फिलिपिन्सपाठोपाठ व्हिएतनामही भारताकडून ब्रम्होस या स्वनातीत (सुपरसॉनिक) क्रुझ क्षेपणास्त्रांची खरेदी करणार आहे. ७० कोटी अमेरिकन डॉलरचा करार अंतिम टप्प्यात आ्हे. ब्रम्होस हे जगातील सर्वात वेगवान व अचूक मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. दक्षिण चीन समुद्रात जिथे प्रादेशिक वाद आहेत, तिथे चीनला शह देण्यासाठी ब्रम्होसला पसंती मिळू लागली आहे.
कराराचे महत्त्व
जागतिक पटलावर ब्रम्होसचा वाढता प्रभाव भारतीय संरक्षण सामग्रीवरील विश्वासाचे प्रतीक ठरते. रशियाच्या सहकार्याने भारताने निर्मिलेले ब्रम्होस खरेदी करणारा फिलिपिन्स हा जगातील पहिला देश ठरला होता. दोन वर्षांपूर्वी भारत-फिलिपिन्स दरम्यान करार होऊन या क्षेपणास्त्रांचे मध्यंतरी वितरण झाले. आता व्हिएतनामशी धोरणात्मक भागीदारीचा नवीन अध्याय सुरू होत आहे. ब्रम्होस निर्यातीतून भारताला प्रादेशिक संकटांना तोंड देणाऱ्या आग्नेय आशियातील प्रमुख राष्ट्रांशी संबंध दृढ करण्याची संधी प्राप्त झाली. सागरी सुरक्षा, संपर्क व व्यापाराला चालना देण्याच्या प्रयत्नातील हा महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल.
हेही वाचा : २६/११ दहशवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानात मृत्यू; कोण होता अब्दुल रहमान मक्की?
समान सूत्र कोणते?
दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या दादागिरीची झळ अनेक ‘आसिआन’ म्हणजे पूर्व व आग्नेय आशियाई राष्ट्रांना बसत आहे. यातील एक म्हणजे फिलिपिन्स आणि दुसरे व्हिएतनाम. चीनच्या दादागिरीमुळे आपले प्रादेशिक अधिकार अबाधित राखण्यासाठी फिलिपिन्सला लष्करी सामर्थ्य वाढविणे क्रमप्राप्त ठरले. व्हिएतनाम-चीन दरम्यान आर्थिक, राजकीय संबंध असले तरी दक्षिण चीन समुद्रातील प्रदेशावरून वाद आहे. ही अत्याधुनिक क्षेपणास्त्राने व्हिएतनामची संरक्षण सज्जता वाढवतील. जगात ब्रम्होसचा तो दुसरा वापरकर्ता ठरणार आहे. आसिआन गटातील इंडोनेशियादेखील हे क्षेपणास्त्र भात्यात समाविष्ट करण्यास उत्सुक आहे. त्याचेही चीनशी सागरी हद्दीवरून मतभेद आहेत.
नवीन ब्रह्मोस अधिक विध्वंसक
जगातील अन्य क्रुझ क्षे्पणास्त्रांच्या तुलनेत ब्रम्होस वेगळे आहे. ‘डागा आणि विसरा’ (फायर अँड फरगेट) या तत्त्वावर चालणारे हे क्षेपणास्त्र एकदा सोडल्यानंतर कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय लक्ष्यावर मारा करू शकते. क्षेपणास्त्राची नवीन आवृत्ती जमिनीपासून कमी उंचीवरून प्रवास करून शत्रूच्या रडारला चकवा देऊ शकते. ब्रम्होस – एनजी या वजनाने हलक्या नव्या आवृत्तीत ब्राझीलनेही स्वारस्य दाखवले. ब्रम्होस सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राचे ते लघुरूप आहे. ध्वनीहून तिप्पट वेगाने झेपावणाऱ्या सध्याच्या पिढीतील इंटरसेप्टर (क्षेपणास्त्ररोधी) क्षेपणास्त्रांचा प्रतिकार करणे कठीण असते. ब्रम्होसच्या नव्या आवृत्तीत आकारमान, वजन कमी झाल्यामुळे हवाई दलांसाठी ते आकर्षक पर्याय बनले. ब्राझील त्यांच्याकडील ग्रिपेन – ई लढाऊ विमानांसाठी संभाव्य शस्त्र म्हणून त्याचा विचार करत आहे. विकासाधीन ब्रम्होस – एनजीच्या वर्षभरात विकासात्मक चाचण्या सुरू होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा : तिबेटमधील चीनच्या महाकाय धरणामुळे वाढली भारताची चिंता; कारण काय?
आजवरचा प्रवास
भारत-रशियाने १९९८ मध्ये स्थापन केलेल्या ब्रम्होस एरोस्पेसकडून ब्रम्होस या स्वनातीत क्रुझ क्षेपणास्त्राचा विकास झाला. सुरुवातीला या प्रकल्पाची १३ टक्के स्वदेशी क्षमता अडीच दशकात ७५ टक्क्यांवर गेली. ब्रम्होसचे बहुतांश स्वदेशीकरण झाले असले तरी काही घटक रशियन रचनेचे वापरले जातात. प्रारंभी निर्बंधामुळे ब्रम्होसचा पल्ला २९० किलोमीटर ठेवणे क्रमप्राप्त होते. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात सहभागी झाल्यानंतर ३०० किलोमीटर पुढील क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग खुला झाला. ब्रम्होस २०० ते ३०० किलोग्रामची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. नवी आवृत्ती ध्वनीच्या चारपट वेगाने ४०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर लक्ष्य भेदण्याची क्षमता राखते. ब्रम्होस एरोस्पेसने लखनऊ येथील नव्या सुविधेत ब्रम्होस-एनजी उत्पादनाची योजना आखली आहे.
हेही वाचा : लाखो पुस्तक विक्रेते अडचणीत; पोस्ट खात्याकडून ‘बुक पॅकेट’ सेवा बंद, कारण काय? याचा काय परिणाम होणार?
शस्त्रास्त्र निर्यातीचे फायदे
भू-राजकीय तणावामुळे जागतिक शस्त्रास्त्र बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. संरक्षण सामग्री व शस्त्रास्त्र निर्यात आर्थिक लाभांपलीकडे धोरणात्मक फायदे देतात. संबंधित राष्ट्रांनी संरक्षण सामग्री तैनात केल्यावर तांत्रिक अवलंबित्व स्थापित होते. देखभाल-दुरुस्ती, सुटे भाग यासह भविष्यातील सुधारणांवर परिणाम होतो. हे अवलंबित्व भागीदार राष्ट्रांच्या राजनैतिक आणि भू-राजकीय भूमिकेवर परिणाम करतात. संयुक्त लष्करी कारवाईचा परीघ विस्तारतो. चीनविरोधी आघाडी बळकट करण्याबरोबर शस्त्रास्त्र निर्यातीला बळ मिळते. जगात शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणारा देश अशी भारताची ओळख आहे. निर्यातीमुळे हळूहळू का होईना ती बदलता येईल. भारताने पुढील वर्षापर्यंत शस्त्रास्त्र निर्यात ३५ हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात २१ हजार ८३ कोटींची संरक्षण सामग्री व शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात आली. या माध्यमातून ९० हून अधिक राष्ट्रांशी लष्करी मैत्री प्रस्थापित झाली. हे मित्र वाढतील, तसे शस्त्रास्त्र निर्यातीचा मार्ग सुकर होईल. ब्रम्होसचा विचार करता त्या कामात २०० हून अधिक भारतीय उद्योग गुंतलेले आहेत. यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.