Farmers Protest Hariyana Border आपल्या मागण्यांसाठी दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकर्‍यांना अडवण्यात आल्यानंतर सर्व शेतकरी पंजाब-हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसले आहेत. बुधवारी खनौरी येथे आंदोलक आणि हरियाणा पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यात एका आंदोलक शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले, “शुकवारी संध्याकाळी आम्ही भूमिका स्पष्ट करू.” आंदोलनात मृत्यू झालेला तरुण शेतकरी कोण होता? त्याचा मृत्यू नेमका कसा झाला? पोलिसांनी मृत्यूचा दावा का फेटाळला? आणि सध्या आंदोलनाची परिस्थिती काय? याबद्दल जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलनातील मृत तरुण शेतकरी कोण होता?

बुधवारी (२१ फेब्रुवारी) शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी केंद्रावर दबाव वाढवण्यासाठी ‘दिल्ली चलो’ मोर्चा पुन्हा सुरू केल्याने पंजाब-हरियाणा सीमेवर खनौरी येथे हरियाणा पोलिसांशी आंदोलकांची चकमक झाली. शेतकऱ्यांनी आरोप केला की, पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या गोळ्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या. यात २२ वर्षीय शुभकरन सिंग या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हा तरुण शेतकरी भटिंडा जिल्ह्यातील बलोह गावाचा होता. तो फार कष्टाळू असल्याचेही त्याच्या मित्रांनी संगितले.

शुभकरनला त्याच्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आजोबांनी लहानाचे मोठे केले. त्याला दोन बहिणीही होत्या. शुभकरनवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. शुभकरनचा मित्र पाला याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला संगितले, “तो एक कष्टाळू शेतकरी होता.” त्याने १२ वी नंतर शिक्षण सोडले आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, शुभकरनने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्णय घेतला. दूसरा मित्र महिंदर सिंग म्हणाला, “शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी लढणे ही त्याची जबाबदारी आहे, असा त्याचा विश्वास होता.”

शुभकरनच्या काकांच्या म्हणण्यानुसार, “शेती कायद्यांविरोधातील निदर्शनांमध्येही तो सहभागी झाला होता. जेव्हा त्याला शेतकरी १३ फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करण्याच्या योजनेबद्दल कळले, तेव्हा तो क्षणाचाही विलंब न करता आंदोलनात सामील झाला.” ‘इंडिया टुडे’च्या अहवालात असे म्हटले आहे की, ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्याचदिवशी त्याने खनौरी येथील आंदोलकांसाठी नाश्ता तयार केला होता. इतर आंदोलकांनी सांगितले की, शुभकरनने त्यांना एकत्र बसून नाश्ता करण्यास सांगितले.

पोलिसांनी मृत्यूचा दावा फेटाळला

दिल्लीकडे कूच केलेले आंदोलनकर्ते शेतकरी खनौरी येथे हरियाणा पोलिसांशी समोरासमोर आले आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यानच शुभकरनचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही आणि त्यांच्यावर रबराच्या गोळ्या आणि अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. या चकमकीत शुभकरन जखमी झाला आणि नंतर त्याला पटियाला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक हरनाम सिंग यांनी ‘द क्विंट’ला सांगितले, “दुपारी ३ च्या सुमारास शुभकरनला रुग्णालयात आणले तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती. शवविच्छेदनानंतरच आम्हाला अधिक माहिती मिळेल,” असे त्यांनी सांगितले.

बलदेव सिंग सिरसा यांनी आरोप केला की, २२ वर्षीय तरुणाच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. पंढेर यांनीही आरोप केला की, त्याच्या डोक्यात गोळी लागली होती. यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दोन दिवसांसाठी मोर्चा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हरियाणा पोलिसांनी शुभकरनच्या मृत्यूचा दावा फेटाळून लावला आहे. “आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या आंदोलनात एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नाही. ही केवळ अफवा आहे. खनौरी सीमेवर दोन पोलीस आणि एक आंदोलक जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,” असे पोलिसांनी सांगितले. शेतकऱ्यांनीच मिरचीच्या पिकावर आग लावल्याचा आरोप पोलिसांनी केला. “या घटनेत किमान १२ पोलिस कर्मचारी जखमी झाले,” असे त्यांनी ‘एक्स’ वर एका पोस्टमध्ये लिहिले.

विरोधकांचा सरकारवर हल्ला

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, या २२ वर्षीय तरुणाच्या मृत्यूचा राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे. याला जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. “शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल केला जाईल. त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे मान यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेतकऱ्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करताना म्हटले, “आम्ही हाच दिवस पाहण्यासाठी स्वातंत्र्यासाठी लढलो होतो का, की एक दिवस आमच्याच देशात आम्ही निवडून दिलेलं सरकार ब्रिटिशांसारखे आमच्या मुलांना शहीद करतील. आम्ही पूर्णपणे शुभकरनच्या पाठीशी आहोत. त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल याची खात्री आम्ही करू.”

हेही वाचा : Spam Calls: स्पॅम कॉल्स ठरत आहे डोकेदुखी? सरकारच्या ‘या’ उपाययोजना तुम्हाला माहीत आहे का?

काँग्रेसचे राहुल गांधी आणि पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी या मृत्यूवरुन केंद्र सरकारवर टीका केली. ““खनौरी सीमेवर गोळीबारामुळे भटिंडातील तरुण शेतकरी शुभकरन सिंग यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. जेव्हा शेतकऱ्यांचेच प्राण वाचणार नाहीत… तर मग भारत गप्प कसा बसेल?,” असे त्यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये लिहिले. पुढे ते म्हणाले “मोदी सरकारने – आधी ७५० शेतकऱ्यांचा जीव घेतला. मोदी सरकारमधील एका मंत्र्याच्या मुलाने लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना कारने चिरडले. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्येही शेतकऱ्यांना पोलिसांच्या गोळीबारात जीव गमवावा लागला होता. हे सर्व भाजपा सरकारच्या काळात घडत आहे. संसदेत मोदीजींनी स्वतः शेतकऱ्यांसाठी ‘आंदोलनजीवी’ आणि ‘परजीवी’ असे अपमानास्पद शब्द वापरले आहे,” असे काँग्रेस अध्यक्षांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer death in punjab farmer protest on hariyana border rac
Show comments