हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबरने अलीकडेच आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्यानं आपल्याला ‘रामसे हंट सिंड्रोम’ (Ramsay Hunt Syndrome) नावाचा घातक आजार झाल्याचा खुलासा केला आहे. या सिंड्रोममुळे त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. या कारणास्तव त्याने काही काळासाठी म्यूझिकल कॉन्सर्ट्स थांबवल्या आहेत.

‘रामसे हंट सिंड्रोम’ म्हणजे काय?
फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य संचालक डॉ. प्रवीण गुप्ता यांच्या मते, “रॅमसे हंट सिंड्रोम हा एक विषाणूजन्य आजार असून व्हेरिसेल्ला-झोस्टर विषाणूमुळे (Varicella-Zoster Virus) याचा संसर्ग होतो. याला हर्पीस झोस्टर ओटिकस किंवा जेनिक्युलेट गॅंग्लियन हर्पीस झोस्टर असंही म्हटले जाते. चेहऱ्याच्या ७ व्या मज्जातंतूच्या अर्धांगवायूमुळे हा संसर्ग उद्भवतो. यामुळे शरीराच्या इतर अवयवांना इजा होत नाही.

जेम्स रामसे हंट नावाच्या अमेरिकन न्यूरोलॉजिस्टच्या नावावरून या आजाराचे नाव ठेवण्यात आले आहे. पहिल्या महायुद्धात हंट यांना लष्करी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान त्यांनी तीन सिंड्रोम्सबद्दल लिहिले. त्यापैकी एक म्हणजे रामसे हंट सिंड्रोम होय.

रामसे हंट सिंड्रोमचा प्रादुर्भाव कसा होतो?
व्यक्तीच्या कानाजवळील भागात चेहऱ्यावर जेव्हा शिंगल्सचा (कांजण्यासारखा त्वचारोग) प्रादुर्भाव होतो, तेव्हा ‘रामसे हंट सिंड्रोम’ होण्याचा धोका संभवतो. कांजण्यांसाठी जबाबदार असलेला विषाणूच रामसे हंट सिंड्रोमसाठीही जबाबदार असतो. कांजण्याचा आजार झालेले रुग्ण बहुदा कोणत्याही गंभीर समस्येशिवाय बरे होतात. पण हा विषाणू रुग्णाच्या शरीरात दीर्घकाळ निष्क्रिय स्वरुपात राहतो. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा सक्रिय होतो.

रामसे हंट सिंड्रोमची लक्षणे
सुरुवातीच्या टप्प्यात व्हॅरिसेल्ला झोस्टर विषाणू कांजण्यासाठी कारणीभूत ठरतो. कांजण्याचा संसर्ग झाल्यास काही दिवसांत आपण बरे होतो. पण हा विषाणू अनेक वर्षे शरीरात निष्क्रिय राहिल्यानंतर पुन्हा सक्रिय होतो. अशावेळी कान दुखणे, चेहऱ्याचा अर्धांगवायू आणि कानात फोड येणे ही तीन प्रमुख लक्षणं जाणवतात. याशिवाय काही रुग्णांमध्ये चव बदलणे, आवाजाची अतिसंवेदनशीलता (हायपरक्युसिस), टिनिटस (कानात वाजणे), डोळे कोरडे पडणे आणि चक्कर येणे अशी लक्षणं आढळतात.

रामसे हंट सिड्रोमवरील उपचार
या सिंड्रोमचा संसर्ग झालेल्या रुग्णांना अँटीव्हायरल आणि स्टेरॉइड्स दिली जातात. त्यामुळे ६ आठवडे ते ३ महिन्यांच्या कालावधीत रुग्ण बरा होतो. पण हा संसर्ग काही लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते किंवा ज्यांना इतर गंभीर आजार असतात. कांजण्यांसाठीची लस व्हॅरिसेल्ला-झोस्टर विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता कमी करते. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो.

हा संसर्ग एकापासून दुसऱ्यांमध्ये पसरू शकतो का?
या सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या शरीरावर फोड आले असतील आणि त्यामध्ये भरलेल्या द्रवाच्या संपर्कात इतर कोणी आले तर त्यांनाही रामसे हंट सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो. हे द्रव्य डोळ्याच्या संपर्कात आल्यास दृष्टीवर देखील गंभीर परिणाम होतो.

Story img Loader