राजे-महाराजांचा इतिहास एक तर पुस्तकांमध्ये किंवा चित्रपट-वेब सिरीज वा मालिकांमध्ये आपण अनेकदा पाहिला किंवा वाचला आहे. त्यांच्या शौर्याच्या, विजयाच्या किंवा पराभवाच्या अनेक सुरस कथा आपण ऐकल्या आहेत. पण या राजे-महाराजांच्या मालमत्तेच्या, त्याच्या वादाच्या आणि त्यांच्या वारसांच्या कथा आपण अगदीच अपवादाने ऐकल्या असाव्यात. अशीच एक मोठी रंजक कहाणी थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आणि उभ्या देशात चर्चेचा विषय ठरली. या कहाणीत कोणतं शौर्य किंवा जय-पराजय नव्हता, तर त्यातल्या संपत्तीचा भलामोठा आकडाच या प्रकरणाला अवघ्या देशात चर्चेचा विषय ठरवून गेला. नेमका काय आहे हा प्रकार? फरीदकोटच्या महाराजांच्या संपत्तीचा वाद आहे तरी काय?
हा सगळा वाद आहे तो पंजाबमधल्या फरीदकोटमधला. फरीदकोट जेव्हा संस्थान होतं, तेव्हा तिथले शेवटचे राजे सर हरींद्र सिंग ब्रार यांच्या संपत्तीवरून गेल्या ३० वर्षांपासून वाद सुरू आहे. हा वाद त्यांच्याच वारसांमध्ये सुरू असून या वादाला बनावट मृत्यूपत्र आणि केअरटेकर ट्रस्टच्या गोंधळाचीही किनार आहे. बुधवारी, अर्थात सात सप्टेंबर रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात अंतिम निकाल दिला आणि या संपूर्ण वादावर पडदा पडला. तब्बल २० हजार कोटींच्या मालमत्तेची देखरेख करणारी ट्रस्टच बरखास्त करण्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला.
कोण होते फरीदकोटचे शेवटचे महाराज?
सर हरींदर सिंग ब्रार हे फरीदकोट संस्थानचे म्हणजेच आत्ताच्या फरीदकोटचे शेवटचे महाराज होते. कारण त्यानंतर देश स्वतंत्र झाला आणि देशातील इतर संस्थानांप्रमाणेच फरीदकोटचं संस्थान देखील खालसा करण्यात आलं. मात्र, त्याआधीचा आणि त्यानंतरचा फरीदकोटच्या या राजघराण्याचा इतिहास मोठा रंजक आहे.
१९१८मध्ये हरींदर सिंग ब्रार अवघ्या ३ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि एकमेव वारस म्हणून त्यांना उत्तराधिकारी जाहीर करण्यात आलं. पुढची १५ वर्ष फरीदकोटचं राज्य दरबारातील प्रशासकीय मंडळींनी हरींदर सिंग ब्रार यांच्या नावाने चालवलं. ते १८ वर्षांचे झाल्यानंतर म्हणजेच १७ ऑक्टोबर १९३४ रोजी त्यांचा फरीदकोटचे महाराज म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर हरींदर सिंग ब्रार यांनी नरिंदर कौर यांच्याशी विवाह केला. त्यांना चार मुलं झाली. अमरित कौर, दीपिंदर कौर, महिपिंदर कौर या तीन मुली, तर टिक्का हरमोहिंदर सिंग हा मुलगा.
राज्याभिषेकानंतर अवघ्या ४ वर्षांत, १९३८मध्ये त्यांच्या राज्यात प्रजार मंडळ आंदोलन झालं. राज्यात चांगलं प्रशासन राबवण्याची मागणी करण्यात आली.पुढे १९४८मध्ये स्वतंत्र भारतात इतर अनेक संस्थानांप्रमाणेच फरीदकोट संस्थान देखील विलीन करण्यात आलं.पण तरीदेखील महाराज हरींदर सिंग ब्रार यांच्या संपत्तीची चर्चा दूरवर होत होती.
हरींदर सिंग ब्रार यांना विमानं, बाईक आणि कार्सची मोठी आवड होती. त्यांच्याकडे चार विमानं होती. यात एक जेमिनी एम ६५चाही समावेश आहे, जे सध्या फरीदकोट पॅलेसच्या आवारात आहे. त्याशिवाय त्यांच्या शाही ताफ्यामध्ये १८ कार्स आहेत. ज्यात रोल्स रॉयस, बेंटले, जॅग्वार, डेमलर आणि पॅकार्ड अशा दिग्गज ब्रँड्सचा समावेश आहे. रीअल इस्टेटच्या व्यवसायाच्या जोरावर संस्थान खालसा झाल्यानंतर देखील महाराजा हरींदर सिंग ब्रार यांच्या शाही संपत्तीत वाढच होत गेली. पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरयाणा आणि चंदीगड या राज्यांमध्ये हरींदर सिंग ब्रार यांच्या शाही घराण्याची मालमत्ता आहे.
