अमोल परांजपे
दुसऱ्या जागतिक महायुद्धाची सांगता झाली ती अमेरिकेने जपानच्या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकल्यामुळे. त्यानंतर सुरू झाला तो महासत्तांच्या अण्वस्त्रांचा खेळ… प्रामुख्याने अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या तेव्हाच्या दोन महासत्तांची अण्वस्त्रनिर्मितीमध्ये स्पर्धा लागली. या स्पर्धेमध्ये केवळ संशयावरून एका व्यक्तीवर प्रचंड अन्याय झाला. ती व्यक्ती म्हणजे अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल ५५ वर्षांनी हा अन्याय दूर झाला आहे. हा आरोप नेमका कोणता होता, तो कसा दूर झाला आणि त्यामुळे ओपेनहायमर यांना खरोखर न्याय मिळाला का, याचा आढावा घेणे आवश्यक आहे.
ओपेनहायमर यांचे अणुबॉम्बनिर्मितीमध्ये स्थान काय?
दुसरे महायुद्ध सुरू असताना दोस्त राष्ट्रे आणि हिटरल-मुसोलिनी असे सर्वच अणुबॉम्ब निर्मितीच्या प्रयत्नात होते. ज्याला पहिल्यांदा यश येईल, तो जगावर राज्य करणार हे जवळजवळ निश्चित होते. अमेरिकेमध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ नावाने अणुबॉम्बवर संशोधनाचा अत्यंत गोपनीय कार्यक्रम सुरू होता. भौतिकशास्त्रज्ञ ओपेनहायर या योजनेतील महत्त्वाच्या संशोधकांपैकी एक होते. किंबहुना अमेरिकेला अणुबॉम्ब तयार करण्यात यश लाभले, ते त्यांच्यामुळे असे मानले जाते. त्यामुळे त्यांचा उल्लेख ‘अणुबॉम्बचे जनक’ असा केला जातो. मात्र महायुद्ध संपून शीतयुद्धाचा काळ सुरू झाल्यानंतर ओपेनहायमर अचानक वादात अडकले.
ओपेनहायमर यांच्यावर कोणता आरोप केला गेला?
एप्रिल-मे १९५४ मध्ये अमेरिकेच्या अणुऊर्जा आयोगासमोर एक गोपनीय खटला चालला. १९ दिवस झालेल्या या गुप्त सुनावणीनंतर ओपेनहायमर हे सोव्हिएट रशियाचे सहानुभूतीदार आणि गुप्तहेर असल्याचे सिद्ध झाल्याचे सांगितले गेले. शिक्षा म्हणून त्यांना अमेरिकेच्या अणू कार्यक्रमातून वगळण्यात आले. त्यांना अमेरिकेच्या सर्व संरक्षणविषयक गोपनीय दस्तावेजाची प्रवेशयोग्यता रद्द करण्यात आली. या एका सुनावणीमुळे अमेरिकेचे नायक अचानक खलनायक ठरले आणि पुढले आयुष्य त्यांना नैराश्यामध्ये व्यतित करावे लागले. १९६७ साली वयाच्या ६२व्या वर्षी दुर्लक्षित अवस्थेत ओपेनहायमर यांनी जगाचा निरोप घेतला.
अमेरिकेच्या डेमोक्रेटिक सरकारांनी काय पावले उचलली?
ओपेनहायमर यांच्यावरील हा अन्याय दूर करण्यात डेमोक्रेटिक पक्षाच्या दोन अध्यक्षांचा हातभार लागला आहे. २०१४ साली बराक ओबामा प्रशासनाने अणुऊर्जा आयोगात झालेल्या ‘त्या’ सुनावणीमधील दस्तावेजावरील गोपनीय हा शेरा हटविला आणि कागदपत्रे सर्वांसाठी खुली झाली. अनेक इतिहासकार आणि अणुऊर्जा शास्त्रज्ञांनी या कागदपत्रांचा रीतसर अभ्यास केला. अर्थात हे सुनावणीचे केवळ १० टक्के उतारे असले तरी त्यातून ओपेनहायमर हे रशियाचे हेर असल्याचे कुठेही सिद्ध होत नाही, असा निष्कर्ष निघाला. त्यानंतर आता, गेल्या आठवड्यात जो बायडेन प्रशासनाने अखेर ओपेनहायमर यांची प्रवेशयोग्यता रद्द करण्याचा निर्णय फिरविला.
