ज्ञानेश भुरे
मोरोक्को…फुटबॉलच्या जागतिक शब्दकोशातील दूरचा शब्द. मात्र, कतार येथील विश्वचषक स्पर्धेमुळे तो एकदम चर्चेला आला. कोणालाही अपेक्षा नसताना मोरोक्कोच्या संघाने विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. त्यांची ही घोडदौड स्वप्नवत होती. मात्र, अखेर ही घोडदौड जबरदस्त लयीत असलेल्या गतविजेत्या फ्रान्सने रोखली. विश्वचषक स्पर्धेतील कशी झाली या दोन संघांमधील लढत याचा आढावा.
फ्रान्सने या सामन्यात कसा खेळ केला?
फ्रान्सनने आपली सावध भूमिका सोडली नाही. मात्र, संधी मिळाली की त्याचे सोने करायचे ही सवयही त्यांनी कायम राखली. त्यामुळेच फ्रान्सला पाचव्या मिनिटाला गोल करण्यात यश आले. उपांत्यपूर्व फेरीत पहिला गोल नोंदविल्यावर फ्रान्सने मागे राहून खेळणे पसंत केले होते. या वेळी मात्र त्यांनी मागे राहण्यापेक्षा खेळामध्ये राहणे अधिक पसंत केले. चेंडूचा ताबा मोरोक्कोच्या खेळाडूंकडे अधिक वेळ होता. अशा वेळी त्यांना रोखणे किंवा त्यांच्याकडून चेंडू काढून घेण्यामागे फ्रान्सच्या खेळाडूंचा कल राहिला. त्यांची सुरुवात संयमी राहिली असली, तरी अखेरच्या टप्प्यात त्यांनी चांगला वेग घेतला. जिरुडच्या जागी थुराम मैदानात उतरला, तेव्हा फ्रान्सच्या खेळाचा वेग वाढला. थुरामने अखेरच्या टप्प्यात कमालीच्या वेगवान हालचाली करून मोरोक्कोच्या खेळाडूंवर दडपण आणले होते.
फ्रान्सला नशिबाची साथ?
फ्रान्सने संपूर्ण सामन्यात परिपूर्ण खेळ केला. मोरोक्कोचा संघ कोणत्याही आघाडीवर त्यांची बरोबरी करू शकला नाही हेसुद्धा खरे. मात्र, फ्रान्सला नशिबाचीही तितकीच साथ लाभली. फ्रान्सचे दोन्ही गोल मोरोक्कोच्या खेळाडूंच्या शरीराला लागून चेंडूला मिळालेल्या दिशेमुळे झाले. दोन्ही गोलमध्ये एम्बापेच्याच किक मोरोक्कोच्या खेळाडूंच्या शरीराला धडकून गेल्या. या दोन्ही वेळी चेंडू कुठेही भरकटू शकत होता. परंतु चेंडू मैदानातच राहिला आणि तेदेखील गोलपोस्टच्या अगदी समोर. या दोन संधींवर थिओ हर्नांडेझ आणि कोलो मुआनी यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे फ्रान्सला गोल करणे शक्य झाले.
सामन्यात मोरोक्कोचा खेळ कसा राहिला?
कतार विश्वचषकातील मोरोक्कोचा प्रवास स्वप्नवत होता. स्थलांतरित खेळाडूंना एकत्रित करून प्रशिक्षक रेग्रागुई यांनी अशी कामगिरी करून दाखवली, ज्याची दखल भविष्यातही घेतली जाईल. कतार विश्वचषक स्पर्धा म्हटल्यावर मोरोक्कोचे नाव पहिले पुढे येईल. मोरोक्कोच्या खेळात भलेही सर्वोत्कृष्ट तंत्राचा अभाव असेल, त्यांच्या खेळात युरोपीय किंवा दक्षिण अमेरिकन शैलीचा मिलाफ नसेल, फुटबॉलचे सौंदर्य नसेल, पण त्यांच्याकडे होती कमालीची जिद्द आणि प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा. या दोन आधारावरच मोरोक्कोचे खेळाडू पूर्ण स्पर्धेत लढले. झियेश, ओउनाही, बोनो, अम्ब्राबात, यामिक अशी मोरोक्को संघातील प्रत्येक खेळाडूची नावे घेता येतील. त्यांनी आपली तशी छापच सोडली. उपांत्य फेरीतही झियेश, हकिमी, ओऊनाही यांनी फ्रान्सच्या गोलरक्षकाची परीक्षा घेतली. पण, ते त्याला चकवू शकले नाहीत.
फ्रान्सच्या विजयाचे वैशिष्ट्य काय?
सातत्य, आत्मविश्वास आणि सांघिक खेळ हे फ्रान्सच्या आतापर्यंतच्या प्रवासाचे खरे वैशिष्ट्य मानता येईल. खेळाला सुरुवात केली की घाई न करता संयमाने खेळावर नियंत्रण मिळवायचे आणि मग त्यावर आरूढ होत प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाबूत करायचे अशाच पद्धतीने फ्रान्सचा खेळ राहिला. त्यांची सुरुवात कधी संथ वाटली, तर कधी आक्रमक. मोरोक्कोविरुद्ध त्यांनी सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला भलेही गोल केला असेल, पण त्या वेळी देखील त्यांनी घाई केली नाही. अगदी सहजपणे चेंडू खेळवत, बचावपटूंना चकवा देत फ्रान्सचे आक्रमक मोरोक्कोच्या गोलपोस्टमध्ये धडकले होते. ग्रीझमन, एम्बापे, जिरुड, डेम्बेले हे जसे पुढे होऊन खेळत होते, तसेच कुंडे, व्हरान, कोनाटे या बचावपटूंची कामगिरी विसरून चालणार नाही. मोरोक्कोच्या खेळाडूंची जी काही आक्रमणे झाली ती या तिघांमुळेच रोखली गेली. एकदा गोलरक्षक लॉरिसही चकला होता, पण कुंडे तिथे राहिल्याने फ्रान्सवरील संभाव्य गोल टळला होता. त्यामुळेच फ्रान्सच्या या बचाव फळीच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
दोन देशांच्या खेळतील किंवा खेळाडूंच्या देहबोलीमधील फरक काय होता?
फ्रान्स आणि मोरोक्को दोन्ही देशांच्या खेळाडूंचा खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांच्या देहबोलीतही कमालीची भिन्नता होती. फ्रान्स संयमी, तर मोरोक्कोच्या खेळाडूंमध्ये आफ्रिकेचा रांगडेपणा ठासून भरला होता. मैदानात खेळाडूंच्या खेळाचे चित्र वेगळे होते. दोन्ही संघांचे खेळाडू कमालीच्या संयमाने खेळत होते. मोरोक्कोच्या खेळाडूंमध्ये अधूनमधून आक्रमकता दिसून येत होती. त्यांच्या फटक्यांमध्येही ताकद होती. मात्र, फ्रान्सच्या गोलरक्षकाला त्यांना चकवता आले नाही. मोरोक्कोची आक्रमणे होत असतानाही फ्रान्सचा संयम वाखाणण्याजोगा होता. विजेतेपदापर्यंत पोचण्याची तळमळ फ्रान्सच्या प्रत्येक खेळाडूमध्ये दिसत होती. त्यांनी खेळाचे व्यवस्थापन एकदम अचूक होते. हीच तळमळ हा या दोन देशांमधील खेळाचा मोठा फरक होता.