जितका वेळ पेट्रोल भरण्यास लागेल, तितक्याच कालावधीत आता ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक कारची बॅटरी चार्ज करताना येईल. जगभरात सर्वाधिक इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या चीनमधील बीवायडी कंपनीने नुकताच हा दावा केला. बीवायडीचे संस्थापक वांग शॉन्फु यांना चीनचे इलॉन मस्क म्हणून नेहमीच संबोधले जाते. शॉन्फु म्हणाले, की कंपनीचे सर्वात महत्त्वाकांक्षी मॉडेल म्हणून बाजारत येत असलेली कार तिच्या बॅटरीत मेगावॉट अर्थात एक हजार किलोवॉट इतकी वीज साठवण करेल. त्यामुळे बॅटरी चार्जिंगविषयीची ग्राहकांची चिंता पूर्णपणे मिटलेली असेल. 

फास्ट चार्जिंग कोणत्या मॉडेलमध्ये?

हान एल आणि टॅंग एल या दोन एसयूव्ही  मॉडेलमध्ये अतिवेगवान चार्जिंग तंत्रज्ञान असेल. ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक कारमधील बॅटरी चार्जिंगचा विचार केल्यास जितका वेळ पेट्रोल भरण्यास लागेल, तितक्याच कालावधीत बॅटरी चार्ज करता येईल. बीवायडीच्या पहिल्या दोन्ही मॉडेलना १०सी हे मानांकन मिळाले आहे. म्हणजे एका तासाच्या दशांश वेळेत चार्जिंग पूर्ण होईल म्हणजे सहाव्या मिनिटाला बॅटरी चार्ज झालेली असेल. दर सेकंदाला दोन किलोमीटरचा टप्पा चार्ज होत राहील.

पाच मिनिटांत ४०० किमी रेंज?

उच्च क्षमतेचा वीज प्रवाह आणि अतिउच्च व्होल्टेज या दोन्ही गोष्टी एकाच वेळीच चार्जरसाठी उपलब्ध झाल्यास ही किमया घडून येऊ शकते. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावरील वीजप्रवाहाचे संतुलन आणि नियंत्रण ही मोठी आव्हानात्मक बाब असते. उच्च वीज प्रवाह आणि अतिउच्च व्होल्टेज यांतील संतुलन बिघडल्यास बॅटरीमधून नकारात्मक ऊर्जा अर्थात अपायकारक उष्णता बाहेर फेकली जाण्याची शक्यता असते. अर्थात बीआयडीने विकसित केलेल्या बॅटरी तंत्रज्ञानानुसार अंतर्गत प्रतिकार कमी करण्यात आला आहे. त्यामुळे बीवायडीच्या कोणत्याही इलेक्ट्रिक कारमधील बॅटरी सर्वात गतिमान चार्जिंगसाठी पूरक असतात. अति व्होल्टेजबाबत नियंत्रणासाठी सिलिकॉन कार्बाइड पॉवर चिप्सचे नवे तंत्रज्ञान तयार केले आहे. शिवाय, संपूर्ण चीनमध्ये ४०० फ्लॅश चार्जिंग केंद्रे उभारण्याचा बीवायडीचे नियोजन आहे.

उच्च क्षमतेच्या बॅटरी 

सध्या तरी ही चैन परवडणारी नसेल. कारण बहुतेक कंपन्यांनी अतिप्रगत तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी निर्मितीच्या ऐवजी इलेक्ट्रिक कारची किंमत कशी होईल, यावर भर दिला आहे. याचा अर्थ बॅटरीवरील खर्च कमी करणे आलेच. त्यामुळे बीवायडीच्या प्रत्येक ईव्हीमध्ये ही सुविधा असेलच असे सांगता येणार नाही. कारण प्रीमियम श्रेणीतील कारमध्ये अशा प्रकारची सामग्री बसवणे अन्य कंपन्यांना खर्चाच्या बाजूने परवडणारे नाही. शिवाय ग्राहकांना सार्वजनिक चार्जिंग केंद्रांचे वीजदर परवडणारे नाहीत. हे दर खाली आल्यास काही अंशी चित्र बदलू शकते.

