साधनांपेक्षा सरस परतावा देण्याची क्षमता भांडवली बाजारामध्ये आहे. शिवाय दीर्घकाळात बाजारात स्थिरता असू शकते आणि त्यानंतर लहान-मोठी घसरण बाजारात होत असल्याने ते आपला सरासरी परतावा वाढवतात. बाजारात प्रवेश किंवा बाजारातील निर्गमनाची वेळ निश्चित करताना या अस्थिरतेचा फायदा घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, वर्ष २०१९ ते २०२३ या काळात बाजारात अनेकदा मोठे चढ-उतार आले आणि सरासरी १८ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला. मात्र, जर या पाच वर्षांमधील तीन सर्वोत्तम कामगिरी करणारे महिने चुकवले असते, तर गुंतवणूकदारांना (उणे) -५ परतावा मिळाला असता.
गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ?
होय. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये बाजारात मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे शेअर बाजारामधील गुंतवणूक वाढवण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे. मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी, गुंतवणूकदारांनी बाजारातील अनेक ट्रिगर्स आणि संभाव्य जोखमींचे बारकाईने निरीक्षण करायला हवे. अस्थिर बाजारात समभाग निवडताना, कंपनीचे मूलभूत घटक, जसे की कंपन्यांची तिमाही कमाई, कर्ज गुणोत्तर आणि स्पर्धात्मक स्थिती याबाबत आढावा घ्यायला हवा. उदा. ज्या कंपनीच्या समभागात किंवा ज्या क्षेत्रातील कंपनीत गुंतवणूक करणार आहे, ती कंपनी आर्थिक आणि जागतिक दबावाला तोंड देऊ शकते का, तिचे सध्याचे मूल्यांकन योग्य आहे का वगैरे.
मजबूत ताळेबंद (बॅलन्स शीट), शाश्वत कमाई वाढ आणि त्यांच्या क्षेत्रातील स्पर्धात्मक धार असलेल्या कंपन्या बाजारातील अस्थिरतेत टिकून राहण्याची आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून आकर्षक परतावा देण्याची शक्यता अधिक असते.
शेअर बाजार धोरण ठरवणे आवश्यक
घसरत्या बाजारातही, सर्वच कंपन्यांचे समभाग घसरत नाहीत. गुंतवणूकदारांनी अशा कंपन्यांना हेरून त्यांचा किंमत-उत्पन्न गुणोत्तर अर्थात पीई रेशो आणि तिच्या कमाईच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकूणच बाजारात अविचारीपणे गुंतवणूक करण्याऐवजी, वाजवी मूल्यांकनांवर मजबूत पाया असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरेल. साधारणतः १० ते १५ दरम्यान पीई रेशो असलेले समभाग चांगले मूल्य देऊ शकतात.
४०-३०-३० नियम काय सांगतो?
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मंदीच्या काळात गुंतवणूक करताना ४०-३०-३० नियमाचे पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. बाजाराचे अर्थात एखाद्या कंपनीचे समभाग कमी मूल्यांकनावर प्राप्त असलतील त्यावेळी त्यात ४० टक्के भांडवल गुंतवले जाते. त्यांनतर बाजार आणखी घसरला की ३० टक्के आणखी भांडवल त्यात ओतले जाते. बाजार पुनर्प्राप्तीची चिन्हे दिसू लागल्यावर शेवटचे ३० टक्के भांडवल गुंतवले जाते. यापद्धतीमुळे एकाच वेळी सर्व भांडवल बाजारात गुंतवले जात नाही. शिवाय टप्प्याटप्प्याने समभाग खरेदी केल्याने सरासरी खरेदी किंमत कमी होऊन एकूण जोखीम कमी होते.
पडत्या बाजारात एसआयपी किती फायदेशीर?
मंदीच्या काळात म्युच्युअल फंडातील शिस्तशीर गुंतवणूक पर्याय असलेल्या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे योग्य आहे. कारण गुंतवणूक होत असल्याने कमी किमतीत म्युच्युअल फंडाचे अधिक युनिट्स प्राप्त होतात, जे दीर्घकालीन गुंतवणुकीवरील परतावा सुधारण्यास मदत करतात. बाजारात तेजीत याच युनिटचे मूल्य अर्थात एनएव्ही जलद गतीने वाढते. एखाद्या घटनेचा प्रभाव हा मर्यादित कालावधीपुरता मर्यादित असतो. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक सुरू ठेवल्याने प्रतिकूल घटना या बाजारात पैसे गुंतवण्याची आणि कमी कालावधीत अधिक परतावा मिळवण्याची शक्यता वाढवतात. दुर्दैवाने, काही गुंतवणूकदार अशा वेळी घाबरून त्यांची एसआयपी गुंतवणूक थांबवतात. ते योग्य नाही.
अस्थिरता हे वैशिष्ट्य…
शेअर बाजाराच्या सर्वात महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ते बहुतेक इतर मालमत्ता वर्गांच्या तुलनेत दीर्घावधीत अधिक परतावा देतात. मात्र यामध्ये अस्थिरता आणि उच्च जोखीम असते. साधारणपणे, गुंतवणूकदार बाजाराची दीर्घकालीन परतावा क्षमता आणि बहुप्रसवा परतावा यावर लक्ष केंद्रित करतात, मात्र असे बहुप्रसवा परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना बाजारातील घसरणीदरम्यानही समभागांमध्ये गुंतवणूक करावी लागते, हे मात्र विसरतात. अनिश्चिततेचा काळ दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सवलतीच्या किमतीत समभागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम संधी प्रदान करतो, हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जसे वॉरन बफे म्हणतात.. अनिश्चितता ही दीर्घकालीन मूल्यांच्या खरेदीदाराची मैत्रीण असते!