याशिवाय फरीदकोटमध्ये जवळपास १४ एकरमध्ये पसरलेला राजमहाल, त्याच महालाच्या बाजूला १५० बेडचं एक धर्मादाय हॉस्पिटल, फरीदकोटमधील १० एकरमधला किल्ला आणि नवी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील फरीदकोट हाऊस अशी वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता आहे.
मुलाचा आणि पत्नीचा मृत्यू, राजा डिप्रेशनमध्ये!
१९८१मध्ये हरींदर सिंग ब्रार यांचा मुलगा टिक्का हरमोहिंदर सिंग आणि त्यांची पत्नी नरिंदर कौर यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून आधीच वृद्धत्व आलेले हरींदर सिंग ब्रार हे निराशेच्या गर्तेत जाऊ लागले.आणि शेवटी त्यातच १९८९ साली त्यांचं निधन झालं..आणि खरी समस्या सुरू झाली!
हरींदर सिंग ब्रार हे तब्बल २० हजार कोटींची संपत्ती मागे सोडून गेले होते. पण ती नेमकी कुणाच्या नावे सोडून गेले, याची खातरजमा होत नव्हती.
नेमका काय होता कलह?
हरींदर सिंग ब्रार यांनी त्यांच्या मुलाच्या आणि पत्नीच्या मृत्यूनंतर १९८२ साली तयार केलेल्या मृत्यूपत्रावरून वाद सुरू झाला. या मृत्यूपत्रामध्ये सर्व संपत्ती ट्रस्टचा देण्याबाबत नमूद करण्यात आलं होतं. या ट्रस्टवर हरींदर सिंग ब्रार यांची मोठी मुलगी दीपिंदर कौर आणि माहीपिंदर कौर यांच्यासोबत इतरही काही मंडळी होती. मात्र, त्यांची सर्वात धाकटी मुलगी अमरिंत कौर हिचा त्यात समावेश नव्हता. याला कारणही तसंच होतं.
अमरित कौरनं १८ वर्षांची असताना हरींदर सिंग ब्रार यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याच संस्थानात नोकरीवर असणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याशी प्रेमविवाह केला होता. त्यामुळे नाराज हरींदर सिंग ब्रार यांनी अमरित कौरला त्यांच्या संपत्तीच्या अधिकारातून वजा केलं होतं. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. हरींदर सिंग ब्रार यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये अमरित कौर यांच्याशी असेललं भांडण मिटलं आणि त्या पुन्हा त्यांच्याकडे आल्या.
अमरित कौर यांचं मृत्यूपत्राला आव्हान
अमरित कौर यांनी हरींदर सिंग ब्रार यांच्या मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान दिलं. १९९१मध्ये सुरू झालेला हा न्यायालयीन लढा थेट २०१३पर्यंत येऊन पोहोचला. दरम्यानच्या काळात २००१मध्ये त्यांची सर्वात मोठी बहीण दीपिंदर कौर यांचं निधन झालं. अत्यंत क्लिष्ट झालेल्या या प्रकरणात चंदीगड जिल्हा सत्र न्यायालयाने शेवटी अमरित कौर यांच्या बाजूने निकाल देत हरींदर सिंग ब्रार यांचं चर्चेत असलेलं मृत्यूपत्र अवैध ठरवलं. ट्रस्टकडे संपत्ती न देता ती हरींदर सिंग ब्रार यांच्या मुलींमध्येच वाटली जावी, असा निकाल न्यायालयाने दिला. त्यानंतर ट्रस्टने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र, तिथेही न्यायालयानं जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.
प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात!
यानंतरही संपत्तीवर दावा सांगणाऱ्या खेवजी ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, बुधवारी, जेव्हा अमरित कौर यांचं वय ८३ वर्ष झालं आहे, तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला निकालच कायम ठेवला. हरींदर सिंग ब्रार यांचं मृत्यूपत्र बनावट असल्याचा निर्वाळा न्यायालयानं कायम ठेवला.त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या या वादावर अखेर पडदा पडला!
नेमकी किती आहे महाराज ब्रार यांची स्थावर मालमत्ता? (१९८४नुसार)
- फरीदकोट हाऊस, कोपर्निकस मार्ग, दिल्ली – ६ कोटी ९६ लाख ९२ हजार ३५९
- फरीदकोट हाऊस, डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह, दिल्ली – ९९ लाख ९३ हजार
- ओखला इंडस्ट्रियल प्लॉट – १६ लाख ६२ हजार ५८५
- मशोब्रा हाऊस – ४० लाख ५५ हजार ०२७
- रिव्हिएरा अपार्टमेंट, दिल्ली – ९ लाख ४ हजार ५९५
- हॉटेल प्लॉट, चंदीगड – १ कोटी ८ लाख ३६ हजार २६६ (किंमत १९८१ नुसार)
- किला मुबारिक, फरीदकोट – ९९ लाख १४ हजार ३२१ (किंमत १९८२ नुसार)
- सुरजगड किल्ला, मनी माजरा – २ कोटी