बुद्धिबळविश्वातील सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीला सोमवारपासून (२५ नोव्हेंबर) प्रारंभ होणार असून विद्यमान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनसमोर भारताच्या १८ वर्षीय दोम्माराजू गुकेशचे आव्हान असणार आहे. गुकेशला ही लढत जिंकून सर्वांत युवा जगज्जेता म्हणून विक्रमी यश संपादन करण्याची संधी आहे. गेल्या जागतिक लढतीपासून डिंगच्या खेळाचा दर्जा अतिशय खालावला असून त्याच वेळी गुकेशने सर्वच मोठ्या स्पर्धांत आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यामुळे जगज्जेतेपदाच्या लढतीत गुकेशला अधिक पसंती मिळत आहे. मात्र, लिरेनला गत-लढतीतील अनुभवाचा फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गुकेशला अधिक पसंती का?

गुकेशने गेल्या काही वर्षांत बुद्धिबळविश्वात वेगळे, स्थान निर्माण केले आहे. त्याने चेन्नई येथे झालेल्या २०२२ च्या ऑलिम्पियाड स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्या वेळी त्याने सुरुवातच सलग आठ विजयांसह केली होती. त्यामुळे आशियाई बुद्धिबळ महासंघाने त्याला २०२२ सालच्या वर्षातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूच्या पुरस्कारानेही सन्मानित केले. त्यानंतर २०२३ मध्ये त्याने ‘फिडे’ सर्किटचा भाग असलेल्या स्पर्धांत सर्वोत्तम कामगिरी केली आणि जगज्जेतेपदाच्या लढतीचा आव्हानवीर ठरविणाऱ्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी तो पात्र ठरला. या वर्षी कॅनडा येथे झालेल्या ‘कँडिडेट्स’मध्ये फार कोणाला अपेक्षा नसताना गुकेशने बाजी मारली. पाठोपाठ भारतीय पुरुष संघाच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णयशात गुकेशने निर्णायक भूमिका बजावली. बुडापेस्ट येथे झालेल्या या स्पर्धेत सर्वांत अवघड मानल्या जाणाऱ्या पहिल्या पटावर खेळताना गुकेशने १० पैकी नऊ लढती जिंकल्या. गेल्या तीन वर्षांतील या चमकदार कामगिरीमुळे जगज्जेतेपदाच्या लढतीत गुकेशला अधिक पसंती मिळत आहे.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
Gautam Gambhir Press conference Team is prepared with Abhimanyu Easwaran and KL Rahul as potential replacements for the opening slot
Gautam Gambhir : रोहित शर्मा नाही तर कोण…? बुमराह नेतृत्व करणार अन् ‘हा’ खेळाडू देणार सलामी, गौतम गंभीरने केलं स्पष्ट

हेही वाचा >>> ‘Walking pneumonia’ काय आहे? जाणून घ्या या गंभीर आजाराची लक्षणे अन् उपाय…

डिंग लिरेनची कामगिरी खालावली…

जगज्जेतेपदाच्या लढतीत गुकेशचे पारडे जड मानले जाण्यामागे डिंग लिरेनची अलीकडच्या काळातील निराशाजनक कामगिरी हेसुद्धा एक कारण आहे. गतवर्षी १४ पारंपरिक डाव आणि चार जलद डावांनंतर डिंगने रशियाच्या इयन नेपोम्नियाशीचे कडवे आव्हान मोडून काढले होते. पुरुष विभागातील तो पहिला चिनी आणि बुद्धिबळाच्या इतिहासातील १७वा जगज्जेता ठरला होता. मात्र, हे यश मिळवताना त्याला बराच संघर्ष करावा लागला. नेपोम्नियाशीने त्याच्या मानसिकतेची कसोटी पाहिली होती. यातून सावरणे डिंगला प्रचंड अवघड गेले. तो गतवर्षी जगज्जेतेपदाच्या लढतीनंतर बऱ्याच स्पर्धांना मुकला. त्याला नैराश्यही आले. याचा त्याच्या आत्मविश्वासावरही मोठा परिणाम झाला. ‘गुकेशविरुद्ध फार वाईट पद्धतीने हरण्याची मला भीती आहे,’ असे डिंग काही दिवसांपूर्वीच म्हणाला होता.

गुकेशला बेसावध ठेवण्याचा डाव?

चिनी खेळाडू हे अतिशय धूर्त म्हणून ओळखले जातात. प्रतिस्पर्ध्याला बेसावध ठेवणे आणि योग्य वेळी आपला खेळ उंचावणे, यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे डिंगने दारुण पराभवाची भीती व्यक्त करणे हे संशय नक्कीच निर्माण करते. डिंगची गुणवत्ता वादातीत आहे. एके काळी पारंपरिक बुद्धिबळात सर्वाधिक काळ अपराजित राहण्याचा (१०० डाव) विक्रम त्याच्या नावावर होता. त्यामुळे त्याला कमी लेखण्याची चूक गुकेश निश्चितपणे करणार नाही. मात्र, गुकेशला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आल्यास डिंगला संधी संभवते.