बीआयडी वि. प्रतिस्पर्धी

२०२४ मध्ये इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनीने संपूर्ण इलेक्ट्रिक कार निर्मितीतील ‘दादा कंपनी’ असे बिरूद काही अंशी कमावले होते. परंतु या वर्षीच्या आरंभीच बीवायडीने इलेक्ट्रिक कार निर्मितीतील क्रांतिकारी घोषणा केल्याने टेस्ला या शर्यतीत मागे पडली का, या तर्कवितर्कांना उधाण आले. यात मस्क यांच्या राजकीय पाठिंब्याचा मुद्दाही अधोरेखित करण्यात आला होता. तंत्रज्ञानविषयक सत्यस्थिती पडताळली असता, मस्क यांच्या अलीकडेच बाजारात आलेल्या नव्या मॉडेलची चार्जिंग क्षमता ५०० (चार्जर) किलोवॉट इतकी आहे. त्याआधी हीच सामग्री २५० किलोवॉट इतकी होती. याच सुपरचार्जर तंत्राच्या साह्याने टेस्लाची इलेक्ट्रिक कार १५ मिनिटांत १७० किमी रेंजची भर घालू शकत होती. बीआयडीच्या घोषणेच्या एक दिवस आधी टेस्लाच्या शेअरमध्ये ४.८ टक्क्यांनी घसरण झाली. त्यानंतर मंगळवारी तो पाच टक्क्यांनी खाली आला.

दाव्यात किती तथ्य?

बर्नस्टेनस्थित आशिया वाहनउद्योग क्षेत्रातील गुंतवणूक कंपनीच्या विश्लेषक युनस ली यांनी बीआयडीच्या नव्या दाव्याने आपण काहीशा अचंबित झाल्याचे म्हटले आहे. चिनी प्रतिस्पर्धी क्षिपेंग आणि झिकर या कंपन्यांची ५ सी आणि ५.५ सी चार्जिंग व्यवस्था दर दहा मिनिटांत अनुक्रमे २८० मैल आणि ३४२ मैल रेंजची मिळवून देत आहे. टेस्लासह अन्य प्रतिस्पर्ध्यांना बीवायडीने मागे टाकले आहे. सध्या सर्वात वेगवान चार्जिंग क्षमता ही ३५० किलोवॉट इतकी मानली जात असली तरी इंग्लंडमधील वेगवान चार्जिंगची उडी फारतर १५० किलोवॉट इतकी आहे.

शेअर बाजारात मुसंडी

इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारपेक्षाही अधिक पटीने क्षमता असल्याचा तर्क गुंतवणूकदारांच्या पचनी पडल्याने चीनची इलेक्ट्रिक कार (ईव्ही) निर्माती बीवायडी कंपनीने मंगळवारी शेअर बाजारात ४.१ टक्क्यांनी नफा कमावला. कंपनीच्या नव्या दाव्यामुळे तिचे स्थान अजून भक्कम झाल्याची भावना गुंतवणूकदांमध्ये वाढीस लागली आहे. हॉंगकाँग शेअर बाजारातील बीवायडीच्या शेअरमध्ये ४०८ अंशांनी वाढ झाली.

बॅटरी इलेक्ट्रिक आणि हायब्रीड इलेक्ट्रिक अर्थात विजेवरील बॅटऱ्या आणि पेट्रोल अशा संयुक्त इंधनावर धावणाऱ्या कारनिर्मितीत बीवायडी सध्या सर्वोच्च स्थानी आहे. विशेष म्हणजे वॉरेन बफे यांच्यासारख्या मुरब्बी गुंतवणूकदारालाही बीवायडीची घोडदौड आश्वासक वाटत आहे. त्यांच्यामते, ईव्ही कार उत्पादनातील आघाडी ही प्रतिस्पर्धी कंपनीच्या कितीतरी पट अधिक असेल.

अतिवेगवान चार्जिंगचे तोटेही?

इलेक्ट्रिक कार चार्जिंगच्या वेळी ग्राहकाला तिच्या रेंजविषयी मोठी चिंता असते. ती चिंता बीवायडीने जरी घालवली असली तरी त्यासाठी मोजावी लागणारी किंमत ही नक्कीच जास्त असेल, असा मतप्रवाह आहे. अशा प्रकारची वाहने तयार करण्यासाठी कंपनीच्या उत्पादनात खर्चात मोठी झालेली असेल. अर्थात ती शेवटी ग्राहकाकडूनच वसूल केली जाईल. हेच सूत्र पुढे लागू केल्यास जितके वेगवान चार्जिंग तितक्या प्रमाणात विजेची मागणी म्हणजेच तितकीच तिची निर्मितीही आलीच. प्रचंड प्रमाणावर तयार करण्यात येणाऱ्या विजेला चार्जिंग केंद्रांपर्यंत आणण्यासाठी अधिक खर्चिक वीजपुरवठा जाळेही आवश्यक आहे. परंतु इतक्या प्रचंड वेगाने होणारी चार्जिंग बॅटरीचे आयुर्मान घटवेल का, हाही तितकाच महत्त्वाचा आहे. सर्वसाधारण चार्जिंग क्षमता ही कमी रेंज निर्माण करून देते, तरीही त्यातील अनेक तोट्यांचा आजवर विचार करण्यात आला आहे.

Story img Loader