निर्णय जाहीर करताना प्रशासनाने काय म्हटले?
अमेरिकेच्या ऊर्जा सचिव जेनिफर एम. ग्रॅमहोम यांनी एका निवेदनाद्वारे हा निर्णय जाहीर केला. ‘ओपेनहायमर यांच्यावरील निर्बंध हा तत्कालिन अणुऊर्जा आयोगाने राबविलेली चुकीची प्रक्रिया आणि स्वतःच्याच नियमावलीचे उल्लंघन याचा परिणाम होता. जसजसा अधिक काळ जात राहिला तसतसा अन्याय आणि दुजाभाव स्पष्ट होत गेला. डॉ. ओपेनहायमर यांची देशभक्ती आणि निष्ठा अधिकाधिक समोर येत गेली.’
निर्णयावर इतिहासकारांच्या प्रतिक्रिया काय?
ओपेनहायमर यांना प्रवेशयोग्यता नाकारण्याचा निर्णय बदलल्याबाबत इतिहासकारांनी हा मैलाचा दगड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मार्टिन जे. शेरविन यांच्यासह ओपेनहायमर यांचे ‘अमेरिकन प्रोमेथियस’ हे जीवनचरित्र लिहिणारे की बर्ड यांनी निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. “इतिहास महत्त्वाचा आहे आणि १९५४मध्ये जे झाले ती क्रूर थट्टा होती. अमेरिकेतील विद्यार्थ्यांना आता हे इतिहासाचे अखेरचे पान वाचायला मिळेल आणि त्या कांगारू कोर्टामध्ये जे घडले तो ओपेनहायमर यांच्याबाबतचा अखेरचा शब्द नव्हता हेदेखील समजेल,” असे बर्ड म्हणाले. मात्र एवढ्या विलंबाने झालेला निर्णय ओपेनहायमर यांच्यावरील अन्याय दूर करण्यास सक्षम नसल्याचे विज्ञान इतिहासकार अलेक्स वेलरस्टेन यांना वाटते. अर्थात उशिरा का होईना, प्रशासनाने निर्णय घेतला याबाबत समाधानी असल्याचेही ते म्हणतात.
विश्लेषण : काश्मीरी नागरिक विरोध करत असलेला ‘पब्लिक सेफ्टी अॅक्ट’ आहे तरी काय? जाणून घ्या
आगामी चित्रपटाला निर्णयामुळे फायदा होईल?
योगायोगाची बाब म्हणजे ओपेनहायमर यांच्यावर याच नावाचा जीवनपट येऊ घातला आहे. ख्रिस्तोफर नोलान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सिलियन मर्फी ओपेनहायमर यांची भूमिका साकारणार आहे. ‘अमेरिकेन प्रोमेथियस’ या चरित्रावर आधारित असलेला हा जीवनपट आहे. जुलै २०२३मध्ये चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. बायडेन प्रशासनाने ओपेनहायमर यांच्यावरील निर्बंध हटविल्यामुळे चरित्रात आणि पर्यायाने जीवनपटात असलेले त्यांचे निरपराधित्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे हा चित्रपट आता खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.
अमेरिकेने ऐतिहासिक चूक खरोखर सुधारली का?
गोपनीयतेच्या नावाखाली सरकारी यंत्रणा अनेक दस्तावेज वर्षानुवर्षे दडवून ठेवत असतात. अमेरिकेमध्ये काही प्रकरणांमध्ये ठराविक कालावधीनंतर कागदपत्रांवरील गोपनीयतेचा शेरा पुसला जातो, तर काही प्रकरणे कायमस्वरूपी गोपनीय ठेवली जातात. या गोपनीयतेमुळे अनेक दंतकथा जन्माला येतात आणि कालांतराने चुका सुधारल्या जातात. अण्वस्त्रे चांगली की वाईट, हा वाद तात्पुरता बाजूला ठेवला तर ओपेनहायमर यांच्या संशोधनाचे खरे म्हणजे कौतुक व्हायला हवे होते. त्याऐवजी आयुष्याचे अखेरचे दशक नैराश्यग्रस्त अज्ञातवासात घालविण्याची वेळ त्यांच्यावर आली. अमेरिकेने चूक सुधारण्यास बराच उशीर केला, असेच या घटनेचे विश्लेषण करावे लागेल.
amol.paranjpe@expressindia.com