हेही वाचा >>> देश संकटात आणि राजाच्या राज्याभिषेकावर दौलतजादा; नागरिकांची आगपाखड

दोघांच्या खेळाचे वैशिष्ट्य काय?

डिंग आपल्या तंत्रशुद्ध खेळासाठी ओळखला जातो. अत्यंत अविचल बुद्धिबळपटू म्हणूनही त्याची ख्याती आहे. प्रतिस्पर्धी भक्कम स्थितीत असला तरी हार न मानता दमदार पुनरागमन करण्याची क्षमता तो राखून आहे. याचाच प्रत्यय गतवर्षीच्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत आला होता. तब्बल तीन वेळा मागे पडूनही आपले आव्हान शाबूत ठेवण्यात डिंग यशस्वी ठरला होता. दुसरीकडे, गुकेश पटावरील स्थिती समान आणि नाजूक असली तरी आक्रमक चाली रचून वरचढ ठरण्यासाठी ओळखला जातो. तसेच स्पर्धा किंवा लढत जितकी मोठी, तितका तो खेळ उंचावतो. हे ऑलिम्पियाड आणि ‘कँडिडेट्स’ अशा स्पर्धांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे यंदाची लढत चुरशीची होणे अपेक्षित आहे.

जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र कसे ठरले?

विद्यमान जगज्जेता या नात्याने डिंग थेट जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी पात्र ठरला. त्याचा आव्हानवीर ठरविण्यासाठी ‘कँडिडेट्स’ स्पर्धा झाली आणि यात गुकेश विजेता ठरला. या स्पर्धेत जगज्जेतेपदाच्या गत-लढतीतील उपविजेता नेपोम्नियाशी, अमेरिकेचे अनुभवी हिकारू नाकामुरा, फॅबिआनो कारुआना तसेच भारताचे प्रज्ञानंद, विदित गुजराथी, फ्रान्सचा प्रतिभावान अलिरेझा फिरुझा यांसारख्या आघाडीच्या बुद्धिबळपटूंचाही समावेश होता. मात्र, गुकेशने सर्वांत सरस कामगिरी करताना १४ फेऱ्यांअंती ९ गुण मिळवत बाजी मारली. नाकामुरा, नेपोम्नियाशी आणि कारुआना हे केवळ अर्ध्या गुणाने त्याच्यापेक्षा मागे राहिले.

यापूर्वी किती वेळा आमनेसामने?

गुकेश आणि डिंग हे पारंपरिक (क्लासिकल) प्रकारात यापूर्वी केवळ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी दोन लढती डिंगने जिंकल्या, तर एक लढत बरोबरीत सुटली. या वर्षीच्या सुरुवातीला नेदरलँड्स येथे झालेल्या टाटा स्टील स्पर्धेत डिंगने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना गुकेशवर मात केली होती. मात्र, ऑलिम्पियाडमध्ये भारत आणि चीन हे संघ समोरासमोर आले, त्या वेळी गुकेशविरुद्ध डिंगला खेळवणे चीनने टाळले होते.

जगज्जेतेपदाच्या लढतीचे स्वरूप…

यंदा जागतिक अजिंक्यपदाची लढत सिंगापूर येथील रेजॉर्ट्स वर्ल्ड सेंटोसा येथे खेळवली जाणार असून यात एकूण १४ पारंपरिक (क्लासिकल) डाव होतील. सर्वप्रथम ७.५ गुणांचा टप्पा गाठणारा खेळाडू विजेता ठरेल आणि विश्वविजेतेपद मिळवेल. पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटे, पुढील २० चालींसाठी ६० मिनिटे आणि उर्वरित चालींसाठी १५ मिनिटांचा कालावधी खेळाडूंना उपलब्ध असेल. काळ्या मोहऱ्यांनी खेळाडूच्या ४० चाली होत नाहीत, तोवर सामना बरोबरीत सोडवता येणार नाही. तसेच १४ डावांअंती लढतीत बरोबरी असल्यास विजेता ठरवण्यासाठी जलद प्रकारात ‘टायब्रेकर’ खेळवण्यात येईल.

मोठा इतिहास…

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळाची पहिली लढत १८८६ मध्ये विलहेल्म स्टाइनिट्झ आणि योहानेस झुकेर्टोर्ट यांच्यात झाली होती. यात स्टाइनिट्झने बाजी मारली होती. इमॅन्युएल लास्कर, गॅरी कॅस्पारोव्ह आणि ॲनातोली कार्पोव्ह यांनी सर्वाधिक सहा वेळा जगज्जेतेपद मिळवले आहे. मिखाईल बोट्विनिक, मॅग्नस कार्लसन आणि विश्वनाथन आनंद यांनी पाच वेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळवला. विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू अशी ख्याती असणाऱ्या कार्लसनचा दशकभर विश्वविजेतेपदावर कब्जा होता. त्याने गतवर्षी स्वत:हून माघार घेतल्याने अन्य बुद्धिबळपटूंना संधी निर्माण झाली आणि डिंगने या संधीचे सोने केले.